लोकनाट्य: लोकपरंपरेवर तसेच धर्मविधींवर अधिष्ठित असलेल्या अव्यावसायिक, अव्यक्तिगत, सामूहिक जानपद नाट्याविष्कारांचा निर्देश सामान्यतःया संज्ञेने केला जातो. अशा प्रकारचे लोकरंगभूमीचे विविध व विपुल नाट्याविष्कार जगभर सर्वत्र पूर्वापार प्रचलित आहेत.जगाच्या पाठीवरील एकूणच नाट्याचा उगम हा कोणत्या ना कोणत्या आदिम यातुविधीत असल्याचे दिसून येते. हे विधी निसर्गसंवादी जीवसरणीतील आदिम अवस्थेत बहुधा सृष्टीतील घडामोडींशी संबंधित असत. अभावग्रस्त अशा ऋतूनंतर नवीन धान्य येण्याचा किंवा वृक्षलता फुलण्या-फळण्याचा काळ हा सुफलन-विधी साजरे करण्याचा काळ असतो. मनावरचे ताण संपलेले असल्याने समूहमनाला एक मुक्ततेचा व समाधानाचा अनुभव येत असतो. अशा वेळी अशुभ अशा अभावग्रस्त मोसमाचा काळ संपला-जणू अनिष्टाचा नाश झाला आणि इष्ट असा सुगीचा, समृद्धीचा काळ आला-म्हणून निसर्गशक्तींविषयी आदर, कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करण्याच्या भावनेतून आदिम काळातील समूहाने केलेले सामूहिक यातुविधीच उत्सवरूप व नाट्यरूप पावले.

जगाच्या पाठीवर ग्रीक आणि भारत या नाट्योदयाच्या दृष्टीने प्राचीनतम संस्कृती आहेत. तेथील आद्य नाटके विधिनाट्येच (रिच्युअल ड्रामा) होती.

प्राचीन ग्रीसमध्ये द्राक्षाच्या सुगीच्या मोसमात डायोनायसस ह्या मद्यदेवतेय्या धार्मिक उत्सवात भक्तगण डिथिरॅम नामक वृंदगीते गात. त्यातून ग्रीक नाटक उगम पावले. हे आद्य लोकनाट्य म्हणता येईल. थोड्याफार फरकाने जगभरची आद्य लोकनाट्ये अशाच प्रक्रियेतून जन्माला आली.

यूरोपमध्ये धार्मिक विधिनाट्यांतून उगम पावलेल्या अशा प्रकारच्या लोकनाट्यांची परंपरा सर्वत्र आहे. सर्व प्रारंभिक नाट्ये ही गीतनृत्यप्रधान नाट्ये होती. ब्रिटिश बेटांमध्ये ‘ममिंग प्ले’ किंवा ‘सेंट जॉर्ज प्ले’ व ‘प्लाऊ मंडे प्ले’ अशी दोन प्रकारची आदिम लोकनाट्ये प्रचलित होती. ममिंग प्ले हा अंत्यविधिशी, तसेच ऋतुबदलाच्या काळातील विशेषतः वसंतोत्सवातील सुफलन−विधिशी संबंधीत नाट्यप्रकार आहे. अनिष्ट ऋतूचा अंत हा आनंददायक अशा इष्ट ऋतूचा प्रारंभ असतो, म्हणून हा अंत्यविधीही इष्टतेचा सूचक ठरतो. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर तो ब्रिटनमध्ये सर्वदूर प्रसृत झाला होता. हार्डीच्या रिटर्न ऑफ द नेटिव्ह या कादंबरीत त्याचे वर्णन आहे. वेस्ट इंडीजमधल्या नेव्हिस व सेंट किट्‌स या बेटांवरही या नाट्याचे प्रयोग होत असल्याने पुरावे आहेत. यांच्या संहिता मौखिक परंपरेने चालत आलेल्या असूनही त्यात सुसूत्रता असे. त्यात भूमिका करणारे म्हणजे ‘ममर्स’ हे स्थानिक लोक असत. प्लाऊ मंडे प्ले हा इंग्लिश लोकमहोत्सवात ‘ट्‌वेल्थ नाइट’ नंतर येणाऱ्या सोमवारी साजरा करतात. तो ममिंग किंवा सेंट जॉर्ज प्लेशी जवळीक साधतो. ईस्ट मिडलँडमध्ये त्याच्या काही अर्धवट संहिता सापडल्या असल्या, तरी त्यांचे रूप ममिंग प्लेपेक्षा बरेच वेगळे आहे.

