लोकभ्रम : तर्कचिकित्सेचा, विज्ञानाचा विचार न करता वा त्यांना प्रामाण्य न देता, लोकांच्या विविध वांशिक−सास्कृतिक गटांत ज्या श्रद्धा दृढमूल होऊन बसलेल्या असतात, त्यांना लोकभ्रम म्हणता येईल. सृष्टीत ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात, त्या कशाने घडतात, त्या घडण्यामागे कारणे कोणती, ह्या प्रश्नांचा शोध वैज्ञानिक पद्धतीने-म्हणजे तर्काच्या साहाय्याने –घेता आला म्हणजे बुद्धीचे समाधान होते. त्याचप्रमाणे खऱ्याखुऱ्या कारणांच्या ज्ञानामुळे इष्ट गोष्टी कशा घडवाव्या आणि अनिष्ट गोष्टी कशा टाळाव्यात. ह्याचे आकलन होते व त्याचा समाजहिताच्या दृष्टीने वापर करणे शक्य होते. लोकभ्रमांतही दोन घटनांमधले कार्यकारणसंबंध सांगितले जातात पण ते तर्कविसंगत असतात. उदा., कामासाठी घराबाहेर पडल्यावर मांजर आडवे आले, म्हणून ते काम झाले नाही असे सांगणे आणि ते मानणे. त्याचप्रमाणे परीक्षेतील आसनाचा क्रमांक किंवा त्या क्रमांकांतील आकड्यांची बेरीज विशिष्ट असण्यावर परीक्षेतील यशापयश अवलंबून असल्याची श्रद्धा बाळगणारे लोक आढळतात. लहान मूल एकाएकी आजारी पडले वा रडू लागले, की त्याला एखाद्या वंध्य स्त्रीची दृष्ट लागली असणार असे समजणे हाही लोकभ्रमाचाच प्रकार होय. काही घटना शुभाशुभसूचक समजल्या जातात. पुढे घडून आलेली शुभ वा अशुभ घटना ही आधी घडून आलेल्या अमुकतमुक घटनेने सूचित केली होती, असे सांगितले जाते.

तर्कशक्तीला जिच्यापर्यंत पोचता येणार नाही, अशी एक वा अशा अनेक अदृश्य शक्ती ह्या जगावर नियंत्रण ठेवून असतात, त्यांच्या शक्तीचा प्रत्यय त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे मिळत असतो, ह्या गृहीत कृत्यावर लोकभ्रम उभे असतात. अगदी आदिम अवस्थेतील माणूस लोकभ्रमांच्या आधीन झालेला दिसून येतो. आदिम मानवसमाजाला निसर्गशक्तींची भीती वाटत असते आणि शक्तींच्या ह्या व्यापाराचे नीट आकलनही त्याला झालेले नसते त्यामुळे एक प्रकारच्या भयग्रस्त अवस्थेत तो जगत असतो आणि ही अवस्था लोकभ्रमांना पोषक अशीच असते. परंतु आदिम अवस्थेतून बाहेर पडलेल्या, इतकेच नव्हे, तर स्वतःला आधुनिक आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या वांशिक−सांस्कृतिक लोकगटांतही लोकभ्रम आढळून येतात.

ज्यांचे स्वरूप व कार्यकारणभाव तर्काने नव्हे, तर कल्पनाशक्तीच्या योगे ठरविलेले असतात अशा शक्तींची एक ⇨अलौकिक सृष्टी विविध धर्मांनीही निर्माण केलेली असते. इंद्र, वरूण, झ्यूस, अहुर मज्द ह्यांच्यासारख्या देवदेवता तसेच भूतपिशाच, राक्षस, दैत्यदानव, अंग्रो-मइन्यू, सैतान, गंधर्व, यक्ष, अप्सरा इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होतो. माणसांचे चांगले−वाईट ह्या शक्ती करू शकतात आणि मानवी व्यवहारांत त्या हस्तक्षेप करीत असतात, असेही मानले जाते.

काही व्यक्तींमध्ये तसेच काही पदार्थांत अतींद्रिय आणि विलक्षण अशी शक्ती असते, असा पॉलिनीशिया ह्या पॅसिफिक महासागरातील बेटसमूहावर राहणाऱ्या पॉलिनीशिअन ह्या आदिवासी जमातीचा विश्वास आहे. ह्या शक्तीला ⇨माना असे नाव देण्यात आलेले आहे. माना ह्या शक्तीचा उपयोग हितासाठी वा अहितासाठीही केला जातो.

अन्य भौतिक शास्त्रांचा दर्जा ⇨फलज्योतिषाला दिला जात नसला, तरी सूर्यमालेतील ग्रहांचा व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव पडतो अशीही समजूत आहे. ह्या ग्रहांना शुभग्रह, पापग्रह म्हणून वेगवेगळी व्यक्तिमत्वेही बहाल केल्याचे आढळून येते.

