वजन यंत्रे: व्यापारात व इतर व्यवहारात मोठमोठी वजने मोजण्यासाठी यंत्रे. मालाने भरलेल्या गाड्या, मालमोटारी, अवजड यंत्रे, हत्तीसारखे प्रचंड पशू इत्यादींची वजने काढण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची वजन यंत्रे बनविण्यात आली आहेत. मोठ्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मालाचे वजन करण्यासाठी लहान मोठी वजन यंत्रे, एंजिनांची व मालडब्यांची वजन करणारी यंत्रे बसवलेली दिसून येतात. 

मोठ्यामोठ्या कारखान्यांत प्रचंड प्रमाणात उत्पादनात होत असलेल्या मालाच्या घटक द्रव्यांची वजने करून त्यांची नोंदी करून एकूण वजनांची बेरीज करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. अशांपैकी काही यंत्रांत टप्प्याटप्प्याने वजने करता येतात, तर दुसऱ्या काहींत सतत फिरत असणाऱ्या वाहक पट्ट्यावरून नेल्या जाणाऱ्या मालाचे वजन होत राहून ठराविक वेळात एकंदर किती वजन वाहून नेले गेले त्याची नोंद होते. 

कागद, रबर, प्लॅस्टिक, धातूचे पत्रे वगैरे पदार्थांच्या लांबच लांब तक्त्यांच्या उत्पादन क्रियेत ठराविक आकारमानाचे (एक चौरस मीटर किंवा एक चौरस फूट) वजन होत राहील, अशीही यंत्रे बनविली गेली आहेत.  

आ.१. आधुनिक रोमन स्टीलयार्ड आ. २. रोमन स्टीलयार्डचा दुसरा प्रकार : (१) आधार, (२) वजन करावयाची वस्तू, (३) वजन. रोमन व डॅनिश स्टीलयार्ड व तत्सम साधने:तरफेच्या तत्त्वावर आधारलेला समभुज तराजू वजन करण्यासाठी फार पुरातन कालापासून वापरात आहे [⟶ तराजू] पण ह्या समभुज तराजूने वर वर्णन केलेली मोठमोठी वजने मोजणे अशक्य असते. जुन्या काळी मोठी वजने करण्यासाठी विषमभुज तराजू (विस्मार), रोमन स्टीलयार्ड किंवा डॅनिश स्टीलयार्ड वापरीत असत. रोमन स्टीलयार्डमध्ये मोठे, वजन स्थिर टेकूपासून अगदी जवळ टांगले जाते व समतोल साधण्यासाठी लांब भुजेवर एक लहान वजन पुढे मागे सरकवले जाते. डॅनिश स्टीलयार्डामध्ये एका बाजूला ठराविक वजन असून ज्याचे वजन करावयाचे तो पदार्थ दुसऱ्या बाजूच्या टोकाला अडकवीत व टेकूच सरकवून समतोल साधला जाई. या प्रकारात पुष्कळ वेळा ग्राहकाची फसवणूक होत असल्याचे नजरेला आल्यामुळे पंधराव्या शतकातच याच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली. 

मोठी वजने करण्यासाठी सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत वापरात असलेल्या रोमन स्टीलयार्डाचे काही प्रकार आ. १, २ व ३ यांमध्ये दाखविली आहेत. 

स्टीलयार्डाचा आकडा अ या आधाराने पक्का धरला जातो (आ. १). आ हा टेकू आहे. इ या बिंदूपासून वजन करावयाची वस्तू टांगली जाते. ईउ ही स्टीलयार्डची दांडी असून तीवर क हे सरकविता येणारे वजन आहे. व वजनाच्या वस्तूचा समतोल साधताना क ला (व१ निश्चित वजनाचे) ऊ या ठिकाणी सरकवावे लागले, तर तरफेच्या तत्त्वाप्रमाणे व आणि आइ यांची मूल्ये बदलत नसल्यामुळे  

व. आइ = व आऊ 

वजन व हे आऊ ला सम प्रमाणात राहते. ईउ वर सारख्या अंतरावर रेषा आखल्या असल्यामुळे क (व) जेथे असेल तेथील वाचन केल्याबरोबर व चे मूल्य कळते. 