प्रतिकूल निसर्गाचा मृत्यू किंवा ऱ्हास आणि अनुकूल निसर्गाचा जन्म प्रतिकात्मक रूपाने कथेतून अभिनीत होऊ लागले, ती जगाच्या पाठीवरची आद्य नाट्यरूपे ही देवासुरसंग्रामनाट्ये होत. जगाच्या पाठीवरील सर्व प्राचीन दैवतकथा (मिथ्स) या देवासुरसंग्रामकथाच आहेत. देवांचा म्हणजे अनुकूल निसर्गाचा विजय व असुरांचा म्हणजे प्रतिकूल निसर्गाचा पराभव हे समान सूत्र जगभरच्या प्राचीन नाटकांत दिसते. एकापरीने ही सगळी निसर्गघटितेच नाट्यरूपातून सादर होत. आदिम यातुविधी ही आद्य नाट्यरूपे होत. त्यातूनच लोकनाट्य विकसित झाले.

यातुशक्तीची जागा लोकदैवतांनी घेतली आणि लोकदैवतांसाठी केले जाणारे विधी व लोकोत्सव यांतून लोकनाट्य जन्माला आले आणि विकसित झाले. म्हणूनच भारतीय लोटनाट्य प्रायः धार्मिक बैठकीवर उभे आहे. कोणत्या ना कोणत्या देवतोपासनेचा भाग म्हणून अनेक लोकनाट्यांचे प्रचलन होते.

सर्व लोकसाहित्यविधांची निर्मिती ही समूहमनाच्या प्रेरणेतून होते व त्यांचे संगोपन-संवर्धनही समूहमनाच्या प्रेरणेने होते, त्याचप्रमाणे लोकनाट्याची निर्मिती, संगोपन व संवर्धन समूहाधिष्ठीत प्रेरणेनेच होते.

सामान्यतः कोणत्याही पारंपरिक नाट्यविधांसाठी ‘लोकनाट्य’ हा शब्द सैलसर अर्थाने वापरला जातो. परंतु सर्व विधा एकाच गटात सामावणे अयोग्य आहे. महाराष्ट्रातील उदाहरणांसह सांगायचे झाले, तर खंडोबाचे वा देवीचे जागरण किंवा गोंधळ ही विधिनाट्ये आहेत. तमाशा हे लौकिक (विधिमुक्त) लोकनाट्य आहे तर कोकण−गोमंतकातील दशावतारी नाटके, खेळ हे नाट्यप्रकार लोकनाट्य व विधिनाट्य यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारे आहेत.

मानवी संस्कृतीच्या आदिपर्वातील समूहमन हे यातुश्रद्धेने भारलेले मन होते. विश्वात्मक यातुशक्ती ही विशिष्ट समूहात केंद्रित करण्यासाठीसमूहाने केलेले यातुविधी (मॅजिकल राइट) हे नाट्याचे आदिरूप होय. त्यात समूहाचे विधी व व्यक्तीने करावयाचे विधी असे दोन प्रकार असतात. समूह एखादा विधी करतो तेव्हा समूहाचे शरीरमन त्याच्याशी पूर्णतः ऐकात्म्य पावलेले असते. परंतु कालांतराने समूहात सहभागी होणारे व तो विधि काहीसा तटस्थपणे पाहणारे (प्रेक्षक) असे दोन गट पडले, की प्रेक्षक हा विधी करणाऱ्यापासून−त्याच्या श्रद्धेपासून तेवढ्या प्रमाणात दुरावतो आणि यातुविधीच विधिनाट्यरूपात अवतरतो. काही विधींमध्ये नाट्य (प्रेक्षकसापेक्षतः) प्रबळ होते, तो नाट्यमय विधी (ड्रॅमॅटिक रिच्युअल) होतो. राज्याभिषेक विधी हे नाट्यमय विधीचे उत्तम उदाहरण आहे.

