माहाराष्ट्री भाषा : महाराष्ट्रात प्रचलित असलेली मध्यकालीन भारतीय आर्य (म. भा. आ.) भाषा. ही भाषा ‘महरट्‌ट’ या लोकसमूहाची असल्यामुळे या भाषेस ‘महरट्‌टी’ (संस्कृतीकरण : महाराष्ट्री किंवा माहाराष्ट्री) व या लोकांनी वसाहत केलेल्या प्रदेशास ‘महाराष्ट्र’ अशी संज्ञा मिळाली. या भूभागात खोदलेल्या इसवी सनापूर्वीच्या शिलालेखांतील भाषा व सातवाहन राजा हाल याने संपादन केलेला या प्रदेशातील लोकगीतांचा–परंपरागत गाथांचा – संग्रह (गाहा सत्तसई) इ. जुन्या साहित्याची भाषा पाहता, या भाषेचे मूलस्थान महाराष्ट्र असावे असे स्पष्ट दिसते. या भाषेची गेयता व हिच्यातील उत्कृष्ट साहित्य यांमुळे महाराष्ट्राबाहेरील संस्कृत-प्राकृत नाटककारांनी हिचा नाट्यगीतांसाठी उपयोग केला व कवींनी हिला काव्यभाषा मानून या भाषेत गीती, खंडकाव्य- महाकाव्यरचना केली. दण्डीने (काव्यादर्श १·३४) या भाषेला ‘प्रकृष्टं प्राकृतम’ (श्रेष्ठ दर्जाचे प्राकृत) म्हणताना संस्कृत – प्राकृत साहित्यिकांनी या भाषेचा केलेला आदर व स्वीकार लक्षात घेतला होता. त्यामुळे हर्न्ले व त्यांच्या अनुयायांनी महाराष्ट्राची –राजस्थान, मध्यप्रदेश इ. प्रांत ज्या विशाल देशात आहेत अशा राष्ट्रांची भाषा हा महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानाशी विसंगत केलेला ‘माहाराष्ट्री’ चा अर्थ चुकीचा ठरतो. माहाराष्ट्री व मराठी यांचे नाते गॅरेत्स, पिशेल, ग्रीअर्सन व ब्लॉक यांनी स्पष्ट केल्यामुळे हर्न्ले यांचे मत आता इतिहासजमा झाले आहे.