आ. ३. स्टीलयार्डाचा आणखी एक प्रकार : (१) सरकविण्याचे वजन (व१), (२) वजन करावयाची वस्तू (व), (३) टेकू, (४) सुरीधारा.आ. ४. वजन दांडी (वे बीम) : (१) लोखंडी चौकट, (२) सुरीधारा, (३) वजने ठेवण्याचा आकडा, (४) भार, (५) सरकविण्याचे लहान वजन, (६) सरकविण्याचे मोठे वजन.आ. २. मध्ये दाखविलेल्या स्टीलयार्डला एका टोकापासून जवळ पण भिन्न भिन्न ठिकाणी पट्टीच्या वर एक व दुसरा खाली असे दोन आकडे बसवलेले असतात. त्या आकड्यांनी यार्ड टांगता येतो. यार्डाच्या पट्टीस दोन्ही बाजूंना प्रत्येक टेकूपासून दुसऱ्या टोकापर्यंत सारख्या अंतरावर रेषा आखलेल्या असतात. आ. १ प्रमाणे यावर एक सरकविले जाणारे वजन (३) असते. यात फायदा एवढाच की, आखलेल्या दोन बाजूंपैकी जरूर वाटेल ती बाजू वापरता येते. वजन करण्याची कार्यपद्धती सारखीच असते. आ. ३ मधील रचना किंचीत वेगळी पण कार्यतत्त्व पहिल्या दोघांसारखेच आहे. 

वजन दांडी: (वे बीम). आ. ४ मध्ये लोखंडी चौकटीच्या डावीकडील उभ्या लहान बाजूच्या मध्यापासून निघालेल्या, आडव्या लांब पट्टीवर वस्तू अडकविण्यासाठी व पट्टीसह सर्व चौकट आधारावर टेकण्यासाठी दोन सुरीधारा बसविलेल्या असतात. चौकटीच्या उजव्या उभ्या बाजूच्या मध्यापासून निघालेल्या लहान पट्टीवर एक सुरीधारा असून तीवर सुटी व माहीत असलेली वजने एका आकड्याच्या मदतीने टांगता येतात. तीन सुरीधारा असलेली पट्टी व चौकट खालच्या बैठकीवर उभ्या केलेल्या डाव्या बाजूकडील खांबावर टेकवितात व चौकटासह पट्टीचा समतोल साधला किंवा नाही हे पाहण्यासाठी अगदी उजव्या बाजूला एक सुंदर खांब त्याच बैठकीवर उभा केलेला असतो. चौकटीच्या दोन लांबसमोरासमोरच्या आडव्या पट्ट्यांत वरच्या बाजूस लहान व खालच्या बाजूस मोठे अशी सरकविता येणारी वजने अडकविलेली असतात. या रचनेत माहिती असलेली निरनिराळी वजने उजव्या बाजूच्या आकड्यात घालता येण्याची सोय असल्यामुळे निरनिराळ्या मोठ्या वस्तूंची वजने करण्याची शक्यता वाढविता येते. सरकविता येणाऱ्या लहान वजनाचा उपयोग ⇨व्हर्नियरच्या मापपट्टीप्रमाणे वजन अधिक अचूक मोजण्यासाठी होतो.


आ. ५ मोठ्या भाराच्या वस्तूचे वजन करणारा फलाट वजनमापक : (१) वजन करावयाची वस्तू, (२) वजने, (३) सुरीधारा, (४) निलंबन प्रणाली, (५) फलाट. फलाट वजनमापक : आ. ५ मध्ये दाखविलेल्या फलाट प्रकारच्या वजन मापकात वजन करावयाची वस्तू एका सपाट पृष्ठावर (फलाटावर ठेवतात. या पृष्ठाखाली तरफा बसविलेल्या असतात. पृष्ठावर पडलेले वजन अखेर कसे मोजले जाते ते आकृतीत दाखविले आहे. मोठ्या वजनाच्या एक दशांश किंवा त्याहून लहान भागाचे (समजा १/२०) वजन आकृतीत दाखविल्याप्रमाणे टांगलेल्या आकड्यावर ठेवल्यास समतोल साधला जातो. याकरिता अ=१० आ (किंवा अ=२० आ) ठेवतात, तसेच आ/इ = ई/उ असते.  

