लोएल, पर्सीव्हल: (१३ मार्च १८५५−१२ नोव्हेंबर १९१६). अमेरिकन ज्योतिर्विद. मंगळावरील कालवे तेथील पुरात जीवसृष्टीचे अस्तित्व दाखवितात, या कल्पनेचे जनक लोएल वेधशाळेचे संस्थापक आणि कुबेर (प्लुटो) या ग्रहाचे अस्तित्व आगाऊ वर्तविणारे संशोधक म्हणून त्यांचा लौकिक आहे.
लोएल यांचा जन्म बॉस्टन येथे झाला. १८७६ मध्ये त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून गणिताची बी.ए. पदवी संपादन केली. एक वर्ष यूरोपमध्ये काढून नंतर त्यांनी १८८३ ते १८९३ या कालात जपान, कोरिया, इ. देशांत प्रवास कयन त्यांविषयी बरीच रंजक पुस्तके लिहिली, उदा., कोसॉन (१८८६), द सोल ऑफ द फार ईस्ट (१८८८), नोटो (१८९१) व ऑकल्ट जपान (१८९५).
इ. स. १८७७ मध्ये मंगळ ⇨प्रतियुतीत असताना जोव्हान्नी स्क्यापारेल्ली या ज्योतिषशास्त्रज्ञांनी मंगळाची तपशीलवार निरीक्षणे करून मंगळावर दिसणाऱ्या काळ्या रेषांचे जाळे म्हणजे तेथील कालवे असावेत, असा तर्क केला होता. त्यामुळे १८९४ मध्ये होणाऱ्या इष्ट प्रतियुतीच्या वेळी मंगळाची निरीक्षणे करून त्या ग्रहाचा अधिक सूक्ष्म अभ्यास करावयाचा, असे लोएट त्यांनी ठरवले. ग्रहांच्या निरीक्षणास योग्य अशा ठिकाणावरून त्यांनी ४५ सेंमी. आणि ३० सेंमी.च्या दुर्बिणींच्या साहाय्याने मंगळाचे वेध घेतले. मार्स अँड इट्स कॅनॉल्स (१९०६) या पुस्तकात त्यांनी मंगळावरील एकंदर परिस्थिती जीवसृष्टीच्या अस्तित्वात प्रतिकूल आहे, असे दिसत नसल्याचे प्रतिपादिले होते. त्याच्या पृष्ठभागावर पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे थोडी बुद्धिमत्ता असलेल्या सजीवांनी मंगळावर वास्तव्य केले असल्यास जगण्यसाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी त्यांनी कालवे खणणे क्रमप्राप्त होते व अशा कालव्यांच्या काळ्या रेषा स्पष्ट दिसतात. त्याचप्रमाणे तेथील सुपीक जमिनी दाखविणारी क्षेत्रेही पृष्ठभागी दिसतात. या घटना ओढून ताणून एकमेकींशी जुळवल्या आहेत, असे मानता येत नाही.
इ. स. १९०१, १९०३ व १९०५ मध्ये लोएल यांनी मंगळाची आणखी निरीक्षणे करून मंगळासंबंधीच्या आपल्या कल्पना अधिक विस्ताराने मांडल्या. मंगळावरील प्रकाशित क्षेत्रे ही वाळवंटे आणि काळी क्षेत्रे हिरवळीचे प्रदेश आहेत. असे त्या वेळी मानले जात होते. मंगळावरील काळ्या क्षेत्रांच्या काळपटणात ऋतुकालीन होणारे बदल लोएल यांनी अभ्यासिले आणि त्यांचे कारण देताना त्याचे असे स्पष्टीकरण दिले : वसंत ऋतुच्या आगमनानंतर ध्रुवाकडील बर्फमय आच्छादनातील बर्फ वितळून कालव्यांतून पाणी वाहू लागले व वनस्पती पुन्हा वाढतात. कालव्यांचा स्पष्टपणा हा त्यांमधून पाणी पुन्हा वाहू लागल्याचे दर्शवितो. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या कल्पना मूळ धरून होत्या व त्यांचा फोलपणा १९६५ साली मरीनर यांनानी घेतलेल्या मंगळाच्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाला.