प्राकृत’शी समीकरण व माहाराष्ट्री – शौरसेनी पौर्वापर्य वाद : माहाराष्ट्रीचे साहित्यिक महत्त्व लक्षात घेऊन श्वेतांबर जैनांनी आपल्या धार्मिक व इतर साहित्यनिर्मितीसाठी ती स्वीकारली व हेमचंद्र इ. प्राकृत व्याकरणकारांनी ‘माहाराष्ट्री’ म्हणजे ‘प्राकृत’ असे समीकरण रूढ केले. हे व्याकरणकार माहाराष्ट्रीला शौरसेनी, मागधी इ. प्राकृत भाषांचा आधार मानून तिचे तपशीलवार वर्णन देतात व शौरसेनी, मागधी इ. भाषांचे केवळ तिच्यापेक्षा असणारे फरक नमूद करतात. याची प्रतिक्रिया काही अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञांवर होऊन त्यांनी ‘माहाराष्ट्री’ हे ‘शौरसेनी’ चे उत्तरकालीन स्वरूप असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांची भूमिका अशी : मध्यकालीन भारतीय आर्य भाषांमध्ये दोन स्वरांमध्ये आलेल्या असंयुक्त वर्णांचा (-क्-च्-इ. चा) प्रथम घोषवर्ण (-ग्-ज्-इ.) होऊन नंतर कालांतराने त्याचा लोप होतो. उदा., लोक> लोग > लोअ. शौरसेनीत सं. -त्-> द्-सं.-थ्-> -ध्- होते व माहाराष्ट्रीत यापुढील अवस्था : सं. –त्- > लोप, सं-थ्- > -ह्- आढळते, त्या अर्थी शौरसेनी ही माहाराष्ट्रीची पूर्वावस्था आहे. हा पक्ष मांडताना दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले गेले नाहीत. (१) –त्-> -द्-, -थ्-> -ध्- हे केवळ शौरसेनीचे वैशिष्ट्य नसून मागधी व व्राचड अपभ्रंशाचेही ते एक लक्षण आहे. (२) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या भिन्न प्रांतांत भाषिक विकास भिन्न गतीने झाले. उदा., -त्-> -द्- व- > -थ्–ध् असा दंत्यवर्णाचा घोष होण्याची प्रवृत्ती शौरसेनीच्या उपलब्ध प्राचीनतम स्वरूपात – उदा., अश्वघोषाच्या नाटकांत (इसवी सनाचे पहिले शतक) – आढळत नाही पण इ.स. पूर्वीच्या माहाराष्ट्रातील उत्कीर्ण प्राकृत लेखांत मात्र –त्->-द्- (सातवाहन > सादवाहन, शातकर्णी > सद्‌कणी : नासिक शिलालेख), -त्-> लोप होऊन यश्रुति (उदा., कुडे लेखात : गौतमा> गोयमा), -द्–लोप होऊन यश्रुति (भदन्त > भयंत : भाजे-कार्ले लेख) आढळतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकात अश्वघोषाला समकालीन असलेल्या महाराष्ट्रातील उत्कीर्ण लेखांत –त्- व -द्- चा लोप झालेला आढळतो. उदा., प्रतिष्ठान > पइठाण (कान्हेरी लेख), वेदिका > वेइका (नासिक लेख), पादोनद्विक > पाओनदुक (जुन्नर शिलालेख). स्थलकाल निश्चित असलेल्या या भाषिक पुराव्यावरून माहाराष्ट्री शौरसेनीचे उत्तरकालीन स्वरूप ठरत नाही. महाराष्ट्राच्या भूविभागात अघोषवर्णांचा घोष होऊन त्यांचा लोप होण्याची प्रक्रिया शौरसेनी विभागातील प्राकृतपेक्षा अधिक लौकर झाली एवढाच याचा निष्कर्ष आहे.

माहाराष्ट्रीचे भाषिक स्वरूप : साहित्यिक माहाराष्ट्रीचे प्रमुख भाषिक विशेष पुढीलप्रमाणे आहेत :

स्वर : इतर प्राकृत भाषांप्रमाणे माहाराष्ट्रीतही ऋ, ऋ, लृ, ऐ आणि औ हे स्वर आढळत नाहीत. त्यांचे अनुक्रमे ऋ, ऋ > अ, इ आणि ओष्ठ्यवर्णसान्निध्यामुळे पुष्कळदा उ होते.

उदा.,, तृण > तण (मराठी : तण), ऋद्वि > रिद्वि

कृपा > किंवा (मराठी : कीव)

तसेच ऐ > अई, ए; औ > अउ, ओ

उदा.,, सैन्य > सइण्ण, सेण्ण; कैलास > कइलास, केलास

यौवन > जोव्वण; कौरव > कउरव

व्यंजने : असंयुक्त (१) शब्दाच्या आद्यस्थानी असणारी व्यंजने सामान्यतः उच्चारली जात. शब्दाच्या पोटातील दोन स्वरांमध्ये येणारी -क्-, -ग्-, -च्-, -ज्-, -त्-, -द्-, -प्-, -ब्-, -य्- आणि -व्- या वर्णांचा लोप होतो.

उदा., लोक > लोअ, राग > राअ, शची > सई, रजत > रअअ, वियोग > विओअ, लावण्य > लाअण्ण. गानसुलभता व श्लेषादि अलंकार साधण्याचे सौकर्य यांमुळे साहित्यभाषा व नाटकातील पद्यांची भाषा म्हणून माहाराष्ट्री महाराष्ट्राबाहेर लोकप्रिय झाली असे मानतात.

(२) महाप्राणयुक्त स्पर्शाचे : -ख्-, -घ्-, -थ्-, -ध्- आणि -भ् चे -ह् होते. -फ्-चा घोषउच्चार भ्- आणि -ह्- हे दोन्ही आढळतात :

उदा., : शाखा > साहा, रथ > रह, लाभ >लाह (जुने मराठी : लाहो) मेघ > मेह, साधु > साहु, सफल > सभल, सहल.