आ. ६. स्वयंदर्शक लंबक वजन यंत्र : (१) वस्तू पारड्यात ठेवण्यापूर्वीची स्थिती, (२) वस्तू पारड्यात ठेवल्यावर होणारी स्थिती : (अ) लंबक (आ) अर्धवर्तुळाकार तुकडा (इ) वजन करावयाची वस्तू ठेवण्याचे पारडे.स्वयंदर्शक वजन यंत्रे: लंबक-विरोधक : वजनाचे प्रत्यक्ष वाचन करता येईल, अशा तऱ्हेच्या एका यंत्राचा आराखडा लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) यांच्या लिखाणात सापडला आहे. एका अर्धवर्तुळाकृती लाकडाचा किंवा धातूचा तुकडा वर्तुळमध्यापासून टांगून तेथूनच दोरीने एक लंबक टांगलेला असतो. अर्धवर्तुळाच्या व्यासच्या एका हलके पारडे टांगलेले असते. ज्याचे वजन करावयाचे अशा वस्तू त्यात ठेवतात. अर्थात या यंत्राने फार लहान वस्तूचेच वजन करता येते. वस्तूच्या वजनामुळे तो अर्धवर्तुळाकृती तुकडा फिरला जाऊन समतोल रहातो. माहीत असलेली लहान लहान वजने घालून तो तुकडा कोणत्या ठिकाणी समतोलात रहातो हे पाहून लंबकाच्या दोरीच्या खाली त्या त्या वजनाचे अंकन करण्यात येते. दुसऱ्या अशाच लहान वस्तूचे अज्ञात वजन काढण्यासाठी वस्तू पारड्यात टाकल्यावर तुकडा किती फिरला व वस्तूचे वजन किती आहे, हे लंबकाच्या दोरीखालील अंकांच्या वाचनाने कळते (आ. ६). 

आ. ७. स्वयंदर्शक काट्याचा एक प्रकार : (१) आकड्याने जोडलेली वजन करावयाची वस्तू, (२) अंकन केलेले लंबक वजन, (३)दर्शक काटा (याच्या मापक पट्टीवरील वजनदर्शक रेषा समान अंतरांवर नाहीत).ह्याच तत्त्वावर आधारित पण थोडी मोठी वजने दर्शककाट्याच्या साहाय्याने प्रत्यक्ष वाचन करून कळतील अशा यंत्राचे दोन प्रकार आ. ७ व आ. ८ मध्ये दाखविले आहेत. 

आ. ७ मध्ये दर्शक काट्याखालील मापक पट्टीवरील रेषा समान अंतरांवर नसतात. आ. ८ मध्ये वजन टांगण्याची रचना भिन्न केलेली असल्यामुळे त्या रेषा समान अंतरावर असतात. आ. ७ व ८ या दोन्ही आकृत्यांत सरळ तरफेच्याऐवजी वक्र तरफ वापरली आहे. उजव्या बाजूस वजन लावल्यानंतर टेकूभोवती ही वक्र तरफ फिरते आणि डाव्या बाजूकडील लंबकाचे वजन उंचावले जाऊन तरफ समतोलावस्थेत येते. तरफेच्या कार्यकारी तत्त्वाप्रमाणेच येथेही डाव्या बाजूकडील प्रेरणेचे परिबल (लंबक वजन × आ) उजव्या बाजूकडील प्रेरणेच्या परिबलाएवढे (वस्तूचे वजन × अ) असते. सरळ तरफ यांच्या समतोल अवस्थेतील फरक एवढाच की, पहिला समतोल क्षितीजसमांतर दिशेत असावा लागतो, तर दुसऱ्यात तशी आवश्यकता नसते. लंबकाचे वजन टांगलेल्या अज्ञात वजनाला एका अवस्थेत तोलून धरते म्हणजेच वजनाला विरोधक बनते.  

आ. ८. स्वयंदर्शक काट्याचा दुसरा प्रकार : (१) बाह्यरेखित कॅम व फीत यांच्याद्वारे जोडलेली वजन करावयाची वस्तू, (२) कॅम, (३) अंकन केलेले लंबक वजन, (४) दर्शक काटा (याच्या मापक पट्टीवरील वजन दर्शक रेषा समान अंतरावर आहेत).आ. ७ मध्ये लंबकाच्या वजनाचे परिबल फिरलेल्या कोनाच्या ‘ज्या’ गुणोत्तरावर [⟶ त्रिकोणमिती] अवलंबून असल्यामुळे मापक पट्टीवरील रेखांकन असमान असते पण वजन अडकविण्याची रचना आ. ८ मध्ये दाखविल्याप्रमाणे केल्यावर हे रेखांकन समान होते.  

या यंत्राचा मुख्य फायदा म्हणजे समभुज तराजूप्रमाणे पारड्यात वजन घालण्याची जरूरी नसते किंवा स्टीलयार्डाप्रमाणे दांडीवरील लहान वजन सरकविण्याची गरजही नसते हा होय. या युक्तीमुळे वस्तूचे प्रत्यक्ष वजन होत असल्यामुळे वजन करण्यास वेळ लागत नाही. 

आ. ९. लंबक-विरोधक वजन यंत्र : (१) मापक पट्टी, (२) दर्शक काटा, (३) सरकणारे वजन, (४) लंबक, (५) वजन करावयाची वस्तू, (सुरीधारा) (६) सुरीधारा.

