व्हासा शहराचे विहंगम दृश्यल्हासा : तिबेट या चीनच्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व तिबेटमधील सर्वांत महत्त्वाचे पविद्र ठिकाण. लोकसंख्या १,३०,००० (१९८७). आग्नेय तिबेटमधील हिमालय पर्वतप्रदेशात सस. पासून ३,६०० मी. उंचीवर, ब्रह्मपुत्रेच्या (त्सांगपो) ल्हासा या उपनदीच्या पश्चिम तीरावर, दार्जिलिंगपासून ईशान्येस ४० किमी. वर सुपीक मैदानी प्रदेशात ल्हासा वसलेले आहे. याच्यासभोवती ओसाड टेकड्या आहेत. ला पास या बोलिव्हियाच्या राजधानीनंतर जगातील सर्वाधिक उंचीवरील ही दुसऱ्या क्रमांकाची राजधानी आहे. येथील हवामान उत्साहवर्धक व आल्हाददायक आहे. 

राजा साँगत्सेन गाम्पो याच्या पूर्वजांनी इ. स. सु. ४०० मध्ये ल्हासाची स्थापना केली असावी. साँगत्सेन गाम्पो याच्या राजवटीतच तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा विशेष प्रसार होऊन जोखांगचे प्रसिद्ध देवालय व पोताला राजवाड्याच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. तिबेटी राज्यकर्त्यांचे काही शतके ल्हास हे मुख्य केंद्र तसेच भिक्षू व लामा यांचे प्रमुख आश्रयस्थान होते. नवव्या शतकाच्या पूर्वार्धात चीनच्या थांग राजवंशाच्या फौजांनी ल्हासा जिंकले. या शतकातच ल्हासा तिबेटची राजधानी बनली. ९४२ मध्ये तिबेटच्या राजाचा खून झाला, तेव्हा राजधानी म्हणून ल्हासाचे स्थान संपुष्टात आले. त्यानंतरच्या काही शतकांत आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या ल्हासाला महत्त्व प्राप्त होऊन तिबेटमधील राष्ट्रीय व धार्मिक केंद्र म्हणून ल्हासा प्रसिद्धी पावले. १६४२ मध्ये ल्हासा पुन्हा केंद्र शासनाचे मुख्य ठाणे बनले. पाचव्या दलाई लामाच्या कारकीर्दीत पोतला राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून लामांचे ल्हासा हे प्रमुख केंद्र बनले.

ल्हासाचे आडवळणी स्थान व तिबेटी आचार्यांची परकीयांबद्दलची पूर्वापार द्वेषभावना यांमुळे परकीयांना, विशेषतः यूरोपीयांना, अनेक वर्षे शहरप्रवेशास मनाई होती. त्यामुळेच ल्हासाला ‘निषिद्ध नगरी’ म्हणून ओळखले जात होते. १९०४ मध्ये कर्नल फ्रान्सिस यंगहजबंड हा एका ब्रिटिश मोहिमेसह ल्हासाला आला. ल्हासाला येणारी हीच पहिली यूरोपीय मोहीम होती. १९११ मध्ये तिबेटमध्ये चीनने शिरकाव केला. त्यापूर्वी ल्हासा हे लामापंथीयांचे मुख्य ठोणे होते व जवळजवळ निम्मी लोकसंख्या लामा भिक्षुक व त्यांच्या अनुयायांची होती. १९५९ मध्ये चीनने तिबेट काबीज करून मठाची सत्ता नष्ट केली. तेव्हा अध्यात्मवादी राज्यकर्ता दलाई लामा याला ल्हासातून पळून जाऊन भारतात आश्रय घ्यावा लागला. तोपर्यंत दलाई लामाचे वास्तव्य ल्हासा येथील पोताला राजवाड्यात असे. त्यामुळेच या राजवाड्याला ‘पॅलेस ऑफ द गॉड्स’ असे म्हटले जाते. चीनाच्या आधिपत्याखाली आल्यानंतर येथील भिक्षूंची संख्या व त्यांचा प्रभाव बराच कमी झालेला दिसतो. तसेच अनेक मठ व संस्था बंद करण्यात आल्या किंवा त्यांचा विनाश करण्यात आला.

 

