लेसिंग, गोट्होल्ट एफ्राइम : (२२ जानेवारी १७२९−१५ फेब्रुवारी १७८१). जर्मन नाटककार व समीक्षक. जन्म जर्मनीच्या पूर्व भागात असलेल्या कार्मेत्स ह्या गावी. मायसन येथील फ्युरस्टनशूलऽ (इं. अर्थ इलेक्टर्स स्कूल) ह्या विख्यात शाळेत त्याने ग्रीक, हिब्रू व लॅटिन भाषांचा अभ्यास केला. फ्रेंच आणि इंग्रजी ह्या भाषांचेही ज्ञान त्याने प्राप्त करून घेतले होते. १७४६ मध्ये लाइपसिक विद्यापीठात त्याने धर्मशास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. तथापि तत्त्वज्ञान, कला, साहित्य हे त्याच्या अस्सल आस्थेचे विषय होते. प्लॉटस आणि टेरेन्स ह्या रोमन नाटककारांच्या सुखात्मिका वाचून त्याच्यातही नाट्यलेखन करण्याची आकांक्षा उत्पन्न झाली होती. १७४८ साली देऽर युंगऽ गेलेर्टऽ (इं.शी. द यंग स्कॉलर) ही त्याची सुखात्मिका रंगभूमीवर आली व ती यशस्वी ठरली. डेमन, दी आल्टऽ युंगफर (इं.शी. द ओल्ड मेड), देऽर मिसोग्युन (इं.शी. द मिसॉजिनिस्ट), देऽर फ्रायग्राइस्ट (इं.शी. द फ्री थिंकर) आणि दी युडन (इं.शी. द ज्यूज) ह्या लाइपसिक येथे असताना त्याने लिहिलेल्या अन्य सुखात्मिका (१७४७-४९). मनुष्यस्वभावतील विविध दोषांवर आणि विसंगतींवर त्याने ह्या सुखात्मिकांतून बोट ठेवले. भ्रष्टाचार, नशीब काढण्यासाठी धडपड, पूर्वग्रह, दांभिकता हे ह्या सुखात्मिकांतील काही विषय.
लाइपसिक विद्यापिठात वैद्यकाचा अभ्यास करण्याचेही त्याने ठरविले होते पण काही आर्थिक अडचणींमुळे त्याला लाइपसिकहून बर्लिनला पळू यावे लागले. पत्रकारी, फ्रेंच व इंग्रजी भाषांतील तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ जर्मन भाषेत अनुवादणे, समीक्षात्मक लेख लिहिणे अशी विविध प्रकारची कामे त्याने केली. १७५२-५२ मध्ये तो व्हिटन्बेर्क येथे होता आणि तेथूनच त्याने वैद्यकातील पदवी घेतली. त्यानंतर तो बर्लिनला परतला. तेथे त्याने ‘थीएट्रिकल लायब्ररी’(इं. अर्थ) ह्या नावाचे एक नियतकालिक काढले पण ते फार काळ चालले नाही. तथापि १७५३-५५ ह्या कालखंडात त्याचे संकलित लेखन (६ खंड) प्रसिद्ध झाले. त्यात लाइपसिक येथील वास्तव्यात त्याने लिहिलेल्या काही महत्त्वपूर्ण सुखात्मिकांचा अंतर्भाव होता. त्याचप्रमाणे मिस सारा सँप्सन (१७५५) ह्या त्याने रचिलेल्या शोकात्मिकेचाही समावेश होता. सामान्य नागरिकांचे चित्रण करणारी जर्मन साहित्यातील ही पहिली शोकात्मिका−ब्युरगरलिषेस ट्राऊअरश्पीऽल−होय.