यातुश्रद्धावस्थेतून देवताविषयक श्रद्धावस्थेत जेव्हा समाज येतो, तेव्हा प्रारंभी जे यातुविधी इष्टकामनापूर्तीसाठी होत, त्यांचेच बदलते रूप असलेली विधिनाट्येही इष्टदेवतोपासनेचा भाग म्हणून समूहाच्या कामनापूर्तीसाठी होतात. जसजसा देवताविषयक श्रद्धेचा भाग उणावत जातो आणि प्रेक्षकसापेक्ष दर्शनीय नाट्यात्मक भावनेला प्राधान्य मिळत जाते, तसतसा हा प्रवास विधिनाट्याकडून लोकनाट्याकडे (फ्रॉम रिच्युअल ड्रामा टू फोक ड्रामा) होत जातो. तरी लोकपरंपरेत भूतकाळाच्या खाणाखुणा कधी पूर्णपणे नाहीशा होत नाहीत. लोकमानस या ना त्या स्वरूपात परंपरा जतन करीत असते. तमाशाचे आजचे रूप हे पूर्णतः लोकनाट्याचे (फोक ड्रामा) असले, तरी त्याच्या प्रारंभीचे गणगवळण किंवा तमासगिरांच्या परंपरेतील कलगी आणि तुरा हे संप्रदाय या काही खुणा तमाशाची मुळेही कधीकाळी धर्मश्रद्धेत रूजलेली असल्याची साक्ष देतात. या प्रक्रियेने साक्ष देतात. या प्रक्रियेने लोकनाट्य धार्मिक बैठकीवर उभे असते. मात्र क्रमाने त्यातील धार्मिकता, श्रद्धाभाव उणावत जातो व नाट्यात्मक (कलात्मक) भान विकसित होत जाते. या दोन्हींच्या खुणा लोकनाट्यात सापडतात.

कोणत्याही धार्मिक विधीत एक अंगभूत नाट्यात्मकता असतेच. परंतु विधिकर्ते, त्यात सहभागी होणारे व विधीचा प्रेक्षक यांची भावना मात्र धर्मश्रद्धांची असते. विधीतील नाट्यात्मक भागाने रंजनही होत असते. जसजशी श्रद्धा उणावते. तसतशी रंजनाची जाण विकसित होते.

लोकनाट्यांचे प्रयोग ग्रामदेवतोत्सवात साधारणपणे, ग्रामदेवतांच्या मंदिरासमोर उघड्या पटांगणावर बहुधा समतल भूमीवर होतात. क्वचित प्रेक्षकांच्या स्तरापेक्षा थोडा उंच ओटा रंगमंच म्हणून वापरतात. तो चारही बाजूंनी बहुधा उघडा असतो. क्वचित चार खांब ठोकून ते लता-पल्लवांनी शृंगारतात. रात्रीच्या वेळी उजेडासाठी हिलाल, मशाली किंवा गॅसबत्त्या अडकवण्यासाठीही खांबांचा उपयोग होतो.   


 अनेक लोकनाट्यांत पात्रांची रंगभूषा भडक, उग्र असते. मंद उजेडात ती अधिक उठून दिसते. काही ठिकाणी रंगभूषेऐवजी मुखवटे वापरले जातात. त्यांचे रंग, आकार यांचे संकेत परंपरेने ठरलेले असतात. यक्षगानसारख्या नाट्यप्रकारात उग्र प्रकृतीच्या रंगभूषेसाठी लाल व काळा रंग विशेषत्वाने वापरले जातात, तर सौम्य प्रकृतीच्या देवतासदृश (राम, कृष्ण इ.) पात्रांसाठी निळा व गुलाबी हे रंग वापरले जातात. राक्षस पात्रे उग्र व अक्राळविक्राळ दाखवतात. दशावतारी खेळांचा शेवट देव−दानव युद्धाने होतो. युद्धप्रसंग अत्यंत रोमांचकारी असतात. रणवाद्यांचा कडाका उडतो, मशालीवर राळ−गंधकासारखे ज्वालाग्राही पदार्थ टाकून भडका उडवला जातो, त्यामुळे युद्धप्रसंगांची भीषणता परिणामकारक ठरते. राक्षसवध व देवताविजय हा लोकनाट्यात ठरलेला असतो.   

लोकनाट्याची संहिता लिखित नसते. बहुप्रचलित पुराणकथांचे साचे ठरलेले असतात. त्यातील कथासूत्राची गीते मात्र पारंपरिक असतात व ती बहुतेकांची पाठ असतात. तरी बहुधा सूत्रधार ती गीते गातो व बाकीची पात्रे उत्स्फूर्तपणे, समयसूचकतेने प्रसंगाला अनुरूप असे संवाद बोलतात. पात्राचे चातुर्य व वक्तृत्व यांना त्यात भरपूर वाव असतो. सर्वच प्रकारची मुक्तता व लवचिकता हे एकूणच लोककलांचे वैशिष्ट्य लोकनाट्यात विशेषत्वाने आढळते.

