लेग्युमिनोजी : (शिंबावंत कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] तूर, हरभरा, वाटाणायांसारखी कडधान्ये आणि चिंच, बाभुळ व शिकेकाई यांसारख्या अनेक उपयुक्त वनस्पती यांच्या एका फार मोठ्या कुलाचे शास्त्रीय नाव. याचा अंतर्भाव ⇨ रोझेलीझ अथवा गुलाब गणात केला असून यातील सर्व वनस्पती तीन उपकुलांत (पॅपिलिऑनेटी, सीसॅल्पिनिऑइडी व मिमोजॉइडी) विभागल्या आहेत. यांचा प्रसार जगभर असून एकंदर सु. १,१०० प्रजाती व १३,००० जातींची माहिती उपलब्ध आहे. यांचे फळ एककिंजक (एका स्त्रीकेसराचे बनलेले) शिंबा (शेंग) असल्याने सर्व कुलाला ‘शिंबावंत कुल’ असे म्हणण्यास हरकत नाही. भारतात या वनस्पतींचा प्रसार विपुल आहे व कित्येकांची लागवडही मोठी आहे.
या वनस्पती ⇨ औषधी, ⇨ क्षुपे (झुडपे), वृक्ष अथवा बेली या स्वरूपात आढळतात. यांच्या मुळांवर बारीक गाठी असून त्यांत हवेतून नायट्रोजन घेऊन तो साठविणारे सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) असतात. या ⇨ सहजीवनापासून दोन्ही वनस्पतींस पोषण-विनिमयाचा फायदा मिळून शिवाय जमीनही सुपीक बनते. यांचे खोड विविध प्रकारचे असून केव्हा त्याचे प्रतानात (तणाव्यात) रूपांतर होते कधी ते काटेरी असते (उदा.,बाभूळ, खैर). पाने एकाआड एक उगवलेली, क्वचित साधी पण बहुधा संयुक्त पिसासारखी व एकदा किंवा दोनदा विभागलेली असून त्यांस तळाशी बाजूस उपपर्णे (उपांगे) असतात व त्यांचे कधी काट्यांत किंवा पानासारख्या भागांत रूपांतर झालेले असते. काहींची पाने रात्री व कधी दिवसाही मिटून सैलपणे लोंबतात. ⇨ लाजाळूची पाने अत्यंत स्पर्शग्राही (संवेदनाशील) असून ती धक्का बसल्यास नेहमी अशीच प्रतिक्रिया दर्शवितात. देठांच्या तळाजवळच्या फुगीर भागास ‘पुलवृंत’ म्हणतात व पानांची हालचाल यामुळेच घडून येते. या वनस्पतींचा फुलोरा अकुंठित प्रकारचा (टोकास दिर्घकाळ वाढत राहणारा) असून फुले फार लहान, मध्यम अथवा मोठी असतात ती बहुधा रंगीत असून शोभिवंत दिसतात. प्रत्येक फूल बहुधा अनियमित, द्विलिंगी व पूर्ण असते. त्यात पाच संदले, पाच प्रदले (पाकळ्या) व दहा केसरदले (पुंकेसर) असून किंजदल (स्त्रीकेसर) मात्र एकच व ऊर्ध्वस्थ (इतर पुष्पदलांच्या किंवा त्यांवरच्या पातळीवर असणारे) असते. किंजपुटात बीजकांची मांडणी एका शिवणीवर धारास्थित (किंजदलाच्या किनारीवर) असते. सर्व पुष्पदले बहुधा सुटी पण संदले बहुधा जुळलेली व क्वचित केसरदले विविध प्रकारे जुळलेली असतात [⟶ फूल]. या पुष्पसंरचनेला अनेक अपवाद असतात. यांची फळे शुष्क व दोन्ही शिवणींवर बहुधा तडकणारी अशी चपटी किंवा गोलसर शेंगा असतात त्यांना शिंबा म्हणतात, सामान्य भाषेत कोणत्याही लांबट शुष्क फळाला शेंग म्हणतात परंतु ती एका किंजदलापासून बनली असल्यास तिला शास्त्रीय परिभाषेत ‘शिंबा’ म्हणतात. बाहव्याच्या शेंगेत आडवे पडदे असून ती गोलसर असते. शेंग कधी मगज (गर) युक्त असते (उदा., बाहवा, विलायतीचिंचवचिंच) कधीतिचेएकबीजीभागसुटेहोतात (उदा., लाजाळू). बियांची संख्या अनिश्चित असते व बिंयात पुष्क (दलिकाभोवतीचा अन्नांश) नसते. खाद्यपदार्थ, औषधे, रंग, डिंक, टॅनीन, तेले, धागे, लाकूड इ. अनेक उपयुक्त पदार्थ या कुलातील वनस्पतींपासून मिळतात. शिवाय सावली व शोभेकरिताही कित्येकांचा उपयोग सर्वत्र केला जातो (उदा., शिरीष, गुलमोहर, बाहवा). फुलाच्या कळीची संरचना, पुष्पदलांची मांडणी व नियमितता, केसरदलांची संख्या व त्यांची कमीजास्त लांबी व सुटेपणा यांवरून वर सांगिंतलेली तीन उपकुले ओळखली जातात. लेग्युमिनोजी या कुलाच्या फुलांची संरचना आकृतीतील सामान्य पुष्पसूत्रांवरून कळून येईल तसेच फुलातील पुष्पदलांच्या मांडणीतील फरक पुष्पचित्रांच्या आकृतीवरून समजून घेणे सोपे आहे [⟶ फूल].
