लोच : (मुरी, मोरी, मऱ्ही). कोबिटीडी कुलातील कोणत्याही लहान, सामान्यतः  लांबट, गोड्या पाण्यातील माशाला लोच म्हणतात. त्यांच्या २०० पेक्षा अधिक जाती माहीत आहेत. त्या बहुतेक मूळच्या मध्य व दक्षिण आशियातील आहेत परंतु तीन जाती यूरोपमध्ये आढळतात व एक उत्तर आफ्रिकेत सापडते. प्रारूपिक (नमुनेदार) लोचचे खवले फार लहान असतात व तोंडाभोवती मिशांसारख्या राठ केसांच्या ३ -६ जोड्या असतात. यूरेशियातील काटेरी लोचसारख्या काही जातींत प्रत्येक डोळ्याजवळ एक लहान, आखूड काटा असतो.

लोच मासे चिवट, सामान्यतः निशाचर असून संथ व वाहत्या पाण्यात तळाला राहतात. ते आपल्या मिशांनी तळावरील कृमी, कीटकांच्या अळ्या व इतर अन्न मिळवितात. उथळ व तुंबलेल्या डबक्यात ते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ येऊन हवा पोटात घेतात. नंतर त्यांची आतडी ऑक्सिजन शोषून घेतात व अशा विशेष रीतीने श्वसनास मदत होते. त्यामुळे ते गढूळ व ऑक्सिजन कमी असलेल्या पाण्यात जगू शकतात.

जलजीवालयात ठेवण्यासाठी पुष्कळ आशियाई जाती लोकप्रिय आहेत. त्यांच्यापैकी विदुषक लोच (बोटिया मॅक्रॅकँथा) हा नारिंगी रंगाचा असून १३-३० सेंमी. लांब असतो व त्याच्या शरीरावर उभे तीन काळे पट्टे असतात. हमाल (कुली) लोच (अकँथोप्थॅलॅमस कुली) ईलसारखा, फिकट गुलाबी रंगाचा, सु.८सेंमी. लांब असून त्याच्या अंगावर पुष्कळ उभे काळे पट्टे असतात. अश्म (स्टोन) लोच (नूमॅकायलस बॉर्बट्युला) व काटेरी लोच या दोहोंच्या अंगावर विभिन्न रंगांचे ठिपके, चट्टे किंवा छटा असतात, तसेच ते पिवळ्या व तपकिरी रंगाचे, सु. १३  सेंमी. लांब असून ते यूरोपात व उत्तर आशियात आढळतात. यूरोपीय वेदरफिश (मिसगुरनस फॉसिलिस) पिवळसर रंगाचा, सु. २५ सेंमी. लांब असून त्याच्या अंगावर तपकिरी पट्टे व लहान ठिपके किंवा खुणा असतात. जपानी वे दरफिशप्रमाणे (मिसगुरनस अँग्विलिक्वॉडेटस) यूरोपीय वेदरफिशची वादळापूर्वी हालचाल वाढलेली असते म्हणून त्यांना वेदरफिश (हवामान मासा) नाव पडले आहे.

महाराष्ट्र राज्यात त्यांच्या लेपिडोसेफॅल सायलोऱ्हिंकस, पॅरासायलोऱ्हिंकस, नेमॅकायलस, नेमॅकायलिहक्थिसबोटिया या सहा प्रजाती आढळतात. त्यांचे मऱ्ही (मुरी) हे नावकोकण विभागातील आहे. चिकली व मुरुंगा अशीही नावे त्यांना दिलेली आढळतात. ते बारीक असले, तरी विपुल असतात. मॉन्सून हंगामात ते विविध उथळ भागांत विशेषतःकोकण पट्ट्यातील भात खाचरांत पसरतात व जेव्हा भात खाचरे व ओढे-नाले आटू लागता त तेव्हा टोपल्या, सापळे इत्यादींच्या सहाय्याने ते पकडतात. ते उत्तम खाद्य आहे आणि त्यांच्या मऊ मांसाची चव चांगली असते. त्याची हाडे फार बारीक असल्यामुळे आमटीमध्ये किंवा तळून तो आख्खा खातात.

जमदाडे, ज.वि.