 

कोणत्याही लोकनाट्यात पूर्वरंग आणि उत्तररंग असे स्थूलमानाने दोन भाग असतात. यातील पूर्वरंग हा धार्मिकतेशी निगडित अशा विधीशी कमीअधिक प्रमाणात संबद्ध असतो. भरताच्या नाट्यशास्त्रातील पूर्वरंगातील नांदीविधी हा नाट्यांतर्गत आनुष्ठानिक आदिम श्रद्धेचेच विकसित व शास्त्रबद्ध केलेले रूप आहे. त्यात अशुभ-निवारणासाठी अनिष्ट देवता, समुद्र, वृक्ष इत्यादींसारखी निसर्गतत्त्वे या सर्वांसाठी प्रार्थना केलेल्या आहेत. हीच भूमिका लोकनाट्याच्या पूर्वरंगातही असते. लोकनाट्याचा उत्तरभाग हा रंजनाला प्राधान्य देणारा असतो. पूर्वरंगातील विध्यात्मकता हा लोकनाट्याच्या आद्यावस्थेतील यातुविधीचा अवशेष आहे. आद्य यातुविधीचे उत्तररूप म्हणजे इष्ट देवदेवतांचे स्मरण, अर्चन व स्तवन. अगदी नारदीय कीर्तनासारख्या धार्मक प्रबोधनात्मक नाट्यरूप सादरीकरणातील पूर्वरंग हा ईश्वरविषयक व तत्वज्ञानविषयक गंभीर विवेचनाचा भाग असतो, तर उत्तररंगातील तदानुषंगिक देवतेच्या लीलाचरित्राचे आख्यान हा रंजनाला प्राधान्य देणारा भाग असतो.

 

समूहाच्या इष्टकामनापूर्तीसाठी प्रारंभी एक गंभीर धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने केला जातो, तर त्याच समूहाचे दीर्घकालीन ताण सैलावण्यासाठी व सुप्त उत्साहाला मुक्तपणे वाट करून देण्यासाठी विविध प्रकारची गीते, कथा सादर करणे, वाद्यवादन, नृत्य व क्रीडा करणे हे सामान्यतः धर्मोत्सवाचे स्वरूप असते. त्याचाच आविष्कार सर्व धर्माधिष्ठित नाट्यप्रकारांतून होत असतो.

 

सामान्यतः पावसाळा संपल्यावर सुगीच्या दिवसांत, नवीन धान्य आल्यावर ग्रामदेवतांचे उत्सव सर्वत्र साजरे होतात. त्यात निसर्ग व इष्टदेवतांसंबंधीची कृतज्ञता व कृपाभिलाषा असते. त्याचप्रमाणे भविष्याच्या चिंतेने साठलेले मानसिक ताणही संपलेले असतात. त्यामुळे श्रद्धा आणि रंजन अशा दोहोंचा संगम लोकनाट्याच्या आविष्काररूपात प्रत्ययाला येतो.

 

विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वश्रेष्ठ शक्ती (देव) विषयीच्या भावना पूर्वरंगातून व्यक्त करताना त्याचे नेतृत्व करणारी एक व्यक्ती प्रत्येक लोकनाट्यात अवश्य असते. ती सूत्रधाराचे काम करते. तमाशात सरदार, बोहाड्यात गुरूजी, दशावतारात भागवत या विविध नावांनी ती ओळखली जाते. भारतातील बहुतेक लोकनाट्यांच्या प्रारंभी गणपती (क्वचित शिवशंकर), सरस्वती, इष्ट ग्रामदेवता, पंचमहाभूते, लौकिक जीवनातील आदरणीय व्यक्ती (उदा., कोकणात गावचा खोत इ.) यांचे स्तवन होते.