उपकुले :(१) पॅपिलिऑनेटी : (पॅपिलिऑनेसी).पुष्पदलसंबंधात पाकळ्या परस्परांवर अंशतः रचलेल्या ध्वजकरूप असून फुलाची संरचना पंतगरूप [⟶ अगस्ता] व एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) असते. केसरदले बहुधा जुळलेली, ५ किंवा १० व आतील पाकळ्यांत लपलेली असतात त्यांचे दोन गट असतात किंवा एकच गट असतो अक्षाजवळची (फुलोऱ्याच्या किंवा खोडाच्या दांड्याजवळची) पाकळी बाजूच्या पाकळ्यांस लपेटून असते संयुक्त पाने विषमदली (दलांच्या संख्या सारखी नसलेली) असतात. उदा., वाटाणा, सनताग. हे उपकुल सर्वांत प्रगत मानतात.
(२) सीसॅल्पिनिऑइडी : (सीसॅल्पिनेसी). पुष्पदलसंबंध काहीसा वरप्रमाणे पण परिहित (छपरावरील कौलाप्रमाणे दल क्रमाने मांडलेली) पाकळ्या कधी पाचापेक्षा कमी (चिंच) असून कधी त्या नसतात [⟶ अशोक-१] केसरदले बहुधा सुटी व पुष्पसंरचना एकसमात्र असते. अक्षाजवळची पाकळी बाजूच्या पाकळ्यांनी लपेटलेली व संयुक्त पाने बहुधा समदली (दलांची संख्या सारखी असलेली) असतात. उदा., टाकळा.
(३) मिमोजॉइडी : (मिमोझेसी). पुष्पदलसंबंधात पाकळ्यांच्या फक्त कडा (किनारी) चिकटलेल्या (धारास्पर्शी) असून पुष्पसंरचना अरसमात्र (कोनत्याही उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) असते (उदा., बाभूळ). केसरदले सुटी किंवा जुळलेली असून संख्या दहा किंवा अनियमित असते संयुक्त पाने बहुधा दोनदा विभागलेली असतात. हे उपकुल सर्वांत प्रारंभिक समजतात. उदा., लाजाळू, सोनखैर.
जी. बेंथॅम आणि जे. डी. हूकर, ए. एंग्लर आणि सी. प्रांट्ल, ए. बी. रेंडेल, जी एच्. एम्. लॉरेन्स, एम्. बेन्सन इत्यादिंकाच्या मते लेग्युमिनोजी हे रोझेलीझ अथवा गुलाब गणातील कुल असून त्यात वर निर्देशिलेल्या तीन उपकुलांचा समावेश होतो पण जे. हचिन्सन, डी. ए. योहानसेन, वि. रा. ज्ञानसागर इत्यादींनी त्याला उच्च किंवा प्रगत गणाचे स्थान दिले असून वरील तीन उपकुलांना या गणात असलेली कुले मानली आहेत त्यांना हचिन्सन यांनी पॅपिलिऑनेसी (पलाश कुल), सीसॅल्पिनेसी (संकेश्वर कुल) व मिमोझेसी (शिरीष कुल) अशी नावे देऊन त्यांचा अंतर्भाव लेग्युमिनेलीझ या नव्या गणात केला आहे. तथापि एच्. सेन (१९४३) यांच्या मते या तीन कुलांतील फरक किरकोळ स्वरूपाचे असून त्यांतील वनस्पतींच्या शरीररचनेच्या तौलनिक अभ्यासातील निष्कर्ष हचिन्सन यांच्या मतास पुष्टिदायक नाहीत म्हणून त्यांना उपकुलाचे स्थान योग्य आहे. लेग्युमिनोजी ह्या कुलाचे ⇨ रोझेसी अथवा गुलाब कुलाशी निकटचे आप्तभाव आहेत. ज्ञानसागर यांनी लेग्युमिनोजी कुलातील अनेक जातींच्या गर्भविज्ञानासंबंधी विपुल संशोधन केले आहे.
पुरातनत्व : उत्तर क्रिटेशस कल्पात (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) व इओसीन (सु. ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात लेग्युमिनोजी कुलातील काही प्रजातींच्या पूर्वजांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात उदा., डाल्बर्जियाचे (शिसवीसारख्या जातींची प्रजाती) जीवाश्म ग्रीनलंडातील उत्तर क्रिटेशस खडकांत सापडले आहेत आग्नेय अमेरिकेतील इओसीन विल्कॉक्स पादपजातीत सर्वांत मोठी संख्या लेग्युमिनोजी कुलातील जातींची असून त्यांमध्ये सु. १७ प्रजाती व ८० जाती ओळखल्या आहेत डाल्बर्जिया, कॅसिया (टाकळा, तरवड इत्यादींची प्रजाती) व सोफोरा या प्रजाती प्रामुख्याने आढळल्या आहेत. नंतरच्या मायोसीन कालखंडात (सु. २ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील खडकांत) पाने व शिंबा यांचे जीवाश्म सापडले आहेत तथापि लेग्युमिनोजी कुलातील प्रजाती व जाती यांची संख्या इतर फुलझाडांपेक्षा कमी आहे.
पहा : पुष्पदलसंबंध फूल रोझेलीझ सहजीवन.
संदर्भ : 1. Lawrence, G.H.M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
2. Mitra, J.N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
परांडेकर, शं. आ.
“