लोकसंगीत : लोकांचे संगीत ते लोकसंगीत. प्रस्तुत संज्ञा पाश्चात्य विचारधारेने प्रभावित झालेल्या संस्कृति-विचारकांनी प्रचारात आणली, असे प्रतिपादन कधी कधी केले जाते. मध्ययुगीन भारतात रूढ असलेली ‘देशी संगीत ’ ही संज्ञा जास्त योग्य, असेही म्हटले गेले आहे. ‘आपापल्या आवडीनुसार मनोरंजनासाठी, जनांनी स्वतः तयार केलेले व स्वतःच्या प्रदेशात प्रयुक्त केलेले ते देशी’ ही पारंपरिक व्याख्याही ध्यानात आणून दिली जाते. लोकसंगीत म्हणून आज मान्य होणाऱ्या संगीताविष्कारांना सामावून घेण्यास देशी संगीत ही कल्पना अपुरी पडेल असे वाटते. शिवाय कला, साहित्य इ. क्षेत्रांत ‘लोक’ या संज्ञेने निश्चित अर्थबोध होतो. लोककला, लोकसाहित्य इ. संज्ञांवरून हे ध्यानात येईल. निष्कर्ष असा की, जर्मन ‘volk’ (इंग्रजी ‘फोक’) वरून ‘लोक’ ही संज्ञा घेतली असली, तरी तिचा त्याग करण्यात फारसे हंशील दिसत नाही. आदिम, लोक, भक्ती, कला आणि जनप्रिय या पाच संगीतकोटींपैकी लोकसंगीत ही एक कोटी असून भारतीय संगीताच्या संपन्नतेत, विविधतेत आणि आकर्षणात तीमुळे अमाप भर पडली आहे.

लोकसंगीताची सांगीतिक लक्षणे पुढीलप्रमाणे होत :

(१) गीताचा प्रभाव : गीत म्हणजे जे गाइले जाते ते. लोकसंगीतात त्याचा  प्रभाव अधिक. बहुतेक वाद्ये साथीची असतात. इतर वाद्यांच्या तुलनेत लयवाद्यांचा भरणा अधिक असतो. जी वाद्ये सुरावटी निर्माण करू शकतात त्यांचाही भर, गायक जे गातो तेच आणि तसेच वाजविण्यावर असतो. इतकेच नव्हे तर, आपण गीत वाजवतो, असेच वादकांचेही म्हणणे असते.

(२) सामूहिकता : सामूहिकतेचा बहुविध आविष्कार झाल्याशिवाय लोकसंगीत  संभवत नाही. निर्मिती, प्रयोग, प्रसार या बाबतींत सामूहिकता आढळते. लोकाविष्कारातील रचना एका व्यक्तीच्या असल्या, तरी चालत आलेल्या पारंपरिक रचनांचा त्यावर खोल असर असतो. शिवाय प्रस्तुत रचनांचे विषय, रचनाबंधांचे रूप (स्वर-ताल-शब्द वगैरेंचे) आणि, अशा रचनांची भासणारी गरज या सर्व बाबी इतक्या सार्वत्रिक असतात, की निर्मिती सामूहिक म्हणणे अनिवार्य ठरते. प्रयोगात अनेक व्यक्तींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग सहज ध्यानात येतो. मौखिक परंपरेने पिढ्यान् पिढ्या होणारा प्रसारही सामूहिकतेची ध्वजा फडकविल्याशिवाय रहात नाही. शिवाय वैयक्तिक भावभावना, सुखदु:खे यांच्यापेक्षा समूहाच्या इच्छा, आकांक्षा, आनंद यांकडे कान देण्याचा लोकसंगीताचा विशेषही ध्यानात घेण्यासारखा आहे.

(३) मौखिक परंपरा : मौखिक परंपरेचा खरा अर्थ न लिहिणे असा नसून लिहिण्यावर भर न देणे असा आहे. निर्माण, जतन, प्रसार, शिक्षण इ. सर्व बाबतींत सूत्रस्पष्टीकरण, गुरु-शिष्य संबंध, संज्ञापकांची अनेकविधता, अभ्यासकांची उत्क्रांती वगैरे लक्षणांचे कार्य प्रभावी असते.

(४) संमिश्र प्रेरणा : लोकसंगीताच्या प्रेरणा संमिश्र असतात. म्हणजे करमणूक, प्रबोधन, विशिष्ट हालचालीस मदत करणे, कलाविष्कार, सामाजिक स्तरांची विशिष्ट कार्यातील गुंतवणूक वगैरे सर्व तऱ्हेच्या प्रेरणांमुळे लोकसंगीताची निर्मिती, प्रयोग, ग्रहण, जतन, प्रसार वगैरे संभवत असतात.