अलौकिक शक्तींचे अस्तित्व आणि मानवी व्यवहारात त्यांच्याकडून होणारा हस्तक्षेप एकदा मान्य केल्यावर त्या शक्तींना नाना उपायांनी संतुष्ट करून आपल्या व्यवहारात मदत करण्याकरिता अगर अडथळे न आणण्याकरिता त्यांना आवाहन करणे हे ओघानेच आले. या प्रयत्नांतून पूजाअर्चा, नैवेद्य, प्रार्थना, मंत्रतंत्र, ताईतगंडा, जपजाप्य इ. जादूसदृश कर्मकांडांचा उदय झाला. तथापि धर्मविहित पूजाअर्चा, प्रार्थना, नैवेद्य इ. प्रकार आणि विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याकरिता पाळली जाणारी जादूसदृश कर्मकांडे यांत फरक केला जातो. धर्मविहित कार्ये ही सर्वसामान्यपणे लोककल्याणाकरिता असतात, तर जादूटोण्यांसारखी कर्मकांडे वैयक्तिक व खाजगी उद्दिष्टांकरिता असतात. लोकहिताकरिता केलेली जादू अगर पाळलेली कर्मकांडे ही शुभ्रजादू किंवा हितकारक जादू या सदरात येतात, तर कुणाला अपाय करण्याकरिता वापरलेली जादू अगर पाळलेली कर्मकांडे ही कृष्ण जादू अगर अभिचार या सदरात येतात. या दुसऱ्या प्रकारात भानामतीचा किंवा चेटुकाचा अंतर्भाव होतो. ही सर्व कर्मकांडे वैज्ञानिक कसोटीला, प्रयोगात्मक प्रदर्शन, प्रमाणीकरण आणि पडताळणी यांच्या चाचणीला, प्रयोजनाच्या दृष्टीने टिकणारी नसली, तरी माणसे ती निमूटपणे पाळतात अगर त्यांच्या उपयुक्ततेवर विश्वास ठेवतात.हे लोकभ्रम अशिक्षित लोकांमध्ये आणि अविकसित समाजामध्येच फक्त दिसून येतात असे नसून तथाकथित विकसित राष्ट्रांमध्येही याच प्रकारचे वैज्ञानिक कसोटीला न टिकणारे लोकभ्रम आढळतात. म्हणूनच पुराव्यानिशी सिद्ध करता येत नसले, तरी चोरून, शरमिंधे होऊन का होईना, माणसे तर्कविसंगत रीत्या ज्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्या गोष्टी म्हणजे लोकभ्रम होत, अशीही लोकभ्रम या संज्ञेची व्याख्या काहींनी केली आहे.

लोकभ्रम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते याविषयी शास्त्रज्ञांमध्येही दुमत नसले, तरी लोकभ्रमाच्या कारणमीमांसेत मतभेद दिसून येतात. यात मुख्यतः दोन विचारप्रवाह आहेतः मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय. पहिल्या विचारप्रवाहाचे प्रणेते प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड हे आहेत, तर दुसऱ्या विचारप्रवाहाचा पुरस्कार ब्रॉनिस्लॉ मॅलिनोस्की या मानव वंश शास्त्रज्ञाने केला आहे.

लहानपणी अतृप्त राहिलेल्या आशा-आकांक्षा, दाबून टाकलेल्या इच्छा प्रौढावस्थेत उफाळून येतात. परंतु सामाजिक नीतिनियमांच्या बंधनांमुळे त्या पुऱ्या करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे समाजाने जोपासलेली मूल्ये आणि प्रत्यक्ष व्यवहार यांत तफावत दिसून येते. त्यामुळे व्यक्तीचे मन द्विधा होते आणि स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता जादूटोणा अगर लोकभ्रमात मोडणाऱ्या इतर गोष्टींचा आधार व्यक्ती घेते. लहानपणी मनात ठसलेल्या काल्पनिक, अलौकिक शक्तिविषयक गोष्टींची परिणती नंतरच्या काळात लोकभ्रमात होते, असाही एक विचार मांडला जातो.


 मानसशास्त्राच्या आधारेच मांडलेला परंतु वर्तनवादी क्षेत्रात मोडणारा आणखी एक विचार या संदर्भात मांडला जातो. तो म्हणजे अभिसंहित प्रतिसाद होय. दोन विशिष्ट घटना बरोबरच घडतात अगर एक घटना अगोदर घडली, की दुसरी घटना लगेच घडते, असा अनुभव एकदा नाही दोनदा आला, की लगेच त्या दोन्ही घटनांमध्ये कारण-कार्य संबंध कल्पिला जातो. रशियन शास्त्रज्ञ पाव्हलॉव्ह याने कुत्र्यावर प्रयोग करून सिद्ध केलेला हा सिद्धांत आहे. कुत्र्याला खाण्यासाठी पाव देताना दोन तीन वेळा घंटा वाजविण्याने कुत्र्याला घंटा वाजविली, की पाव खायला मिळतो असे वाटले. नंतर नुसतीच घंटा वाजविली, तरी कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्त्रवत असे. यावरून घंटेचा आवाज आणि पाव मिळणे यांच्यातला तर्कविसंगत संबंध म्हणजे भ्रमच कुत्र्याच्या मनात तयार झाला. याच सिद्धांतानुसार मानवी व्यवहारातही लोकभ्रम तयार होतात, असे प्रतिपादिले जाते. या दोन्ही मतप्रवाहांमध्ये वैयक्तिक मनोविश्लेषणाला प्राधान्य आहे. वैयक्तिक मनोव्यापारांतून तयार होणारे भ्रम हे सामाजिक कसे बनतात, याचे स्पष्टीकरण यात मिळत नाही. त्याचप्रमाणे सर्वच मुले लहानपणी काल्पनिक सृष्टीत वावरतात अगर अलौकिक सृष्टी व शक्ती यांच्या कल्पनेत रमतात, अगर सर्वच व्यक्तींच्या बाबतीत जोपासलेली मूल्ये व प्रत्यक्ष व्यवहार यांच्यातील तफावतच अनुभवाला येत असल्यास कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लोकभ्रमाचे सातत्य किंवा जादूटोणा यांचा आधार घेणे हे अपरिहार्य किंवा स्वाभाविक म्हणता येईल का, या प्रश्नालाही समाधानकारक उत्तर मिळत नाही.