आ. ५ च्या रचनेत वरील युक्तीचा समावेश केलेल्या यंत्राच्या रचना आ. ९ व आ. १० मध्ये दिल्या आहेत. यात लांब दांडीवर एक सरकणारे वजन असल्यामुळे यंत्राची वजनक्षमता वाढविता येते.  


आ. १०. दोन लंबक-विरोधक असलेले वजन यंत्र : (१) मापक पट्टी, (२) दर्शक काटा, (३) दर्शक काटा हालविणारी यंत्रणा, (४) लंबक, (५) कॅम, (६) फीत, (७) संदमक प्रयुक्त (दांडीची आंदोलने थांबवण्यास मदत करणारी प्रयुक्ती), (८) वजन यंत्राची क्षमता वाठविण्यासाठी सरकणारे वजन (९) अभंढाकरिता सरकणारे वजन, (१०) अभंडाकरिता दांडी, (११) अभंड दांडीची तरफ, (१२) वजन यंत्राची कक्षा वाढविण्यासाठी लावण्यात येणारी वजने, (१३) तरफांकडे जाणारा दांडा.आ. १० मधील यंत्र आ. ९ पेक्षा जरा वेगळ्या रचनेचे आहे. मोठमोठी वजने ठेवण्यासाठी असलेला सपाट पृष्ठभाग व त्याखाली असलेल्या बहुविध तरफांची गुंतागुंत या आकृतीत दाखविलेली नाही पण तरफांकडून येणारी प्रेरणा एका दांड्याने दाखविली असून दोन लंबकांनी व उजव्या बाजूस असलेल्या वजनांनी समतोल राखला जाऊन मोठ्या वजनाचे प्रत्यक्ष वाचन कसे होते याची रचना दाखविली आहे. 

 स्प्रिंग काटे : तरफेच्या तत्त्वाव्यतिरिक्त ⇨स्थितिस्थापकतेच्या तत्त्वावर आधारित असलेले स्प्रिंग काटे तयार करण्यात आले आहेत. मळसूत्राकार स्प्रिंगांना वजन टांगल्यास त्या लांबतात व त्यांच्या लाबण्याचे मान काही मर्यादेपर्यंत वजनास सम प्रमाणात असते. योग्य प्रकारे तपासून घेतलेल्या स्प्रिंगांभोवती तबकड्या बसवून त्यांवर वजनाचे आकडे टाकतात आणि तबकडीवर दर्शक काटा फिरेल व वजणाचे प्रत्यक्ष वाचन करता येईल, अशी योजना केलेली असते. नेहमीच्य पोलादी स्प्रिंगांवर तापमान बदलाचा परिणाम होत असल्यामुळे काही विशिष्ट मिश्रधांतुंच्या व रचनेच्या स्प्रिंगा बनविल्या जातात. त्यांच्यावर तापमान बदलाचा परिणाम नगण्य असतो. अशा स्प्रिंगकाट्यांनी शेकडो किग्रॅ. वजन मोजता येते. मिश्र व बहुविध रचनेच्या तरफांना अशा स्प्रिंगांची जोड देऊन वजन यंत्रे बनविण्यात आली असून त्यांच्या साहाय्याने काही टनांपर्यंत वजन करता येते. अशा यंत्रातील स्प्रिंगांची रचना आ. ११ मध्ये दाखविली आहे. काट्यावर वजन ठेवल्यामुळे जे कंपन सुरू होते ते नाहीसे करण्याकरता एक संदमक प्रयुक्ती जोडलेली असते. त्यामुळे दर्शक काट्यात कंप निर्माण न होता तो सुरळीत फिरतो. 

आ. ११. स्प्रिंग काटा (मिश्र तरफांची जोडणी असलेला) : (१) स्प्रिंग, (२) दर्शक काटा हालविणारी यंत्रणा, (३) दर्शक काटा, (४) अंकन केलेली तबकडी, (५) संदमक प्रयुक्ती, (६) तरफांना जोडलेला दांडा.

आ. १२. द्रवीय भार घट : (१) भार (मोजावयाचे वजन), (२) दट्ट्या, (३) सिलिंडर शीर्ष, (४) तेल, (५) पटल, (६) वजन दर्शविण्यासाठी बूरदाँ किंवा अन्य दाबमापकाकडे.भार घट : जलीय किंवा द्रवीय गुणधर्मावर आधारलेले घट वापरून मोठमोठी वजने मोजण्याची ही एक प्रयुक्ती आहे. बंदिस्त असलेल्या जलावर किंवा द्रवावर दिलेला दाब कमी न होता तो सर्व दिशांना सारख्या प्रमाणात प्रसारित होतो, या तत्त्वावर ही प्रयुक्ती आधारित आहे. द्रवीय भार घटावर जर एखादे मोठे वजन ठेवण्याची व्यवस्था केली व त्यामुळे घटात निर्माण झालेला दाब दाबमापकाने मोजला, तर दाब व प्रेरणा यांच्या संबंधावरून घटावर ठेवलेल्या वजनाचे मापन करता येते. द्रवीय भार घटाची रचना आ. १२ मध्ये दाखविली आहे.