(५) अनादि-अनंतता : हे संगीत कोणी केव्हा निर्माण केले, केव्हा प्रचारातून गेले, ह्याची नोंद नसल्याकारणाने लोकसंगीताचे अनादि-अनंतत्व सिद्ध होते. निर्मिती-लयाची नोंद महत्वाची मानलेली नसते, हे अर्थात अधिक महत्वाचे. ‘लोकसंगीत नेहमी समकालीन असते, ’ यांसारख्या विधानांचा अभिप्रायही लोकसंगीताची आवाहकता निश्चित कालखंडापुरतीच मर्यादित नसते, असाच होतो.

(६) बदल आणि बदलाला विरोध :  म्हटले तर, परस्परविरोधी वाटणाऱ्या दोन प्रवृत्तींचा लोकसंगीतात आढळ होतो. बदलास विरोदी म्हणून पुढील कारणांचा मुख्यतः निर्देश करावा लागतो : (अ) सामूहिकता, (आ) संमिश्र प्रेरणा, (इ) रचनांमध्ये सार्वकालिक, सार्वत्रिक आवाहनावर दिला जाणारा भर, (ई)अनेक लोकसंगीत-प्रकारांत आढळणारी कार्यबद्धता.

सर्वसाधारणतः धार्मिक संस्कार, मानवी लौकिक जीवनातील सर्वसामान्य घटना, मनोरंजनात्मक खेळ आणि फॅशन म्हणण्यासारखी तात्पुरती निमित्ते यांच्याशी निगडित लोकसंगीत, बदलाला कमी-कमी विरोधी राहते. याउलट लोकसंगीतात बदल घडवून आणणारी कारणेही नोंदविली पाहिजेत : (अ) विशिष्ट लोकसंगीतप्रकाराच्या सादरीकरणावर उपजीविका करणाऱ्या प्रयोगकर्त्यांची संगीतीत बदल घडवून आणण्याची इच्छा, (आ) लोकसंगीतरचनांचे अलिखित स्वरूप, (इ) विशिष्ट लोकसंगीताशी निगडित समाजाचे होणारे स्थलांतर, (ई) लोकसंगीताकडे कला म्हणून बघणाऱ्या व्यावसायिकांचे लक्ष विशिष्ट लोकसंगीतप्रकार, वाद्ये वगैरेंकडे वळणे, (उ) शिक्षण, औद्योगिकीकरण, संज्ञापक-माध्यम वगैरेंचा प्रभाव.

(७) इतर संगीतकोटींचा शेजार : भारतीय संदर्भात एक महत्वाचे लक्षण असे की, लोकसंगीतधारेस शिष्ट संगीत, भक्ती संगीत आणि आदिम संगीत यांचा शेजार लाभत राहतो. त्यामुळे त्यांचे परस्परांवर परिणाम होतात. देशकालानुसार हा शेजार कमी अधिक प्रभावी ठरला, तरी त्याचे अस्तित्व नोंदवावे लागते.

(८) राष्ट्रीयता व लोकसंगीत :  विशिष्ट संस्कृतिगट आणि त्याचे लोकसंगीत यांचा परस्परसंबंध अनेक कारणांनी अधिक घनिष्ठ राहतो. राष्ट्रीय अस्मिता आणि लोकसंगीताचे नाते जवळचे असते (कलासंगीताबाबत असे घडेलच असे नाही). विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, वंशवितरण, वंशपरंपरा वगैरे बाबींचे प्रतिबिंब लोकसंगीतात जितके पडते, तितके इतर संगीतकोटींबाबत घडत नाही.

(९) लोकसंगीताचे स्थलांतर : लोकसंगीत लोकांबरोबर (आणि कदाचित त्याशिवायही) स्थलांतर करू शकते. सर्वसाधारणतः कंठसंगीतापेक्षा वाद्यसंगीता-बाबत स्थलांतर सुलभ आणि व्यापक राहते.

लोकसंगीताची लक्षणे पाहता, उपखंडाच्या व्याप्तीच्या भारत देशात अनेक लोकसंगीतपरंपरा आढळाव्यात, याचे नवल वाटू नये. सर्वसाधारणतः प्रत्येक विकसित भाषेला(संस्कृत सोडल्यास) लोकसंगीतपरंपरा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राजकीय वा शासकीय निकषांच्या आधारे तयार होणाऱ्या आणि सांगीतिक परंपरांनी तयार होणाऱ्या देशाच्या नकाशांत फरक पडू शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

लोकसंगीतातून व्यक्त होणारा आशय इतक्या विविध प्रकारचा असतो, की अनेक शास्त्रे लोकसंगीताचा अभ्यास करू शकतात. किंबहुना तसे केल्याशिवाय लोकसंगीताचे आकलन होणे अशक्यच म्हटले पाहिजे.

पहा : लोकवाद्ये संगीत.

संदर्भ : 1. Haywood, Charics, Ed. Folk Songs of the World, Ontario, 1966.

           2. Lomax, Alan and Others, Folk Song  style and Culture, New York, 1968.

रानडे, अशोक दा.