पादलिप्तसूरि : (इ. स.च्या पाचव्या शतकापूर्वी). प्राकृतात स्वतंत्र कथासाहित्याची परंपरा निर्माण करणाऱ्या ⇨ तरंगवइकहा (संस्कृत रूप तरंगवतीकथा) ह्या धर्मकथेचा कर्ता. तो एक जैन साधू होता. उपलब्ध पुराव्यावरून तो इ. स.च्या पाचव्या शतकापूर्वी होऊन गेला, असे दिसते. इ. स.च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात तो होऊन गेला असावा, असे मत एर्न्स्ट लॉइमान ह्या विद्वानाने व्यक्त केले आहे. प्रभाचंद्राच्या प्रभावकचरितात  पादलिप्तसूरीसंबंधी जी माहिती आलेली आहे ती पाहता, तो कोसल देशाचा रहिवासी होता त्याच्या पित्याचे नाव फुल्ल आणि आईचे प्रतिमा असे होते बालवयातच दीक्षा घेऊन मथुरा, पाटलिपुत्र, लाट, सौराष्ट्र इ. ठिकाणी त्याने भ्रमण केले, असे दिसते. उद्योतनसूरीच्या कुवलयमाला (आठवे शतक) ह्या चंपूकाव्यात राजा सातवाहनाबरोबर पादलिप्ताचा उल्लेख आहे. त्यावरून व अन्य परंपरागत माहितीवरून तो सातवाहन राजा हाल ह्याच्या दरबारी होता, असेही म्हटले जाते. तरंगवइकहा  ही त्याची साहित्यकृती आज तिच्या मूळ स्वरूपात मात्र उपलब्ध नाही. तिचा १,६४३ पद्यांत केलेला एक संक्षेप, नेमिचंद्रगणिकृत तरंंगलोला, हा उपलब्ध आहे. ह्या कथेच्या लॉइमानकृत जर्मन अनुवादाचे नरसिंहभाई पटेल ह्यांनी केलेले गुजराती भाषांतर ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहे (१९२४).

तगारे, ग. वा.