ल्यर्मंटाव्ह, म्यिखईल : (३ ऑक्टोबर १८१४-१५ जुलै १८४१). रशियन  कवी आणि कादंबरीकार. जन्म मॉस्को येथे. शिक्षण मॉस्को विद्यापीठात (१८३०-३२). त्यानंतर सेंट पीटर्झबर्ग येथे त्याने सैनिकी शिक्षण घेतले. ते पूर्ण केल्यानंतर त्याला शाही रक्षक दलात (इम्पीअरिअल गाई रेजिमेंट) घेण्यात आले. १८३७ साली त्याने लिहिलेल्या ‘ऑन द डेथ ऑफ पुश्किन’ (इं. शी.) ह्या शोककाव्यात त्याने पुश्किनच्या मृत्यूबावत झारच्या दरबाराशी निकट असलेल्या मंडळींना दोष दिल्यामुळे तसेच रशियन उमराव वर्गावर टीका केल्यामुळे त्याला कॉकेशसमध्ये हद्दपार करण्यात आले होते तथापि एका वर्षानंतर त्याला पुन्हा सेंट पीटर्झबर्ग येथे येऊ दिले गेले. कवितेच्या क्षेत्रातील पुश्किनचा वारसदार म्हणून त्याची प्रशंसाही होऊ लागली तथापि १८४० साली फ्रेंच राजदूत आणि इतिहासकार द बारांत ह्याच्या पुत्राशी द्वंद्वयुद्ध केल्यामुळे त्याला पुन्हा कॉकेशसमध्ये हद्दपार केले गेले. कॉकेशियातील प्यत्यीगॉर्स्क वेये मेजर मॉर्टिनॉव्ह नावाच्या एका व्यक्तीबरोबर झालेल्या द्वंद्वयुद्धात तो मरण पावला.

ल्यर्मंटॉव्हने त्याच्या आयुष्यातील अखेरच्या चार-पाच वर्षात केलेल्या साहित्यनिर्मितीवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. ‘डेमन’ (१८३९) आणि ‘मत्सीरी’ (१८४०) ह्या त्याच्या महत्त्वाच्या काव्यकृती. मस्काराद ह्या त्याच्या नाट्यकृतीसही ख्याती लाभली. गिरोइ नाशेव्हो व्ह्रेमिनी (१८४०, इ. भाषांतरे, ए हीरो ऑफ नाउ अ डेज, १९२० ए हीरो ऑफ अवर टाइम, १९२८ आणि  ए हीरो ऑफ अवर ओन टाइम्स, १९४०) ही त्याची कादंबरी.

ल्यर्मंटॉव्हची कविता स्वच्छंदतावादी वळणाची आहे. इंग्रज कवी बायरनचा त्याच्यावर प्रभाव होता. उत्क्रट स्वातंत्र्याकांक्षा आणि नैराश्य ह्यांनी त्याची कविता भारलेली आहे. तो एक वैफल्यग्रस्त आदर्शवादी होता. ‘डेमन’ आणि ‘मत्सीरी’ ह्या काव्यकृतींत त्याच्या परिपक्व प्रतिभेचे दर्शन घडते. गिरोइ नाशेव्हो व्ह्रेमिनी ह्या कादंबरीत एक प्रकारच्या मानसशास्त्रीय वास्तववादाची दृष्टी प्रत्ययास येते. ह्या कादंबरीचा उत्तरकालीन रशियन लेखकांवर मोठा प्रभाव पडला.

संदर्भ :  1. Lavrin Janko, Lermontov, New York, 1959.

            2. Nabokov, Vladimir, Trans. Poems by Pushkin, Lermontov, Tyutchev, London, 1948.

कुलकर्णी, अ. र.