(३) मूर्धन्य अघोष वर्णाचा -ट्-, -ठ् चा अनुक्रमे -ड्- आणि -ढ् असा घोष होतो.

उदा., घट > घड (म. घडा); मठ > मढ (मराठी उत्कीर्ण लेखांत : मढ, ‘मढीचेनि मापे’)

(४) अनुनासिक व्यंजनांपैकी ङ् आणि ञ् यांचा लोप होतो आणि न् चे ण् असे मूर्धन्य उच्चारण होते. प्राकृत ग्रंथांच्या अलीकडील संपादकांनी सर्वत्र ण् वापरण्याची रूढी पाडली आहे.

उदा., नर > णर, वजन > वयण, मनन > मणण

(५) शब्दारंभी य्- चे ज् – होते. उदा., याति > जाइ, यशस् > जस

(६) अनेकदा र् >ल् झाल्याचे आढळते.

उदा.,, हरिद्रा > हलिद्दा (म. हळद), अंगार > इंगाल (मराठी : इंगळ)

(७) माहाराष्ट्रीमध्ये फक्त स् हा दन्त्य ऊष्मवर्ण आहे. त्यामुळे तालव्य व मूर्धन्य ऊष्मे श् आणि ष् यांचा स् असा दंत्य उच्चार होई.

उदा., शब्द > सद्‌ (म. साद), पुरुष > पुरिस

(८) अनेक शब्दांत (जोडशब्दांच्या पोटातील असंयुक्त अक्षरांत) प्रथम व्यंजन लोप होऊन नंतर उरलेल्या स्वराचाही लोप होतो.

उदा., राज –कुल > राअ – उल > राउल (म. राऊळ), तसेच स्थविर > थेर (म. थेर – डा), कदल > केल (म. केळ), त्रयोदश > तेरह (म. तेरा).

संयुक्त व्यंजने : संस्कृतमध्ये सामान्यतः पुढील प्रकारची संयुक्त व्यंजने आढळतात.

(१) अघोष स्पर्श वर्ण + अघोष स्पर्श वर्ण

(२) घोष स्पर्श वर्ण + घोष स्पर्श वर्ण

(३) अनुनासिक + (कोणताही) स्पर्श वर्ण

(४) अर्धस्वर + कोणताही स्पर्श वर्ण किंवा अनुनासिक. माहाराष्ट्रीत सं. संयुक्तव्यंजनाचे पुढील स्वरूप आढळते :

(१) उच्चारसौकर्याच्या दृष्टीने, भिन्न स्पर्शस्थानांपासून एकदम दोन वर्ण उच्चारण्यापेक्षा, एकाच स्पर्शस्थानाहून त्यांचा उच्चार करणे सोईचे असते. त्यामुळे सं. संयुक्त व्यंजनाचे माहाराष्ट्रीमध्ये (आणि इतर म. भा. आ. भाषांतून) सावर्ण्य (assimilation) होऊन द्वित्व होते. व्यंजनांच्या उच्चारणसामर्थ्यावर यांचे पूर्व-व पर (Progressive व Regressive) सावर्ण्य होऊन द्वित्व होते.

उदा., पक्क > पिक्क, भक्त > भत्त, लग्न > लग्ग, सर्व > सव्व या द्वित्व उच्चारणाला अपवाद स्वरभक्तीचा. स्वरभक्ती झाल्यास असे सावर्ण्य होत नाही. उदा.,, श्री > सिरी, ह्री > हिरी, हर्ष > हरिस.

(२) दन्त्य + तालव्य संयुक्ताचे द्वित्व झालेले तालव्य होते.

उदा., विद्युत्‌ > विज्‍जु (म. वीज) द्योतते > जोअइ

(३) ऊष्म + स्पर्श वर्णाचे महाप्राणयुक्त संयुक्त व्यंजन होते.