तत्त्वज्ञ मोझेस मेंडेल्सझोन आणि लेखक-प्रकाशक सी. एफ्. निकोलाई हे लेसिंगचे बर्लिनमधले मित्र. ह्या मित्रांबरोबर त्याने शोकात्मिकेच्या स्वरूपात जो वैचारिक पत्रव्यवहार केला, तो ब्रीफवेखसेल युवर दस ट्राऊअरश्पीऽल (इं.शी. कॉरिस्पाँडन्स अबाउट ट्रॅजिडी) या नावाने प्रसिद्ध झाला (१७५६-५७). नैतिक उद्बोधन करणे हे शोकात्मिकेचे कार्य नव्हे, अशी भूमिका लेसिंगने ह्या पत्रव्यवहारात घेतलेली दिसते. नोव्हेंबर १७५५ ते एप्रिल १७५८ ह्या काळात लेसिंग लाइपसिकमध्ये राहिला. मे १७५८ मध्ये तो बर्लिनला परतला आणि नोव्हेंबर १७६० पर्यंत तेथे त्याचे वास्तव्य होते. तो तेथे असतातना …ब्रीफऽडी नॉयस्टऽलिटराटुरर बेट्रेफेंड (इं.शी. लेटर्स कन्सर्निंग द लेटेस्ट लिटरेचर) ह्या नियतकालिकात समकालीन साहित्यावर त्याने निबंध लिहिले. ह्या निबंधांतून त्याने योहान ख्रिस्टॉफ गोट्शेट ह्या नवअभिजाततावादी जर्मन समीक्षकाच्या नाट्यविषयक विचारांवर प्रखर हल्ला चढविला. नव-अभिजाततावादी फ्रेंच साहित्याने गोट्शेटची वाङ्मयीन अभिरुची घडविलेली होती आणि त्याचाच आदर्श समोर ठेवून जर्मन साहित्यात परिवर्तन घडवून आणण्याची त्याची भूमिका होती. जर्मन नाटके ही नव-अभिजाततावादी तंत्रानेचे लिहिली गेली पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. लेसिंगने ह्या भूमिकेला विरोध करून जर्मन नाटकाला नवी दिशा दाखवली आणि शेक्सपिअरला आदर्श नाटककार म्हणून उचलून धरले. १७५८ साली लेसिंगने काही उत्कृष्ट बोधकथा−‘फेबल्स’ (जर्मन ‘फाबेलन्’’)−लिहिल्या आणि त्यांतून समाजातील अपप्रवृत्तींवर आणि विसंगतींवर टीका केली. बोधकथा ह्या साहित्यप्रकारावर त्याने एक निबंधही लिहिला. बोधकथेच्या रूपकात्मक घाटाचे त्याने त्यात विश्लेषण केले.
लेसिंग ब्रेस्लौ येथे सायलीशियाच्या सैनिकी प्रशासकाचा (मिलिटरी गव्हर्नर) सचिव म्हणून १७६० साली काम करू लागला. तेथे असताना त्याने तेथील ग्रंथालयाचा लाभ घेऊन तत्त्वज्ञानाचा आणि सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला. ह्या अभ्यासातून लाओकून … (१७६६, इं.शी. लाओकून ऑर, ऑन द लिमिट्स ऑफ पेंटिंग अँड पोएट्री) हा ग्रंथ निर्माण झाला. चित्रकलेसारख्या रूपण कला आणि काव्य ह्यांच्या कार्यात साध्य, साधन आणि शक्यता ह्यांच्या संदर्भात कोणते भेद संभवतात, ह्याचे विवेचन ह्या ग्रंथात लेसिंगने केले आहे. चित्रशिल्पासारख्या रूपण कला ह्या स्थलसंबद्ध असतात. त्यामुळे घटनांच्या मालिकेतील सर्वांत अभिव्यक्तिक्षम असा क्षण निवडून तो सादर करणे, हे त्यांचे कार्य ठरते. तथापि काव्यकला ही कालसंबंद्ध असते आणि गतिमानतेशी तिचे नाते असते. त्यामुळे स्थितिशील (स्टॅटिक) वर्णन हे कवितेचे सत्त्व होऊ शकत नाही, असे त्याचे मत होते.
ब्रेस्लौमधील लेसिंगच्या वास्तव्याचे आणखी एक फलित म्हणजे मीना फोन बार्नहेल्म (१७६७) ही त्याची गाजलेली सुखात्मिका. आत्मसन्मानासंबंधीची आचारसंहिता काटेकोरपणे पाळू पाहणारा एक प्रशियन सेनाधिकारी आणि ह्या आचारसंहितेच्या शिस्तीमुळे त्याच्या प्रेमाला वंचित होण्यासारखी परिस्थिती जिच्या वाट्याला आली आहे अशी त्या अधिकाऱ्याची प्रेयसी, ह्यांचे चित्रण तीत केलेले आहे. विनोदी, खेळकर शैलीने हा प्रगल्भ विषय हाताळताना त्याच्या वजनाला लेसिंगने कुठेच बाधा येऊ दिलेली नाही.