द्रवीय भार घटाप्रमाणेच वायवीय भार घटाने मोठ्या वजनाचे मापन करता येते. त्याची रचना आ. १३ मध्ये दाखविली आहे. 

आ. १३. वायवीय भार घट : (१) भार (मोजावयाचे वजन), (२) भार फलाट, (३) वजन किंवा नियंत्रित हवा दर्शविणारा दाबमापक, (४) दाब नियंत्रक, (५) हवेचा पुरवठा.

द्रायुस्थितिक पद्धती :द्रायुस्थितिक पद्धतीने [⟶द्रायुयामिकी] कित्येक वेळा लहान जहाजात किंवा बोटीत ठेवलेल्या अवजड सामानाचे ढोबळ मानाने वजन करता येते. जहाजात वजन घालण्यापूर्वी त्याच्या बाहेरील बाजूस पाण्याची पातळी कोठपर्यंत आहे याची नोंद करतात आणि नंतर त्यात माहित असलेली मोठमोठी वजने घालतात व पाण्याची पातळी किती वर चढली याची नोंद करतात. सामानाने जहाज भरल्यावर पाण्याची पातळी किती वर चढली हे पाहून, वरील प्रमाणाने, भरलेल्या सामानाचे ढोबळ मानाने वजन करता येते. अशा पद्धतीने शहाजी महाराजांनी एका हत्तीचे वजन केले होते, अशी दंतकथा आहे. 


आ. १४ प्रतिविकृतिमापक : स्तंभ प्रकार : (१) भार, (२) पोलादी स्तंभ (उभा दांडा), (३) प्रतिविकृतिमापक क१ (प्रतिविकृतिमापक क२ विरूद्ध बाजूवर), (४) प्रतिविकृतिमापक अ­१ (प्रतिविकृतिमापक अ२ विरुद्ध बाजूवर).आ. १५. प्रतिविकृतिमापक : तुळई प्रकार : (१) भार, (२) पोलादी (आढवी) तुळई क१, क२ अ१, अ२ प्रतिविकृतिमापक.प्रतिविकृतिमापक: तरफेच्या यांत्रिक नियमावर आधारित किंवा द्रायुस्थितिक सिद्धांतावर अवलंबून असलेल्या द्रवीय किंवा वायवीय भार घटासारख्या प्रयुक्तीने मोठी वजने मोजण्याच्या यंत्राव्यतिरिक्त प्रतिविकृतीमापक ही एक निराळ्या प्रकारची प्रयुक्ती आहे. तिचे कार्य वजनामुळे होणाऱ्या विद्युत् रोधाच्या बदलावर अवलंबून असते. पोलादाच्या चौकोनी लांब दांड्याच्या चारी बाजूंस चार विद्युत् रोध तारा चिकटवून त्यांचा ⇨व्हीट्स्टन सेतू तयार करतात व दांड्यावर वजन ठेवण्यापूर्वी सेतूतील समतोल साधतात. दांड्याच्या एका टोकावर मोठे वजन ठेवल्यास दांड्याच्या लांबीत फरक पडल्यामुळे, दांड्याच्या समोरासमोरील बाजूंच्या एका जोडीतील तारांचे आकुंचन होते व त्यामुळे त्यांचा विद्युत् रोध कमी होतो. दुसऱ्या जोडीतील तारा लांबल्या गेल्यामुळे त्यांचा विद्युत् रोध वाढतो व पूर्वीचा समतोल बिघडतो. समतोल पुन्हा साधल्यावर विद्युत् प्रयुक्तीद्वारे एका रेखांकित तबकडीवर दांड्यावर ठेवलेले वजन मोजले जाते. काही वजन यंत्रात विद्युत् रोधातील बदलाचे इलेक्ट्रॉनीय साधनाने विवर्धन केले जाते व वजनाचे अंकीय रूपात अनुस्फुरित संदर्शन (दृश्य प्रकाशरूपात दर्शन) केले जाते. 

