लोणावळा : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील दक्षिण-मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक व थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या ३६,२६० (१९८१). हे पुणे शहराच्या वायव्येस ६४ किमी., सह्याद्रीतील बोरघाटाच्या माथ्यावर सस.पासून ६००-६१६ मी. उंचीवर वसले आहे. दऱ्याखोऱ्यांनी व वृक्षराजींनी सुशोभित बनलेले हे ठिकाण आल्हाददायक हवामानामुळे पर्यटकांचे मोठेच आकर्षण ठरले आहे.
भारतीय उपखंडाची फाळणी झाली (१९४७) त्यावेळी सिंध व पंजाबमधून (सांप्रत पाकिस्तानमधील प्रांत) निर्वासित मोठ्या संख्येने येथे येऊन राहिले होते. येथील नगरपालिका १८७७ मध्ये स्थापन झाली. लोणावळा स्थानकापासून सु. ४ किमी. अंतरावरील तुंगार्ली गावात बांधलेल्या तुंगार्ली धरणातून लोणावळा शहरास पाणीपुरवठा केला जातो.
योगविद्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाकरिता स्वामी कुवलयानंद (१८८३-१९६६) हे थोर शारीरिक शिक्षणवेत्ते व योगविद्येचे प्रयोगशील पुरस्कर्ते. ह्यांनी लोणावळा येथे १९२४ मध्ये ‘कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था उभारली. हिला जोडूनच ‘श्री नटवरसिंह रुग्णविज्ञानशाला’ नामक एक रोगचिकित्सा संस्थाही स्थापण्यात आली. आध्यात्मिक मार्गदर्शन, आध्यात्मिक शिबिरांचे संयोजन, योगमीमांसा त्रैमासिकाचे संपादन व प्रकाशन, नागरिकांसाठी धर्मार्थ औषधालय, कैवल्यधामसंचालित यौगिक प्रशिक्षण देणारे योगमहाविद्यालय-यो गाचे सर्वांगीण प्रशिक्षण देणारे भारतातील एकमेव महाविद्यालय-इत्यादींमुळे कैवल्यधामची कीर्ती देशविदेशांत पसरली आहे. लोणावळ्याच्या ‘आयएनएस् शिवाजी’ या नौकेवर नाविक अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाते. यामुळेही शहराचे महत्त्व वाढत गेले आहे. येथे मुलामुलींचे वसतिगृह-विद्यालय (गुरुकुल-विद्यालय) १९४९ पासून कार्यशील आहे. १९६२ पासून ते स्वतःच्या भव्य वास्तूत ‘गुरुकुल’ शिक्षणकार्य पार पाडत आहे. विद्याप्रसारिणी सभेची इंग्रजी व मराठी माध्यमांतून शिक्षण देणारी तीन विद्यालये तसेच एक महाविद्यालयही आहे. शहरात पारशी, खोजा, बोहरा आदींची अनेक आरोग्यभुवने आहेत.
लोणावळा येथे रंग-निर्मितीचा एक कारखाना असून टाट विद्युत् योजनेचे कार्यालयही येथेच आहे. नगरपालिकेचे विश्रामगृह, बगीचे, मोफत वाचनालय, दवाखाने, अनेक हॉटेले, निवासगृहे, चर्च इ. सुविधा येथे आहेत. लोणावळा येथे बनविण्यात येणारी ‘चिक्की’ प्रसिद्ध आहे. येथे एक औद्योगिक वसाहत स्थापण्यात आली आहे.
लोणावळ्याच्या नैर्ऋत्येस ४.८ किमी.वर टायगर्स लीप (व्याघ्रउडी), तर पश्चिमेस चार किमी.वरील ‘नागफणी’ (ड्यूक्स नोज) ही प्रेक्षणीय पर्यटन-स्थाने आहेत. लोणवळयापासून सु. ८ किमी. वर लोहगड-विसापूर हे किल्ले, पूर्वेस सु. ८ किमी.वरील भाजे, तर तेरा किमी. वरील कार्ले ही प्राचीन बौद्ध लेण्यांकरिता सुविख्यात स्थाने आहेत. कार्ल्याचा चैत्यगृह भव्य आकाराचा आहे. लोणावळ्याच्या आसमंतातील कपासारख्या खोलगट आकाराचे तुंगार्लीचे तळे, तसेच वळवण, शिरोटा यांसारखी तळी आकर्षक व नयनरम्य सृष्टिसौंदर्यामुळे पर्यटकांची आवडीची स्थाने बनली आहेत. लोणावळ्यापासून सु. तीन किमी.वरील सस.पासून सु. ५४४ मी. उंचीवरील खंडाळा येथेही बैरामजी पॉइंटसारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. ह्या ठिकाणाहून सह्य पर्वतराजीची निसर्गशोभा रमणीय दिसते. वायव्येस पराह व उल्हास नद्यांची खोरी, पूर्वेकडील उल्हास व इंद्रायणी नद्यांदरम्यानच्या खुज्या टेकड्या, दक्षिणेस भीमउंबरी डोंगर अशा निसर्गनवलाईने नटलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य सर्वांनाच मुग्ध करून सोडते.
गद्रे, वि.रा. सावंत, प्र. रा.
“