चिनी सत्ता येण्यापूर्वी ऐतिहासिक व्यापारी मार्गानी ल्हासाचा भारत, चीन, नेपाळ, भूतान यांच्याशी व्यापार चाले. तसेच हस्तव्यवसायांव्यतिरिक्त येथे केवळ दारूगोळा कारखाना व टाकसाळ होती. चिनी राजवटीत शहरात अनेक शाळा, रुग्णालये, विद्युत्केंद्र, विविध वस्तुभांडारे, जनता बँक व कारखाने यांची स्थापना करण्यात आली. शहरात नवीन रस्ते तयार करण्यात येऊन शहराजवळ नदीवर पूल बांधण्यात आला. तिबेट व चीनमधील महत्त्वाच्या ठिकाणांशी हे रस्त्यांनी जोडण्यात आले. तसेच इतरही बऱ्याच सुधारणा व बदल घडवून आणले गेले. त्यामुळे पूर्वीपेक्षा शहर अधिकच स्वच्छ बनले. रसायने, विद्युत् मोटारी, चर्मशोधन, लोकरप्रक्रिया, औषधे, खते, सिमेंट, मोटारदुरुस्ती, ट्रॅक्टरजुळणी, जवळपास सापडणारे सोने व तांबे यांवरील प्रक्रिया, रग आणि गालिचानिर्मिती इ. लघुउद्योग शहरात स्थापन झालेले आहेत. ल्हासा हे तिबेटमधील प्रमुख व्यापारी केंद्र असून ते रस्त्यांनी चिंगहाई, सेचवान, सिंक्यांग-ऊईगुर या चीनच्या स्वायत्त प्रदेशांशी, चीनच्या उर्वरित प्रदेशांशी तसेच भारत, नेपाळ या देशांशी जोडलेले आहे. त्यामुळे ल्हासाचा व्यापारही वाढला आहे. ल्हासा-ग्यांगत्से हा रस्ता जुना असून त्यामार्गे भारताशी संपर्क साधता येतो. येथे विमानतळही उभारण्यात आला आहे. शहरातील बहुतांश तिबेटी लोक याक व मेंढ्यांच्या लोकरीपासून कपडे विणणे आणि मातीची भांडी तयार करण्याच्या उद्योगात गुंतलेले असतात. नेपाळी कुशल सुवर्णकार व रौप्यकार, तर मुस्लिम मुत्सद्दी व्यापारी आहेत. चीन राजवटीने १९८० नंतर विदेशी व्यापाराकरिता ल्हासा पुन्हा खुले केले. चीन राजवटीपूर्वी ल्हासा हे भारत, नेपाळ म्यान्मार (ब्रह्मदेश) चीन, भूतान, सिक्कीम यांच्याशी चालणाऱ्या कारवान व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्यावेळी चीनकडून चहा व रेशीम, भारताकडून कापड, धातू विविध वस्तू, सिक्कीम व भूतानकडून तांदळाची आयात केली जाई व ल्हासामधून लोकर, कातडी, कस्तुरी व सोने निर्यात केले जाई.

शहरात अनेक मठ, मंदिरे व आश्रम आहेत. त्यामुळेच ल्हासाचे पवित्र स्थळ म्हणून विशेष माहात्म्य वाढले. शहर बरेच दाटीवाटीने वसलेले दिसते. बहुतांश घरे दगड-विटांमध्ये बांधलेली, कमी उंचीची, सपाट छपरांची आढळतात. खिडक्यांना काचांऐवजी तेलकागद वापरला जातो. शहराजवळच पोताला टेकडी आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत टप्प्याटप्प्याने बांधण्यात आलेल्या तांबड्या व पांढऱ्या  इमारतींमुळे ह्या टेकडीचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. दोन्ही बाजूंकडून असलेल्या रुंद, नागमोडी, दगडी रस्त्यांनी या टेकडीवर जाता येते. याच टेकडीवर सोनेरी छताचा अकरा-मजली प्रसिद्ध पोताला राजवाडा आहे. दूर अंतरावरूनही तो दिसू शकतो. त्यात श्रोतृगृह, स्वागतकक्ष अशा अनेक दालनवजा खोल्या आहेत. वास्तुशिल्पाचा हा एक जगप्रसिद्ध उत्कृष्ट नमुना आहे. येथेच दलाई लामांचे वास्तव्य असे. येथील रेड पॅलेसमध्ये पूर्वीच्या दलाई लामांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. शहराच्या मध्यभागी जोखांग मंदिर आहे. राजा साँगत्सेन गाम्पो याने ६५२ मध्ये ते बांधून घेतल्याचे सांगितले जाते. तिबेटमधील हे एक अत्यंत पवित्र धार्मिक ठिकाण मानले जाते. तिबेटमध्ये चीनचा प्रवेश झाल्यापासून काही काळ या मंदिराचा अतिथिभवन म्हणून वापर केला जाई. चिनी राजवटीत इतरही काही बौद्ध मंदिरे केवळ शोभेच्या जागा राहिल्या होत्या. शहरात अनेक मठ असले, तरी प्रसिद्ध मठ शहरापासून काही किमी. अंतरावर आहेत, आग्नेयीस ५८ किमी. वर साम्ये मठ (इ. स. ७७०), पूर्वेस ४० किमी. वर गाल्डन मठ, पश्चिमेस १० किमी. वर ड्रेपुंग मठ, उत्तरेस ५ किमी. वर से-रा मठ हे विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांशिवाय शहरातील क्लू खांग मंदिर, नॉरबू-ग्लिंग-का (जेवेल पॅलेस) व ब्रास-स्पंग्ज (ड्रेपुंग) मठ या वास्तू उल्लेखनीय आहेत. येथे एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. ल्हासामध्ये सद्या तिबेटी लोकांबरोबरच चिनी लोकांची संख्याही भरपूर आहे. त्याशिवाय काही नेपाळी व लडाखी लोकही आढळतात.

चौधरी, वसंत