आ. १६. व्हीट्स्टन सेतू व तबकडीवर दर्शक काट्याने दर्शविलेले वजन : (१) सरकत्या जोडणीचा तार विद्युत् वर्चस्मापक [⟶विद्युत् वर्चस मापक], (२) विवर्धक, (३) सेवा चलित्र [⟶सेवा यंत्रणा], (४) भारदर्शक, (५) रोहित्र, (६) प्रतिविकृतिमापक.या प्रतिविकृतिमापकाचे दोन प्रकार आ. १४ व आ. १५ मध्ये दाखविले आहेत. आ. १६ मध्ये प्रतिविकृतिमापकांची व्हीट्स्टन सेतूमधील जोडणी दाखविली आहे 

आतापर्यंत वर वर्णन केलेल्या निरनिराळ्या वजन यंत्राची वजनक्षमता किती आहे व शेकडा टक्केवारीत संवेदनक्षमता किती आहे याची कोष्टकात माहिती दिलेली आहे.  

निरनिराळ्या वजन यंत्राची वजनक्षमता व संवेदनक्षमता 

वजन यंत्र 

वजनक्षमता 

संवेदनक्षमता (%)

स्टील यार्ड (आ.१ ते ४) 

शेकडो किग्रॅ.पर्यंत 

०.१० 

(आ.५ व ६)

काही टनांपर्यंत

०.१०

स्वयंदर्शक 

   

लंबक व मिश्र तरफेच्या जोडणीसह (आ.९ व १०) 

काही किग्रॅ. पासून १ ते २ टनांपर्यंत

०.१०

स्प्रिंग तरफेच्या जोडणीसह (आ. ११)

काही किग्रॅ. पासून ७-८ टनांपर्यंत

०.२०

द्रवीय भार घट (आ. १२)

काही किंग्रॅ. पासून २५ टनांपर्यंत

०.२०

वायवीय भार घट(आ. १३)

काही किग्रॅ. पासून १०-१२ टनांपर्यंत

०.२०

प्रतिविकृतिमापक (आ. १४ व १५)

काही किग्रॅ. पासून २०० टनांपर्यंत

०.२०

खंडितपणे व अखंडितपणे वजन करणारी यंत्रे: मोठमोठ्या अनेक प्रकारच्या कारखान्यांत तयार होणाऱ्या मालासाठी लागणारी निरनिराळी द्रव्ये योग्य प्रमाणात खंडितपणे किंवा अखंडितपणे वजन करून घेण्याची आवश्यकता असते. याकरिता वापरीत असलेल्या एका यंत्रात द्रव्याच्या साठ्यातून स्वयंचलित वाहक पट्ट्यावर ठराविक वजन पडल्याबरोबर साठ्यातून द्रव्य पडण्याचे आपोआप थांबते व त्याची नोंद होते आणि पट्ट्यावरील द्रव्य दुसरीकडे टाकले जाते वपुन्हा पहिली क्रिया होते. अशा रीतीने खंडितपणे मोठमोठी वजने करण्याची यंत्रे आहेत. त्यांपैकी एकाची रचना आ. १७ मध्ये दाखविली आहे. 


आ. १७. खंडितपणे वजन करणारे यंत्र : (१) कॅम, (२) पाचर, (३) कंप पावणारे व द्रव्याचा पुरवठा करणारे उपयंत्र, (४) वाहक पट्टा. अखंडितपणे वजन करणाऱ्या यंत्रात द्रव्याचा पुरवठा स्वयंचलित वाहक पट्ट्यावरून होत असताना त्याचे वजन नोंदले जाते व अखेर एकूण किती वजन करण्यात आले याचीही नोंद होते. अशा एका यंत्राची रचना आ. १८ मध्ये दाखविली आहे.

कागद, रबर, प्लॅस्टिक किंवा धातूच्या लांबलचक तक्त्यांचे दर चौरस मीटरचे (किंवा दर चौरस फुटाचे) वजन किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) प्रयुक्तीने कसे मोजण्यात येते हे आ. १९ वरून कळून येईल. 

आ. १८. अखंडीतपणे वजन करणारे यंत्र : (१) संतुलक चलित्र, (२) विद्युत् पुरवठा.न्यक्लिऑनिक वजन यंत्र : हे यंत्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पवई, मुंबई) या संस्थेच्या अणुकेंद्रीय अभियांत्रिकी प्रयोगशाळेत १९७८ मध्ये तयार केले असून त्याच्या साहाय्याने वाहक पट्ट्यावरून पुढे सरकणाऱ्या पदार्थांचे अचूक वजन करता येते. याच्यामुळे खनिजे, दगडी कोळसा, खते, चुनखडी, सिमेंट, वाळू यांचे वजन तसेच सातत्याने दलित्रात (पदार्थांचा चुरडा करणाऱ्या यंत्रात) अथवा भट्टीत ठराविक प्रमाणात पदार्थाचा पुरवठा करणेही शक्य होते. याची अचूकता ±१% पेक्षाही चांगली आहे. 

