ल्यूव्हील, झोझेफ : (१४ मार्च १८०९-८ सप्टेंबर १९९२). फ्रेंच गणितज्ञ. गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत व अवकल भूमिति [⟶ भूमिति] या विषयांत त्यांनी विशेष महत्त्वाचे कार्य केले.

ल्यूव्हील यांचा जन्म सेंट ओमर येथे झाला. १८२७ मध्ये से पॅरिल येथील एकोल पॉलिटेक्निकमधून पदवीधर झाले. १८२८-३० या काळात त्यांनी ॲकॅदेमी दे सायन्सेसला विद्युत् सिद्धांत, उष्णतेचा वैश्लेषिक सिद्धांत व गणितीय विश्लेषण या विषयावंर एकूण सात संस्मरणिका सादर केल्या. ते १८३३ मध्ये एकोल पॉलिटेक्निकमध्ये, १८३८ मध्ये सॉर्बॉन येथे व पुढे १८५१ साली कॉलेज द फ्रान्समध्ये गणिताचे प्राध्यापक झाले. १८७९ पावेतो त्यांनी अध्यापन कार्य केले.

ल्यूव्हील यांचे कार्य सु. ४०० संस्मरणिका व नोंदी या स्वरूपात आहे व यांपैकी २०० हून अधिक संख्या सिद्धांतावरील आहेत. मात्र हे कार्य संग्रहित रूपात प्रसिद्ध झालेले नाही. १८३२-३३ मध्ये त्यांनी बैजिक फलनांच्या [⟶ फलन] वैश्लेषिक स्वरूपाबद्दलच्या निकषासंबंधी संशोधन केले. त्यांनीच प्रथम १८४४ मध्ये बीजातीत संख्यांचे (परिमेय संख्या सहगुणक असलेल्या कोणत्याही बहुपदी समीकरणाची बीजे नसलेल्या अपरिमेय संख्यांचे उदा., c, π)  अस्तित्व सिद्ध केले आणि अशा अनंत संख्या निदर्शित करण्याच्या पद्धती योजल्या. त्यांनी ⇨ अवकल समीकरणे व मर्यादा-मूल्य प्रश्न या विषयांतही महत्त्वाची कामगिरी केली. या विषयांतील त्यांच्या पद्धती विसाव्या शतकात गणितीय भौतिकीत व समाकल समीकरण सिद्धांतात [⟶ समाकल समीकरणे व रूपांतरे] फार महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यांचे मर्यादा-मूल्यांसबंधी कार्य आता ‘स्ट्यूर्मल्यूव्हील सिद्धांत’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या सिद्धांताचा भाग बनलेले आहे. अवकल भूमितीत त्यांनी मुख्यत्वे पृष्ठे व अनुरूपी रूपांतरणे यांच्या उपयोजितेसंबंधी कार्य केले. हॅमिल्टोनीय गतिकीच्या [⟶ यामिकी] माप-परिरक्षक गुणधर्मांसंबंधीचे ल्यूव्हील प्रमेय सांखिकीय यामिकीत [⟶ सांख्यिकीय भौतिकी] व माप सिद्धांतात [⟶ माप व समाकलन] आधारभूत ठरले आहे. ल्यूव्हील यांनी अल्पांतरीय वक्रतेची संकल्पनाही मांडली [⟶ भूमिति : अवकल भूमिति]. १८५७-८२ या काळात त्यांनी संख्या सिद्धांतात केलेले बहुतेक कार्य त्यांनी मिळविलेली विस्मयकारक फले कोणत्या प्रकारे मिळविली याचा निर्देश न करताच प्रसिद्ध झाले तथापि या फलांची सत्यता नंतर सिद्ध झाली. हे त्यांचे कार्य बहुतांशी संख्यात्मक फलने, द्विधाती रूपातील निदर्शन व समता फलनांची व्यापक सूत्रे यांसंबंधीचे  होते. गणितीय विश्लेषणात त्यांनी सदसत् चलांच्या वैश्लेषिक फलनांच्या [⟶ फलन  ] सिद्धांतामध्ये  व्यापक प्रमेयांवरून (यात त्यांच्या स्वतःच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या प्रमेयाचाही समावेश होतो) द्वि-आवर्ती फलनांच्या सिद्धांताचे प्रथमच निगमन केले. त्यांनी ⇨ खगोलीय यामिकी, बैजिक समीकरणे, अमूर्त बीजगणित, ⇨ गटसिद्धांत वगैरे विषयांमध्येही कार्य केले.

ल्यूव्हील यांनी १८३६ मध्ये Journal de Mathematiques Pures et Appliquees या नियतकालिकाची स्थापना केली. Journal de Liouville या नावानेही ओळखण्यात येणाऱ्या या प्रभावी गणितीय नियतकालिकाचे त्यांनी सु. ४० वर्षे संपादन केले. या नियतकालिकामुळे एकोणिसाव्या शतकात फ्रेंच गणिताचा दर्जा उंचावण्यात व तो टिकविण्यास बहुमोल मदत झाली.⇨एव्हारीस्त गाल्वा (१९११-३२) यांचे बहुतेक निबंध ल्यूव्हील यांनी प्रथमच या नियतकालिकात १८४६ मध्ये प्रसिद्ध केले. या नियतकालिकात अँपिअर, डीरिक्ले, स्ट्यूर्म, याकोबी वगैरे त्या काळातील प्रख्यात गणितज्ञांचे कार्य प्रसिद्ध झाले. १८३९ मध्ये ल्यूव्हील यांची ॲकॅदेमी दे सायन्सेसच्या खगोल विभागाचे सदस्य म्हणून निवड झाली आणि १८४० साली ते ब्यूरो द लाँजिट्यूड्सचे सिमेआँ प्वासाँ यांच्या जागी सभासद झाले. व्यूव्हील पॅरिस येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज. भदे, व. ग.