मंगळावरील प्रकाशित व काळी क्षेत्रे दोन्ही ओसाड प्रदेश असून त्या क्षेत्रांच्या रंगांतील फरक हे वाऱ्याने धूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळे दिसतात. सर्व मंगळ धूलिमय व ओसाड प्रदेश आहे.
लोएल यांनी सूर्यकुलाचा सैद्धांतिक अभ्यास केला होता. त्यामध्ये त्यांना असे आढळले की, एक ग्रह निर्माण झाल्यावर दुसरा नवीन ग्रह अशा ठिकाणी निर्माण होतो की, त्याचा परिभ्रमण काल हा पहिल्या ग्रहाच्या परिभ्रमण कालाशी अनुस्पंदनी राहील म्हणजे दोहोंच्या परिभ्रमण कालांचे सोपे सरळ गुणोत्तर असेल. या विचारसरणीनुसार वरुणाच्या (नेपच्यू नच्या) परिभ्रमणकालाच्या दुप्पट परिभ्रमणकाल असलेला एक ग्रह असावा, असे त्यांचे मत होते. दुसरे कारण असे की, बऱ्याच धूमकेतूंचे अपसूर्य बिंदू हे मोठ्या ग्रहाच्या कक्षेनजीक असल्याचे दिसते. असे आणखी खूप धूमकेतू आहेत की, ज्यांचे अपसूर्य बिंदू वरुणाच्या अंतराहून जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे त्यांच्या अपसूर्य बिंदूनजीक कक्षा असलेला आणखी एक ग्रह वरुणाच्या पलीकडे असावा, अशी त्यांची कल्पना होती. याशिवाय प्रजापतीच्या (युरेनसाच्या) कक्षेवर होणारे विक्षोभ हे केवळ वरुण ग्रहामुळे नसून वरुणापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या अज्ञात ग्रहाच्या विक्षोभाचा त्यात अंतर्भाव आहे, असेही त्यांचे मत होते. या अज्ञात ग्रहाचा शोध घेण्याचे कार्य त्यांच्या वेधशाळेत त्यांच्य मृत्यूनंतनही १४ वर्षे चालू होते व क्लाइड टाँबा यांना तो ग्रह १९३० मध्ये लोएल यांच्या पंचाहत्तराव्या जन्मदिनी सापडला. याला प्लुटो नाव दिले असून लोएल यांच्या नावातील आद्याक्षरांची त्या ग्रहाचे आंतरराष्ट्रीय चिन्ह बनविले आहे. प्रजापतीचा परिवल काल, बुधाचा परिवलन-परिभ्रमण काल, शनीच्या कड्यांची संरचना, गुरुवरील ढगनिर्मिती हेही त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. ते उत्तम वक्ते होते. सूर्यकुल, ग्रहांची उत्क्रांती, सजीवांचे मंगळावरील वास्तव्य इ. विविध विषयांवर त्यांनी व्यख्याने देऊन त्यांवर पुस्तकेही लिहिली. त्यांच्या वाडवडिलांकडून वनस्पतिशास्त्राच्या छंदाचा वारसा त्यांना मिळाला होता. त्यांच्या वेधशाळेच्या अक्षांशाइतक्या उत्तरेस सहसा न आढळणाऱ्या वनस्पती त्या वेधशाळेच्या परिसरात त्यांनी शोधून दाखविल्या. त्यात एक अगदी नवीन वनस्पतीची जात असून त्या वनस्पतीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. कॅनडाच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिक सोसायटीने त्यांना मानद सभासद करून घेतले होते. फ्रान्स आणि मेक्सिको येथील राष्ट्रीय ज्योतिषशास्त्रीय संस्थांनी पदके देऊन त्यांचा गौरव केला होता. फ्लॅगस्टॅफ येथे त्यांचे निधन झाले.
नेने, य. रा.
“