लोंगोवाल, संत हरचंदसिंह : (२ जानेवारी १९३२–२० ऑगस्ट १९८५). भारतातील अकाली दल या पक्षाचे अध्यक्ष व तळमळीचे कार्यकर्ते. पंजाबच्या संग्रूर जिल्ह्यातील गढरियानी गावात मन्सासिंग ह्या जाट शेतकऱ्याच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तन यांची विशेष आवड होती. त्यांचे इतर तिघे भाऊ शेतावर काम करीत असताना हरचंदसिंग मात्र भजने म्हणण्यात दंग असत. म्हणून अगदी लहान वयात वडिलांनी त्यांची रवानगी भंतिडा जिल्ह्यातील मौजो येथील संत जोधांसिंग यांच्या डेऱ्यात केली. तेथे त्यांचे पारंपरिक पद्धतीने धार्मिक शिक्षण झाले. संत जोधसिंग यांच्या डेऱ्यात त्यांना अगदी साधे आयुष्य जगण्याची सवय जडली. अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले. वयाच्या सोळाव्या वर्षीच ते संग्रूर जिल्ह्यातील लोंगोवाल येथील गुरुद्वारात धर्मगुरू बनले. सुरेल आवाजात भक्तिपर भजने गायाच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांची रागी म्हणून ख्याती झाली. अगदी तरुण वयात दमदमा साहिब या शिखांच्या पवित्र गुरुद्वारामध्ये पुजारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली (१९६२). त्याच वर्षी अकाली दलाचे संग्रूर जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. यानंतर ते संत लोंगोवाल म्हणून ओळखले जाऊ लागले. ते पंजाब विधानसभेवर लेहरागग मतदार संघातून निवडून आले (१९६२) मात्र राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपद त्यांनी नाकारले. तसेच पुढे लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीही नाकारली. त्यांचा पिंड हा मुख्यतः कार्यकर्त्याचा होता. १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात अकाली दलाचे सर्व मुख्य नेते अटकेत असताना संत लोंगोवाल यांनी लोकसभेवर गेलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले. तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
पंजाबात १९७७ च्या निवडणुकीनंतर जनता−अकाली दलाचे संयुक्त सरकार स्थापन झाले पण पुढे १९७९ साली मुख्य मंत्री प्रकाशसिंग बादल आणि जगदेवसिंग तलवंडी यांच्यामध्ये मतभेद झाले व पक्षात फूट पडली. बादल यांना पाठिंबा देणाऱ्या अकाली दलाच्या अध्यक्षपदी लोंगोवालांची निवड झाली (१९८०). त्याचवर्षी बादल यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. अकाली दलाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी लौकरच चळवळ सुरू केली. त्या धर्मयुद्धाचे प्रमुख सूत्रधार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आणि अकाली दलाचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. अकालींच्या मागण्यसाठी त्यांनी ४ ऑगस्ट १९८२ रोजी आंदोलन पुकारले तथापि या आंदोलनाचे नेतृत्व पुढे त्यांच्या हातात राहिले नाही. जर्नेलसिंग भिंद्रानवाले यांचे अतिरेकी धोरण हळूहळू प्रभावी बनू लागले. केंद्र सरकारने अकालीची कोणतीच मागणी मान्य केली नाही. तेव्हा सुवर्णमंदिराच्या परिसरात व अन्य ठिकाणी हिंसाचारी घटना घडल्या. त्यामुळे जून १९८४ साली केंद्र सरकारला अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई करावी लागली. जून १९८४ ते मार्च १९८५ या काळात संत लोंगोवाल स्थानबद्धतेमध्ये होते. सुटकेनंतर त्यांनी भारत सरकारशी वाटाघाटी करून पंजाब प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला. अकाली दलातील काही गटांचा विरोध असूनही त्यांनी पंतप्रधान राजी गांधींबरोबर २४ जुलै १९८५ रोजी करार करून पंजाब प्रश्न विधायक मार्गांनी सुटू शकेल, अशी आशा निर्माण केली. या कराराला विरोध असलेल्या अकाली नेत्यांचे मन वळविण्यातही ते यशस्वी झाले परंतु अशा प्रकारचा करार करणे मान्य नसलेल्या अतिरेक्यांनी संग्रूर जिल्ह्यातील शेरपूर येथील जाहीर कार्यक्रमात त्यांची हत्या केली.
राजीव गांधी- लोंगोवाल करारातील काही प्रमुख अटी अशा : (१) चंडीगढ २६ जानेवारी १९८६ मध्ये पंजाबला द्यावे, त्या बदल्यात पंजाबचा काही भाग हरयाणाला द्यावा. (२) रावी-बिआस-सतलज कालवा १५ ऑगस्ट १९८६ पूर्वी बांधून तयार करावा आणि पाणीवाटपाच्या लवादाचा निर्णय पंजाब, हरयाणा व राजस्थान यांनी मान्य करावा. (३) आनंदपूरसाहेब ठराव सरकारिया आयोगाकडे सूपूर्द करण्यात यावा. (४) श्रीमती इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शीख-विरोधी दंगली झाल्या. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. याशिवाय आंदोलनात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे तत्त्वही या करारात अंतर्भूत करण्यात आले. या कराराने सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण केले परंतु दोन आयोग नेमूनही चंडीगढचा प्रश्न सुटला नाही. तसेच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उत्तर भारतात विविध ठिकाणी शीखविरोधी दंगली झाल्या, त्यांची चौकशी व तदनंतरची कारवाई या गोष्टी समाधानकारक रीत्या अंमलात आल्या नाहीत. परिणामतः पंजाबात जहाल दहशतवाद पसरतच राहिला.
संत लोंगोवाल हे सौम्य स्वभावाचे, उदारमतवादी व नेमस्त परंपरेतील पुढारी होते. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा पंथाच्या ऐक्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य निष्कलंक होते. शेवटच्या काळात त्यांनी असामान्य धैर्य दाखवून पंजाब करारावर सही केली आणि फुटीरतेच्या विरुद्ध स्पष्ट भूमिका घेऊन देशाच्या अखंडत्वावर आणि ऐक्यावर भर दिला. हिंदु-शीख सामंजस्य आणि ऐक्य यांवर त्यांची दृढ श्रद्धा होती. गांधी-लोंगोवाल करारामुळे त्यांचे नाव अजरामर झाले. यामुळे संसद सदस्य नसतानाही संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्यांचा हुतात्मा असा उल्लेख करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हा दुर्मिळ मान यापूर्वी फक्त दीनदयाळ उपाध्याय व जयप्रकाश नारायण यांना मिळाला होता.
संदर्भ : 1. Darshansing, Maini, Ed. Cry, the Beloved Punjab, New Delhi, 1989
2. Narang, A. S. Punjab Politics in National Perspective, New Delhi, 1988.
3. Tully, Mark Jacob, Satish, Amritsar : Mrs. Gandhi’s Last Battle, New Delhi 1985.
पळशीकर, सुहास.
“