लोक्वाट : (हिं. लोकाट इं. लोक्वाट, जॅपनीज मेडलर लॅ. एरिओबॉट्रिया जॅपोनिका कुल-रोझेसी). हा मध्यम आकारमानाचा सदापर्णी वृक्ष सु. ६ ते ७.५ मी. उंच वाढतो. तो मूळचा चीन व जपानमधील असून सध्या जपान, भारत, भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश आणि अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचा दक्षिणेकडील भाग यांत लागवडीत आहे. हे समशीतोष्ण हवामानात वाढणारे फळझाड असून उष्ण कटिबंधातील हवामान त्याला मानवत नाही.
या वृक्षाची साल फिकट काळी असून फांद्या पसरट असतात. पाने साधी, शोभिवंत, मोठी, चिवट, फार लहान देठाची, लंबगोल ते आयत-व्यस्त अंडाकृती, निमुळत्या टोकाची १५-२५ सेंमी, लांब असून फांद्यांच्या टोकाला दाटीने येतात. फुले लहान व फार सुगंधी असून सु. १०-१७ सेंमी. लांब, केसाळ फुलोऱ्यावर येतात. मृदुफळे गोल ते कुंभाकृती, फिकट पिवळी ते गर्द नारिंगी व ३.७५ ते ७.५ सेंमी. लांब असतात. साल पातळ व गुळगुळीत परंतु सफरचंदाच्या सालीपेक्षा चिवट असते. त्यांच्या आंबट गोड व खाद्य रसाळ, घट्ट किंवा नरम आणि पांढरट ते नारिंगी मगजात (गरात) सामान्यपणे ३-५ मोठ्या (१.८ सेंमी. लांब) बिया असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रोझेसी कुलात (गुलाब कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळे ताजी, तसेच मुरंबा अथवा जेली करून खातात. फळ शामक असून उलटी व तहान शमविण्यासाठी वापरतात. फुलांचा कफोत्सारक म्हणून उपयोग करतात. पानांचा काढा अतिसारावर देतात.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
लोक्वाटला जपानी अलुबुखार असेही नाव आहे. भारतात सु. १,३०० हे. क्षेत्रात या फळझाडाची लागवड होते. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आसाम, गुजरात व दक्षिण भारताच्या पहाडी प्रदेशात ह्याची लागवड होते. महाराष्ट्रातही काही ठिकाणी त्याची लागवड होते परंतु फाळांचे आकारमान लहान असते.
हे फळझाड निरनिराळ्या प्रकारच्या (रुक्ष अथवा आर्द्र ) हवामानात वाढते. जास्त तापमनात फळे नीट पोसत नाहीत. वार्षिक पर्जन्यमान ६० पासून १०० सेंमी. आवश्यक असते. ते निरनिराळ्या जमिनींत वाढत असले, तरी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी दुमट अथवा वाळुसर दुमट जमीन चांगली. झाड काटक असते.
गोल्डन यलो, इंप्रुव्ह्ड गोल्डन यलो, थेम्स प्राइड, लार्ज आग्रा तनाका, कॅलिफोर्निया ॲडव्हान्स हे लागवडीतील प्रकार आहेत. हे फळझाड स्वयंवंध्य असल्यामुळे बाग लावताना कमीत कमी तीन अथवा चार प्राकार लावतात. त्यामुळे परपरागणात [⟶ परागण] फलधारणेचे प्रमाण वाढते.
या झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून, डोळे भरून अथवा कलमे करून करता येते. लोक्वाटच्याच खुंटावर भेट कलम पद्धतीने केलेली कलमे पावसाळ्याच्या सुरुवातीला १×१×१ मी. मापाचे खड्डे खणून ८×८ मी. अंतरावर लावतात. कलमे लावल्यानंतर त्यांना पाणी देणे, तण वाढू न देणे वगैरे काळजी घेतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये झाडावर फळे असतात त्यावेळी १०-१२ दिवसांनी पाणी देणे आवश्यक असते. इतर दिवसांत जरूरीप्रमाणे पाणी देतात. झाडांना बहुधा जुलै व ऑगस्ट महिन्यात फुले येतात. ती जानेवारीपर्यंत येत राहतात परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत आलेल्या फुलापासून चांगली फळे मिळतात. त्यासाठी फांद्यांचे शेंडे मे महिन्यात खुडतात. त्यामुळे नवीन फुले येऊन त्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फळे येतात.
व्यापारी उद्देशाने लावलेल्या झाडांना नियमितपणे खत देणे आवश्यक असते. कलमे लावताना खड्ड्यात भरपूर प्रमाणात शेणखत, अथवा कंपोस्ट खत घालतात. झाडाच्या वयाप्रमाणे शेणखत, नायट्रोजन, फॉस्फोरिक अम्ल व पोटॅश शिफारस केलेल्या प्रमाणात देतात.
झाडाला ३ वर्षांनंतर फळे येण्यास सुरुवात होते परंतु विक्रीसाठी उत्पादन ७-८ वर्षे वयाच्या झाडापासून मिळते. १५-२० वर्षांपर्यंत चांगले उत्पादन मिळते व पुढे ते कमी होत जाते. झाडे ३५-४० वर्षांची झाली म्हणजे ती पोसणे तोट्याचे ठरते. सर्वसाधारणपणे दर झाडापासून १५-२० किग्रॅ. फळे मिळतात. चांगल्या तऱ्हेने लागवड केल्यास दर झाडाला २५-३० किग्रॅ. पर्यंत फळे धरतात. फळे झाडावरच पिकतात. चांगली पिकल्यावरच ती झाडावरून काढतात. नाहीपेक्षा त्यांची चव चांगली नसते व बाजारात कमी भाव मिळतो. फळाची साल नाजुक असल्यामुळे फळे तोडणे व भरणे यांची फार काळजी घेणे जरूर असते. साल फाटल्यास फळे लवकर कुजतात. फळे फार दिवस टिकत नाहीत. त्यामुळे ती लवकर विकणे आवश्यक असते.
हे फळझाड गंभीर रोग व किडींपासून मुक्त आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.
फळे अशा हंगामात मिळतात की, ज्या वेळी इतर फळे बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे फळांना बाजारात भाव चांगला मिळतो. फळात ६०-७०% मगज, १५-१८% बिया व १५-२० % साल असते. खाद्य भागात पाणी ८७.४%, प्रथिने ०.७%, वसा (स्निग्ध पदार्थ) ०.३%, खनिजद्रव्ये ०.५%, तंतू ०.९%, कार्बोहायड्रेटे १०.२% असतात. पक्व फळात मुख्यत्वे लेव्ह्यूलोज, सुक्रोज व मॅलिक अम्ल असतात. तसेच थोड्या प्रमाणात सायट्रिक, टार्टारिक व सक्सिनिक ही अम्ले व पेक्टीन असतात.
चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.
संदर्भ : 1. Bailey, L. H. Standard Cyclopaedia of Horticulture,, vol. II, New York, 1960.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.III, New Delhi,1952.
“