चार्ल्स हरमाईटहरमाईट, चार्ल्स : (एर्मीट, शार्ल). (२४ डिसेंबर १८२२–१४ जानेवारी १९०१). फ्रेंच गणितज्ञ. त्यांनी गणितातील विविध विषयांवर विशेष संशोधनकार्य केले. या संशोधनकाऱ्याच्या पाठिंब्यामुळे आणि प्रसिद्धीमुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अनेक गणितज्ञांच्या काऱ्याला प्रथमच मान्यता मिळाली.

हरमाईट यांचा जन्म फ्रान्समधील लरेन प्रांतातील ड्यूझ येथे झाला. त्यांनी प्रथम पॅरिस येथील हेन्री कॉलेज व नंतर ल्वी-ल-ग्रांद कॉलेज- मध्ये शिक्षण घेतले. हेन्री कॉलेजमध्ये असताना त्यांच्यावर भौतिकी विषयाचा प्रभाव पडला होता परंतु ल्वी-ल-ग्रांद कॉलेजमध्ये त्यांना अभ्यासाऐवजी लेनर्ड ऑयलर, कार्ल फ्री ड्रि ख गौस आणि झोझेफ ल्वी लाग्रांझ या गणितज्ञांचे ग्रंथ अभ्यासण्याची गोडी लागली. हरमाईट यांनी गणित विषयाची बी.एस्सी. पदवी संपादन केली (१८४८).

हरमाईट यांची पॅरिस येथील एकोल पॉलितेक्निकमध्ये नेमणूक झाली (१८४८). तेथे ते प्रवेश परीक्षांचे परीक्षक होते. त्यांची एकोल नॉर्मल येथे गणितीय विश्लेषणाच्या प्राध्यापकपदी नेमणूक झाली (१८६९). ते १८७० मध्ये सॉरबोन येथे विज्ञान विद्याशाखेत प्रथम बीजगणिताचे व नंतर गणितीय विश्लेषणाचे प्राध्यापक झाले. ते एकोल नॉर्मल (१८७६) आणि विज्ञान विद्याशाखा (१८९७) येथे प्राध्यापकपदी कार्यरत होते.

हरमाईट यांनी ⇨ नील्स हेन्रिक आबेल यांच्या विवृत्तीय फलना-विषयीच्या प्रमेयाचे व्यापकीकरण करून ते अतिविवृत्तीय फलनाकरिता सिद्ध केले. जानेवारी १८४३ मध्ये त्यांनी आपले हे संशोधन ⇨ कार्ल गुस्टाफ याकोप याकोबी यांनापत्राने कळविले. त्यांनी १८५० पर्यंत याकोबी यांना किमान सहा पत्रे लिहिली. यातील दुसरे पत्र ऑगस्ट१८४४ मधील असून ते विवृत्तीय फलनांच्या रूपांतराविषयी होते. इतरचार पत्रे ⇨ संख्या सिद्धांता वर होती. या पत्रांमधील काही भाग ⇨ पेटर गुस्टाफ लअझन डीरिक्ले यांनी संपादिलेल्या याकोबी यांच्या कामावरील दुसऱ्या खंडात आढळतात. हरमाईट यांनी आयुष्यभर तत्कालीन ख्यातकीर्त गणितज्ञांबरोबर बराच पत्रव्यवहार केला व त्याचा त्या काळच्या संशोधनावर मोठा प्रभाव पडला.

हरमाईट यांचे शास्त्रीय संशोधन ⇨ शार्ल एमील पीकार यांनी संकलित करून संपादित करण्याचे काम केले. हरमाईट यांनी आपल्या आयुष्यात निरनिराळ्या कालखंडांत निरनिराळ्या विषयांतील संशोधनावर भर दिला. त्याची विभागणी पुढीलप्रमाणे मांडता येईल : आबेलीय व विवृत्तीय फलने (१८४३–४७) द्विघाती रूपांची अंकगणितीय उपपत्ती व संतत चलांचा वापर (१८४७–५१) निश्चलतांची उपपत्ती (१८५४–६४) आबेलीय फलनांच्या रूपांतरणामध्ये थीटा फलने आणि संख्या सिद्धांत यांचा संबंध (१८५५) पंचघाती समीकरणे, प्रमाणसाधक समीकरणे, वर्ग संख्या यांचा संबंध (१८५८–६४) फलनांचे आसन्नीकरण आणि श या संख्येचे अपरिमेयत्व (१८७३) [→ इ (e)] विवृत्तीय फलनांचे उपयोजनआणि लामे समीकरण (१८७७–८१). हरमाईट यांचे संशोधन द शार्ल एर्मीट या नावाने चार खंडांत प्रसिद्ध झाले. विसाव्या शतकात हेर्मान मिंकोव्हस्की यांनी हरमाईट यांच्या संकल्पना व विचार यांच्यावरआधारित संशोधन आणखी पुढे वाढविले.

हरमाईट १४ जानेवारी १८५६ रोजी सायन्स ॲकॅडेमीचे सभासदम्हणून निवडले गेले. त्यांना अनेक ॲकॅडेमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले तसेच अनेक बहुमानही प्राप्त झाले.

हरमाईट यांचे पॅरिस येथे निधन झाले.

ओक, स. ज. टिकेकर, व. ग.