 

पूर्वरंगातच विदूषकसदृश पात्रे हास्यनिर्मितीसाठी हमखास अवतरतात. तसेच लोकजीवनात एरव्ही जाचक ठरणाऱ्या सत्ताधारी समाजगटांना हास्यकारण बनवले जाते व त्यांची खिल्ली उडवली जाते. दशावतार,लळित यांसारख्या प्रकारांत धर्मसत्ता राबवणारा भटजी-पुरोहित-वर्ग व अर्थसत्ता राबवणारा गावचा पाटील, सावकारवर्ग अशी पात्रे हास्यकारक रूपांत दाखवली जातात. लोकमनातील या संस्थांविषयीच्या असंतोषाला अशा प्रसंगांतून वाट मिळते व लोकभावनांचे विरेचन होते. पूर्वरंग धर्मानुष्ठानाच्या गांभीर्याने सुरू होतो आणि हास्यरसनिर्मितीने समूहमन ताणमुक्त करीत संपतो. आता प्रेक्षक मुक्त मनाने नाट्यास्वादाकडे वळण्यास सिद्ध होतो व पूर्वरंग संपतो.

पूर्वरंग संपल्यावर आरती होते व रंजनाचा उत्तरार्ध सुरू होतो. त्यात इष्टदेवतेचे लीलाचरित्राख्यान किंवा पुराणातील एखादे आख्यान समूह उत्स्फूर्तपणे सादर करतो. रामायण, महाभारत यांतील कथा अधिक लोकप्रिय असतात. कथाभाग सर्वज्ञात असतो व तो परंपरेने सिद्ध झालेल्या गीतांतून सादर होतो. पारंपरिक गायक व वादक साथीला असतात. विविध भागांत विशिष्ट जमाती लोककलावंत म्हणून पिढ्यान्‌पिढ्या ही कामे करतात. कोकणातील दशावतारी बहुधा गुरव वा तिलोरी कुणबी आहेत, तर सिन्नर भागात बोहाडा करणारे शिंपी आहेत. तमाशातील नृत्यपरंपरा कोल्हाटी जमातीतील स्त्रियांनी चालवली आहे, तर गायक-वादक म्हणून पूर्वास्पृश्य महार व मांग जमातींनी कौशल्य प्रकट केले आहे. अलीकडे पुराणकथांचे प्रचलन मागे पडले असून ऐतिहासिक व सामाजिक कथा अनेक लोकनाट्ये सादर करतात. तमाशातील कथाभागवग म्हणून ओळखला जातो. नृत्य, गायन, वादन व कथाभागाला उचित अशा उत्स्फूर्त गद्य संवादांतून कथानक सादर होते. प्रेक्षकांची इच्छा व स्थलकाल यांना अनुसरून कथेचे संवाद व सादरीकरण अत्यंत लवचिकपणे होते. पौराणिक कथेतील पात्रांना लोककलावंत आपल्या प्रतिभेने व उत्स्फूर्त वक्तृत्वशैलीने लौकिक जीवनातील रंगांत रंगवतात.लौकिक-अलौकिकाच्या सीमारेषेवर लोकनाट्य रेंगाळत असते.

 

भारतातील निरनिराळ्या प्रदेशांत त्या त्या प्रादेशिक संस्कृतींची वैशिष्ट्ये दर्शविणारी विविध लोकनाट्ये रूढ आहेत. महाराष्ट्रातील तमाशा, दशावतारी नाटके, बोहाडा या लोकनाट्यांप्रमाणेच कर्नाटकातील यक्षगान, गुजरात व राजस्थानमधील भवाई, ⇨बंगाली जात्रा इत्यादींचा उदाहरणांदाखल निर्देश करता येईल.

 

दिवसेंदिवस लोकनाट्यातून धार्मिकतेचा संकोच होत आहे. कृषिनिष्ठ जीवनसरणीतून आधुनिक औद्योगिकीकरणाकडे झपाट्याने प्रवास करणाऱ्या भारतीय जीवनातून पारंपरिक धर्मविधियुक्त लोकनाट्य उणावत चालले आहे. तरीही लोकनाट्यातील उत्स्फूर्तता, आवेग, आवाहकता, नृत्य, वाद्य व संगीत या स्थायी कलागुणांच्या परंपरेच्या प्रभावामुळे चेहरामोहरा बदलूनही लोकनाट्याची परंपरा चालू राहील, यात शंका नाही. लोकनाट्यातील या सदा आवाहक गुणांमुळेच स्वातंत्र्योत्तर काळातील नागर रंगभूमीवरील कलावंत पुन्हा लोकनाट्याचा व लोककलांचा नव्याने शोध घेण्यासाठी उन्मुख झाले आहेत.

पहा :  रंगभूमि लोकसाहित्य.

 

भवाळकर, तारा