समाजाच्या संस्कृतीत प्राधान्य देऊन मॅलिनोस्की याने मांडलेला वर्तनवादी विचार हा मेलानीशिया या प्रशांत महासागरातील बेटावर राहणाऱ्या आदिवासी जमातीच्या पाहणीवरून मांडलेला आहे. समुद्रात दूरवर जाऊन मासे पकडून आणणे, हे त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मासेमारीला जाण्याआधी वादळाचे लक्षण दिसले, तर ते काही धार्मिक विधी पार पाडून जातात. आकाश निरभ्र असले आणि वादळाचे काही चिन्ह नसले, तर धार्मिक विधीत वेळ न घालविता ते सरळ मोहिमेवर जातात. किनाऱ्यावर खबरदारी म्हणून विधी करूनही समुद्रात गेल्यावर वादळ आलेच तर ते सुरक्षित परत येण्याकरिता सर्व तार्किक उपायच करतात. तेथे ते देवाचा धावा करीत नाहीत अगर काही धार्मिक विधी करीत बसत नाहीत. यांवरून त्याने असे प्रतिपादले, की जीवन असुरक्षित आहे आणि तार्किक उपाय सुचत नाही, अशी परिस्थिती असल्यास अलौकिक शक्तींना कर्मकांडांद्वारे आवाहन केले जाते. त्याचप्रमाणे असुरक्षितता सावकाशीने, कालांतराने निर्माण होणारी नसून तात्कालिक आहे आणि ताबडतोब उपाय योजावयास हवेत, अशी परिस्थिती असल्यास तर्कसंगत उपायच योजिले जातात. असुरक्षिततेची भावना जर अजिबात नसली, तर धार्मिक विधी अगर कर्मकांडांचा, मंत्रतंत्रांचा, थोडक्यात, जादूसदृश कृतींचा आधार घेतला जात नाही, असे त्याने प्रतिपादले आहे.

हे सर्वच जमातींबद्दल म्हणता येत नाही. एस्किमोंसारख्या उपजीविकेच्या साधनांच्या दृष्टीने खडतर जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये अशा प्रकारचे कोणतेच विधी अगर कर्मकांडे दिसत नाहीत. याउलट सुबत्ता असलेल्या अन्नधान्याच्या उत्पन्नाची निश्चिती असलेल्या अनेक जमातींमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंत शेतीच्या टप्प्याटप्प्याला पूजाअर्चा अगर इतर विधी केले जातात.

लोकभ्रमास अनुसरून एखादी घटना घडणार अशी दृढ श्रद्धा निर्माण झाली, तर हातून अशाच गोष्टी घडतात, की त्यामुळे ती घटना घडूनच जाते. विशेषतः अशुभ घटनांच्या बाबतीत हे खरे ठरते. स्वयंपूर्ती साधणारे भाकित (सेल्फ-फुलफिलिंग प्रफेसी) म्हणून हा सिद्धांत ओळखला जातो. आसनक्रमांक अशुभ असल्यामुळे मी परीक्षेत नापास होणार असे मनाने घेतले, तर हातून त्या भांबावलेल्या मनः स्थितीत अशाच चुका घडत जातील, की उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहिल्या जाणार नाहीत आणि परिणामी अपयश पदरी येईल. यामुळे लोकभ्रमाला बळकटी येते, असे म्हटले जाते. लोकभ्रमाला परंपरा म्हणूनही समाजमनात स्थान प्राप्त झालेले आहे.

अस्थिर, असुरक्षित व बेभरवशाच्या जीवनाशी समायोजन साधून मानसिक समाधान व सुरक्षिततेची भावना लाभण्याकरिता लोकभ्रमाचा आधार अपरिहार्य आहे, असे डेव्हिड ह्यूम या तत्त्वज्ञाने म्हटले आहे.

संदर्भ : 1. Jahota, Gustav, The Psychology of Superstition, Harmondsworth, 1971.

कुलकर्णी , मा. गु.