बर्लिनमध्ये आल्यानंतर (१७६५) दोन वर्षांनी लेसिंग हा हँबर्ग येथील काही नागरिकांनी नव्याने स्थापन केलेल्या जर्मन राष्ट्रीय रंगभूमीचा सल्लागार नेमला गेला. हा प्रकल्प वर्षभरसुद्धा चालला नाही. तथापि ह्या रंगभूमीशी लेसिंगचा जो संबंध आला, त्यातून त्याच्या नाट्यविषयक निबंधांचा एक संग्रह हांबुगींशऽड्रामाटुगींऽ (१७६७-६८ इं.शी. ड्रमॅटिक नोट्स फ्रॉम हँबर्ग) प्रसिद्ध झाला. त्यात त्याने नाटक व रंगभूमी ह्यांविषयी मूलभूत स्वरूपाचे काही विचार मांडले. सुखात्मिका आणि शोकात्मिका ह्यांच्या स्वरूपाविषयीचे त्याचे चिंतन ह्या ग्रंथात आढळते त्याचप्रमाणे ॲरिस्टॉटलच्या नाट्यविषयक उपपत्तीची चर्चाही त्यात अंतर्भूत आहे.
लेसिंग वॉलफन−ब्यूटल येथे १७७० पासून ग्रंथपालाची नोकरी करू लागला. त्यानंतर काही वर्षांनी त्याने फ्रागमेंटऽआइनेस उनबेकांटन (१७७४−७७, इं.शी फ्रॅगमेंट्स ऑफ ॲन अन्नोन) ह्या नावाने हेर्मान झामुएल रीमारुस (१६९४−१७६८) ह्या जर्मन विचारवंताचे प्रागतिक विचार प्रसितद्ध केले आणि सनातनी ख्रिस्ती धर्मनिष्ठांचा त्याच्यावर रोष झाला. लेसिंगनेही त्या रोषाला आपली प्रतिक्रिया दिली. सनातनी धर्मविचाराला चिकटून राहण्यापेक्षा सत्याचा शोध अधिक महत्त्वाचा आहे, अशी भूमिका त्याने घेतली. १७७२ मध्ये एमिलिना गालोटी ही त्याची नाट्यकृती रंगभूमीवर आली. एमिलिआ गालोटी ह्या स्त्रीच्या जीवनाची ही शोकांतिका. रचनेच्या दृष्टीनेही हे नाटक उत्कृष्ट आहे. नाथर देऽर वायजऽ (इं.शी. नाथान द वाइज) हे त्याचे नाटक १७७९ मध्ये रंगभूमीवर आले. धर्म कोणताही असो माणुसकी आणि मानवी बंधुत्व महत्त्वाचे आहे, हा विचार त्याने नाटकाद्वारे मांडला. दी एरत्सिबुंग देस मेनशनगेश्लेष्टस् (१७८०, इं.शी. द एज्युकेशन ऑफ द ह्यूमन रेस) हा लेसिंगचा अखेरचा ग्रंथ. पूर्णत्व प्राप्त करून घेण्याची क्षमता मानवाच्या ठायी आहे, हा त्याचा विश्वास ह्या ग्रंथात दिसून येतो.
एव्हा क्योनिग ह्या स्त्रीशी १७७६ साली त्याने विवाह केला परंतु त्याचे वैवाहिक जीवन अल्पजीवी ठरले. १७७८ साली त्याची पत्नी निधन पावली. लेसिंगचे अखेरचे दिवस एकाकीपणात गेले. जर्मनतील ब्राऊनश्वाइन येथे तो दरिद्री अवस्थेत निधन पावला. त्याचे ग्रंथ १९२५ साली २५ खंडांत संपादून प्रसिद्ध करण्यात आले.
संदर्भ : 1. Garland, Henry B. Lessing : The Founder of Modern German Literature, 2nd Ed. Philadelphia, 1962
2. Graham, Ilse, Goethe and Lessing, New York, 1973
3. Lamport Francis J. Lessing and the Drama, 1981.
महाजन, सुनंदा.
“