ल्यालपूर : सांप्रत फैसलाबाद. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा विभागातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आणि धान्य-व्यापार व वितरणकेंद्र. लोकसंख्या ११,०४,२०९ (१९८१) होती. हे लाहोरच्या पश्चिमेस सु. १२० किमी. रावी व चिनाव या नद्यांच्या ‘रेचना’ दुआबात वसले असून ते रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी मुलतान व लाहोर या शहरांशी, तर हवाईमार्गाने लाहोर व कराची या शहरांशी जोडलेले आहे.

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील तत्कालीन पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर सर चार्ल्स जेम्स ल्याल ह्याने हे शहर वसविले, म्हणून, त्याच्या सन्मानार्थ शहरास ‘ल्यालपूर’ असे नाव देण्यात आले (१८९५) ते १९७९ पर्यंत प्रचारात होते. सुरुवातीस हे लोअर जिनाव वसाहतीचे मुख्य ठाणे होते. १८९८ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली.

ल्यालपूर ही मुख्यतः कापड व धान्य यांची घाऊक व्यापरपेठ असून कृषिउद्योगांसाठी त्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. शहरात विविध औद्योगिक उत्पादनांबरोबरच इतर व्यवसायही विकसित झाले आहेत. रासायनिक खते, औषधे, साबण, कापड, साखर, फळांचे डबाबंदीकरण, खाद्यतेले, तूप, तयार कपडे, कृषि-अवजारे व यंत्रे, वस्त्रोद्योगाची यंत्रसामग्री इत्यादींची निर्मिती केली जाते. यांशिवाय शहरात कापूस वटण आणि दाबगिरण्या, पीठगिरण्या इ. विकसित झाल्या आहेत.

ल्यालपूरमध्ये प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन अशा शिक्षणाच्या सर्व सुविधा आहेत. येथे पश्चिम पाकिस्तान कृषिविद्यापीठ (स्था. १९६१) असून सात महाविद्यालये पंजाब विद्यापीठाशी संलग्न आहेत. यांशिवाय पशु-पैदास केंद्र, कृषिसंशोधनसंस्था असून दोन सार्वजनिक उद्यानेही आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी येथील क्रीडामैदान प्रसिद्ध आहे.

दळवी, र. कों.