  

आ.१९. बीटा किंवा गॅमा किरणाच्या शोषणामुळे तक्त्याच्या ठराविक आकारमानाचे वजन करणारे यंत्र : (१) तक्ता, (२) बीटा किंवा गॅमा किरण उद्गन, (३) वजन नोंदक, (४) आयनीभवन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट तयार होणारी ) कोठी.या यंत्राचे स्थूलमानाने आठ भाग आहेत (आ. २०). यात ४०० मिलिक्यूरी किरणोत्सर्गी कार्यप्रवणतेचा सिझियम (१३७) हा गॅमा किरण उत्सर्जक रेखीय उद्गमात वापरल्यामुळे वाहक पट्ट्याच्या संपूर्ण रूंदीवर समान प्रमाणात प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) मिळू शकते. हा रेखीय उद्गम C आकाराच्या चौकटीच्या खालच्या बाजूस बसविला असून वरच्या बाजूस १० लि. आकारमानाची आर्गॉन वायू १.०५ किग्रॅ./सेंमी. दाबाखाली भरलेली आयनीकरण कोठी ठेवलेली असते. या दोहोंमधून निष्क्रिय चाकांनी आधार दिलेल्या वाहक पट्ट्यावरील पदार्थातून ज्या वेळी गॅमा किरण जातात त्या वेळी त्यांची तिव्रता पदार्थांच्या प्रमाणानुसार बदलते व त्यामुळे आयनीकरण कोठीत निर्माण झालेल्या विद्युत् प्रवाहात फरक पडतो. हा विद्युत प्रवाह सु. १०–११ अँपिअराएवढाअसतो. या प्रवाहाचे विवर्धन व रैखिकीकरण करून त्यावरून पदार्थांचे सरासरी वस्तुमान किंवा वजन काढता येते. याशिवाय वाहक पट्ट्याला जोडलेल्या फेरेगणक जनित्रातून दुसरा संदेश मिळविला जातो. पहिला संदेश सदृश दर्शकावर भारणवेग दाखवतो. दुसरा संदेश विद्युत् यांत्रिक गणित्राला पुरवून वाहक पट्ट्यावरून किती टन वजनाचा पदार्थ पुढे सरकला ते गणित्रावरमोजले जाते. 

आ. २०. न्यूक्लिमॉनिक वजन यंत्र : (१) अभिज्ञातक, (२) विवर्धक, (३) रैखिकीकारक, (४) गुणक, (५) संकलक, (६) गणित्र, (७) वेगमापक, (८) फेरेगणक, (९) सिझियम (१३७) उद्गम.या यंत्रात पट्ट्याची लांबी, आकार, दृढता, पट्ट्यावरील ताण यांच्यामुळे तसेच पट्टा व चाके यांचे संरेखन व स्थिरता यांच्यामुळे वजनाच्या अचूकतेत फरक पडत नाही. फेरेगणक जनित्राशिवाय दुसऱ्या कोणत्याही भागाचा पट्ट्यांशी संबंध येत नसल्यामुळे स्तरबद्धतेत फरक पडत नाही तसेच घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या त्रुटींचा संबंध येत नाही. पट्टा न थांबवता यंत्र काढून घेता येते अगर पुन्हा बसवता येते. वजनात ०.५ – १.०० % अचूकता व ०.१ % परिशुद्धता असते. असे यंत्र तुर्भे येथील टाटा औष्णिक शक्ती केंद्रात बसविले आहे.

भारतीय उद्योग: विविध प्रकारचे तराजू भारतात फार पूर्वीपासून तयार होत आहेत. सोन्याचांदीच्या वजनांकरिता तराजूंची निर्मिती करण्यास सतराव्या शतकात काही लोहारांनी दिल्लिमध्ये प्रारंभ केला. हे तराजू भारतात सर्वत्र वापरले जात तसेच अफगणिस्तान, ईजिप्त, श्रीलंका व इतर देशांना निर्यात करण्यात येत असत. 

लोखंडी व लाकडी दांडीचे तराजू भारतात लोहार व कामगीर सर्वत्र बनवितात परंतु त्यांची महत्त्वाची परंपरागत केंद्रे रतलाम, सौरकुंडला, दिल्ली, बनारस, अलिगढ, आग्रा, कानपुर, आंबाला, त्रिवेंद्रम, कोचीन, कन्याकुमारी, कलकत्ता व आसपासचा प्रदेश, जयपुर (भागलपूर जिल्हा, बिहार) वगैरे ठिकाणी आहेत. बहुतेक निर्मिती कुटीरोद्योगाच्या स्वरूपात होते परंतु आधुनिक वजन यंत्रे प्रचारात आल्यापासून परंपरागत दांडीचे तराजू तयार करणाऱ्या उत्पादकाची संख्या घटलेली आहे. 