उदा., हस्त > हत्थ, वत्स > वच्छ, पक्ष > पक्ख, पश्चात् > पच्छा

(४) ऊष्मवर्ण + अनुनासिक यांचे महाप्राणयुक्त अनुनासिक होते. उदा., काश्मीर > कम्हीर, ग्रीष्म > गिम्ह, विस्मय > विम्हअ

(५) र् किंवा ष् नंतर दंत्य आल्यास त्यांचा मूर्धन्य उच्चार होणे ही संस्कृत काळापासूनची उच्चारप्रवृत्ती असली, तरी माहाराष्ट्रीची प्रवृत्ती मूर्धन्यीकरणाकडे कमी आढळते.

सं. मध्ये तीन व्यंजनांची संयुक्ते पुढील प्रकारची आढळतात :

(१) अनुनासिक किंवा अर्धस्वर किंवा ऊष्मवर्ण + स्पर्श + अर्धस्वर : च्-न्‌द्‌र् – अ > चंद, ऊ-र्‌ध्‌व् – अ > उद्ध, उब्भ, रा – ष्‌ट्‌र् – अ > रट्‌ठ

(२) स्पर्श+ऊष्मवर्ण+अर्धस्वर उदा., उत् – स् – र् – अ > उच्छर

शब्दविकार : इतर प्राकृतप्रमाणे माहाराष्ट्रीमध्ये शब्दांना विकार होताना होणाऱ्या प्रत्ययप्रक्रियेत सुलभीकरण झाले.

नामे : सर्व व्यंजनान्त नामे स्वरान्त झाली आणि लिंगव्यवस्था विसकटू लागली उदा., पु > नपुं. : प्र. ब. व. गुणा, गुणाइं, स्त्री > पु. : शरद् > सरओ, प्रावृष् > पाउसो, नपुं. > पु., स्त्री. : जन्मन् > जम्मो, पृष्ठ > पिट्‌ठी, चौर्य > चोरिआ.

द्विवचनाचा प्राकृतच्या प्राथमिक अवस्थेत लोप झाला होता. व्याकरणामध्ये निरनिराळे स्वर अंती असणारी नामे असली, तरी पु. अकारान्त नाम-प्रक्रिया अधिक प्रभावी झाली. विभक्त्यांपैकी चतुर्थी व षष्ठी एकरूप झाली. इतर विभक्ती सं. वरून वर्णनप्रक्रियेच्या नियमाप्रमाणे झाल्या. उदा., ‘राम’ चे पं. ए. व रामात् > रामा, राम – तः > रामाओ, रामाउ. याशिवाय पं. दर्शक – धि < – हि हे प्रत्यय आढळतात. यांपैकी काही अनेकवचनीही चालतात. ष. ए. व. – स्स < सं. – स्य व स. ए. व. – म्मि < स्मिन् (हा सं. मध्ये सर्वनामाना लागे) हे महाराष्ट्रीचे विशेष प्रत्यय संस्कृतोद्‌भव आहेत. सर्वनामांचे व नामांचे प्रत्यय सारखेच आहेत. जी भिन्न रूपे आहेत ती संस्कृतवरूनच वर्णप्रक्रियेप्रमाणे बदल होऊन आल्याचे आढळते.

क्रियापदे : माहाराष्ट्री प्राकृतमध्ये सर्व धातू स्वरान्त आहेत. संस्कृत मधील काळ व अर्थ दाखविणारे रूपवैचित्र्य नाहीसे होऊन फक्त वर्तमानकाळ, भविष्यकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ दाखविणारे प्रत्यय (वर्णनप्रक्रियेच्या नियमांप्रमाणे बदललेल्या स्वरूपांत) राहिले. संस्कृत प्रमाणे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधितांच्या साह्याने भूतकाळ व्यक्त होई. पौराणिक संस्कृतमध्ये शिथिल झालेल्या पदव्यवस्थेची पुढची अवस्था – काही आत्मनेपदी प्रत्यय सामावलेले परस्मैपद-शिल्लक राहिले.

उदा., रमते > रमइ, रमए; हसति > हसइ

भविष्यकालवाचक – हि (< सं-स्य) विकरण असलेले प्रत्यय लागतात.

