ल्होत्से : जगातील चौथ्या क्रमांकाचे पर्वतशिखर. हिमालयाच्या हिमाद्री-ग्रेटर हिमालय-रांगेत नेपाळ-तिबेट (चीन) सीमेवर ते एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेस सु. दीड किमी.वर २७° २८’ उ. अक्षांस व ८६° ५६’ पू. रेखांश यांवर आहे. त्याची उंची सस. पासून ८,५१६ मी. असून तिबेटी भाषेत ल्होत्सेचा अर्थ ‘दक्षिण सुळका’ असा आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेने १९३१ मध्ये या शिखराची नोद ई-१ (एव्हरेस्ट-१) म्हणून केली असून संस्थेच्या मते एव्हरेस्ट शिखराचाच दक्षिणेकडील तो एक सुळका व समूह असावा. अर्न्स्ट राइस आणि फ्रिट्स ल्यूकसिंगर या स्विस प्रतिष्ठानाच्या दोन गिर्यारोहकांनी १८ मे १९५६ रोजी हे शिखर चढून जाण्यात प्रथम यश मिळविले. एव्हरेस्ट चढण्यात यश येईपर्यंत म्हणजे १९५३ सालापर्यंत या शिखरावर चढण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत. या नावाचेच दुसरे एक शिखर त्याजवळच असून त्याची उंची ८,४९७ मी. आहे.
खातु, कृ. का.