आधुनिक वजन यंत्रनिर्मिती उद्योग भारतात दुसऱ्या महायुद्धात वाढीस लागला पण त्याची सुरूवात बऱ्याच आधी झाली होती. युद्धापूर्वी द इंडियन मशिनरी कंपनी, कलकत्ता व स्टार आर्यन वर्क्स, लिलुआ (पश्चिम बंगाल) हे दोन प्रमुख उत्पादक होते. युद्धानंतर साखर उद्योगाच्या झालेल्या विकासामुळे वजन यंत्र उद्योगाची उत्पादनक्षमता पुष्कळ वाढली. त्यानंतर स्थिर प्रगती करून हा उद्योग विविध प्रकाराची आणि आकारमानांची व क्षमतेची वजनयंत्रे तयार करीत आहे. १९७४ मध्ये या उद्योगात वजन यंत्राचे निरनिराळे प्रकार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे चार व लघुउद्योगात सु. ५०० कारखाने होते. ॲव्हरी इंडिया लि., कलकत्ता एलिकॉन एंजिनिअरिंग कंपनी लि., वल्लभविद्यानगर, गुजरात जी. जी. दांडेकर मशिन वर्क्स लि., भिवंडी, ठाणे आणि जॉर्ज सॉल्टर्स (इंडिया) प्रा. लि., कलकत्ता हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे कारखाने होते.


आ. २१. इलेक्ट्रॉनीय वजन यंत्रांचे काही प्रकार : (१) इलेक्ट्रॉनीय वैश्लेपिक वजन यंत्र (वजनक्षमता १८० ग्रॅ.), (२) इलेक्ट्रॉनीय बहूद्देशीय वजन यंत्र (वजनक्षमता ३०० ग्रॅ.), (३) किरकोळ विक्रीकरिता वजन यंत्र (वजनक्षमता १५ किग्रॅ): या यंत्रावर वस्तूची एकूण किंमतही दर्शविली जाते, (४) इलेक्ट्रॉनीय अंकीय दर्शक प्रणाली (वजनदर्शक क्षमता ५,००० किग्रॅ.).भारतात घरगुती तराजूंपासून ते अवजड रेल्वे वाहन काट्यांपर्यंत विविध प्रकारची वजन यंत्रे तयार करण्यात येतात. यांपैकी काही महत्त्वाची यंत्रे म्हणजे स्प्रिंगकाटे (यारी वजन यंत्रांसह), अर्ध व स्वयंदर्शक गमक वजन यंत्र, माणसांचे वजनकाटे, स्टीलयार्ड, तबकडीयुक्त वजन यंत्रे, धान्याची वजन यंत्रे, दुधाची वजन यंत्रे, विमानतळावरील प्रवासी सामानाची वजन यंत्रे, रस्ते व रेल्वे यांकरिता वाहनकाटे वगैरे होत. भारतीय मानक संस्थेने फलाट वजन यंत्रे (आयएस–१४३५–१९६०), स्वयंचलित वजन यंत्रे (आयएस–१४३७–१९६७), माणसांची वजन यंत्रे (आयएस–१८५९–१९६१) वगैरे वजन यंत्रांसाठी मानके तयार केलेली आहेत. 

वरील विवेचनात आलेली सर्व प्रकारची वजन यंत्रे योग्य ते फेरबदल करून एकूण २३ प्रकारांत कलकत्ता येथील ॲव्हरी इंडिया लि. ही कंपनी तयार करते. विविध प्रकारच्या कारकान्यांत, उद्योगधंद्यांत व प्रयोगशाळांत शीघ्र गतीने अचूक वजने करता यावीत यासाठी द बॉम्बे कंपनी जपानमधील ए. अँड डी. कंपनीच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनीय वजन यंत्रे तयार करते. यांपैकी काही वजन यंत्रे आ. २१ मध्ये दाखविली आहेत. यांतील काही यंत्रांवर निरनिराळ्या एककांत वजन दर्शविण्याचीही सोय आहे. 

पहा: तरफ तराजू. 

  

 संदर्भ: 1. Colijn, H. Weighing and Proportioning of Bulk Solids Bay Village, Ohio. 1975.

           2. Considine, D. M., Ed., Process,Instruments and Controls Handbook,  New York, 1985.

           3. Considine, D. M. Ross. S. D., Eds., Handbook of Applied  Instrumentation, New York, 1964.

           4. Metalfe, T. J. Griffiths, E. H. Weighing Machines, 3 Vols., London, 1970.

टोळे, मा. ग. होनप, स. न.