उदा., हसिहिइ > हसिष्यति (म. हसेल)

करिहिइ > करिष्यति (म. करील)

याशिवाय वर्तमान, भविष्य, विध्यर्थ, आज्ञावाचक (सं. ईय पासूनची) – इज्‍ज, इज्‍जा प्रत्ययान्त रूपे आढळतात.

उदा., हसेज्‍ज, हसेज्‍जा ही रूपे, ‘हसति’, ‘हसिष्यति’, ‘हसेत्’, ‘हसतु’ या ‘हसतो’. ‘हसेल’, ‘हसावे’, ‘हसो’, इ. अर्थी येई.

भावे व कर्मणी प्रयोगही सं. -ईय- > – ईअ -, – इज्‍ज – या विकरणाला प्रत्यय लावून साधतात.

उदा., ‘हसीअइ’, हसिज्‍जइ < ‘हस्यते’ या अर्थी संस्कृतमधील तुमन्त व – क्त्वा प्रत्ययांची गल्लत होऊन ते ‘-ऊन’ प्रत्ययदर्शक बनले.

उदा., पढ् < पढ ‘वाचणे’ याची ऊन प्रत्ययान्त रूपे : पढीउं (< पठितुम्), पढिअ (< * पठ्य), पढित्ता (< पठित्वा) व वैदिक सं. – त्वानम्, – त्वीनम् पासून साधलेली ‘पढिऊण’, ‘पढिउआण’ ही रूपे.

शीलार्थी – तृ बद्दल – इर आणि तद्धित – त्व बद्दल – त्त आणि – त्तण हे प्रत्यय आढळतात.

उदा., √ गम, गमिर = गमनशील

√ णम, णमिर = नमनशील

देव > देवत्त, देवत्तण = देवत्व

सारांश, माहाराष्ट्री प्रत्ययप्रक्रिया संस्कृत प्रत्ययप्रक्रियेचे कालान्तराने बदलत आलेले स्वरूप दाखवते.

मध्ययुगीन संस्कृतमधील वाक्यरचना व माहाराष्ट्रीमधील वाक्यरचना यांत फारसा फरक नाही.

माहाराष्ट्री संस्कृतच्या किती सारखी आहे व वर्णनप्रक्रियेचे नियम लक्षात घेऊन तिचे संस्कृत रूपान्तर करणे किती सोपे आहे पहा :

अमिअं पाउअ-कव्वं पढिउं सोउं अ जे ण आणन्ति |

अमृतं  प्राकृत काव्यं पठितुं श्रोतुं च ये न जानन्ति |

कामस्स तत्ततन्तिं कुणंति ते कहँ ण लज्‍जंति ||

कामस्य तत्वचिन्तां कुर्वन्ति ते कथं न लज्‍जन्ति ||

[प्राकृत काव्य अमृत आहे. जे (हे) वाचणे किंवा ऐकणे जाणत नाहीत – ज्यांना प्राकृत काव्याचा रसास्वाद घेता येत नाही – ते कामशास्त्राची तत्त्वचिंता करण्यात (प्रवृत्त होऊन) लाजत कसे नाहीत ?] (प्राकृत काव्यास्वाद घेता न येणारे शृंगार, रति इ. चर्चा कसे करतात ?)

(२) शीलाचे महत्त्व वर्णन करणारे सुभाषित पाहा :

अधणाणं धणं सीलं, भूसण – रहियाण भूसणं परमं |

अधनानां धनं शीलं, भूषण – रहितानां भूषणं परमम् |

परदेसे णियगेहं, सयण –विमुक्काण निय-सयणो ||

परदेशे निजगेहं, स्वजन-विमुक्तानां निज-स्वजनः ||

संदर्भ : 1. Chatterji, S. K. Indo – Aryan and Hindi, Ahmedabad, 1942.  

             2. Hemachandra, Ed. Vaidya, P. L. Prakrit Vyakarana, Pune, 1928.

             3. Pischel, R. Grammatik der Prakrit Sprachen, Strassburg, 1900.

४. पं. सेठ, हरगोविंददास त्रि. पाइअ-सद्‌द-महण्णवो, कलकत्ता, १९२८.

तगारे, ग. वा.