लेअन, झां-मारी प्येअर : (३० सप्टेंबर १९३९- ) फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. सजीवातील निसर्गदत्त प्रथिनांची कार्ये करू शकणारी पण कमी रेणुभाराची व संरचना कमी जटिल (गुंतागुंतीची) असलेली द्रव्ये (रेणू) संश्र्लेषित (कृत्रिम रीतीने तयार) करण्याच्या दृष्टीने त्यांनी मोलाचे संशोधन केले आहे. सजीवांतील महत्त्वाच्या प्रक्रियांचे व èजीवद्रव्याच्या वर्तनाचे हुबेहूब अनुकरण (नक्कल) करणारे रेणू (संयुगे) तयार करणे त्यांचा व्यवहारांत उपयोग करून घेणे याबाबतींत महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल जे. क्रॅम आणि चार्ल्स जे. पेडरसेन यांच्याबरोबर लेअन यांना १९८७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आले. या तिघांच्या संशोधनातून रासायनिक व जैव क्रियांमधील रेणूंच्या आकाराचे महत्त्व उघड झाले. म्हणजे अपेक्षित विक्रिया वा क्रिया सुरू होण्यासाठी रेणूंचे आकार कुलूप-किल्लीप्रमाणे परस्पर पूरक व चपखल असावे लागतात. या तिघांनी अशा रेणवीय चाव्या कृत्रिम रीतीने बनविल्या असून यामुळे रसायनशास्त्रातील एका नवीन शाखेचा पाया घातला गेला. या शाखेला यजमान-पाहुणा (होस्ट-गेस्ट) किंवा अधिरेणवीय (सुप्रा-किंवा एक्स्ट्रा-मॉलिक्युलर) रसायनशास्त्र म्हणतात.
लेअन यांचा जन्म रोशइम (फ्रान्स) येथे व शिक्षण स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठात झाले. तेथून १९६३ साली त्यांनी विज्ञानातील डॉक्टरेट पदवी मिळविली. नंतर ते हार्व्हर्ड विद्यापीठात संशोधन साहाय्यक (१९६३-६४), स्ट्रॅस्बर्ग येथील लूई पाश्र्चर विद्यापीठात रसायनशास्त्राचे सहप्राध्यापक (१९६६-७०), सहयोगी प्राध्यापक (१९७०) व प्राध्यापक (१९७०-७९) होते. १९७९ पासून ते कॉलेज द फ्रान्स (पॅरिस) येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. यांशिवाय त्यांनी हार्व्हर्ड (१९७२, १९७४), ई. टी. एच्. झुरिक (१९७७), केंब्रिज (१९८४) आणि बार्सिलोना (१९८६) या विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. èहॉर्मोने व èएंझाइमे ही सजीवांतील जटिल संयुगे असून त्यांचे कोशिकेवर (पेशीवर) परिणाम होतात. कोशिकेच्या संरचनात्मक भागाशी बंध निर्माण झाल्यावर त्यांची क्रिया सुरू होऊन असे परिणाम होतात. याचा अर्थ कुलपात त्याचीच किल्ली जशी चपखलपणे बसते तसे हे बंध असतात, असे तत्वतः म्हणता येते. हे रेणू (संयुगे) एकमेकांना ओळखू शकतात आणि ज्याच्याशी बंध निर्माण करावयाचा असतो त्या रेणूंची निवडही ते करु शकतात. वरील तिघांनी बनविलेल्या अशा कृत्रिम रेणूंचा आराखडा विशिष्ट प्रकारे तयार केलेला आहे. त्यामुळे मुख्यतः धन विद्युत् भारित व कधीकधी ॠण विद्युत् भारित अथवा विद्युत् भाररहित रेणू वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व विवेचकपणे (निवड करुन) त्याला जोडले जाऊ शकतात. या तिघांनी अशा रेणूंचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अभ्यासले. तसेच ज्या घटकांमुळे हे रेणू परस्परांना ओळखू शकतात व एकमेकांत चपखलपणे बध्द होऊ शकतात, त्या घटकांचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न या तिघांनी केला. अशा तऱ्हेने त्यांनी एंझाइमाच्या उत्प्रेरण (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलण्याची क्रिया) या क्रियेची नक्कल करणारे रेणू कृत्रिम रीत्या तयार केले.
एंझाइमांशी निगडित असणारी अशी आधार द्रव्ये (ज्यांच्याशी विक्रिया होते ती द्रव्ये) èप्रतिजनांशी बध्द असलेली èप्रतिपिंडे आयनोफोर (प्रतिजैव-अँटिबॉयॉटिक-पदार्थाच्या नवीन गटातील) संयुगांशी बध्द होणारे धातूचे आयन (विद्युत् भारित अणू वा रेणू) इ. अशा रेणूंची परिचित उदाहरणे आहेत. हे रेणू अनेक जैव क्रियांच्या मुळाशी असतात. अशा तऱ्हेने बहुतेक जैव क्रियांमध्ये बहुधा प्रथिने, न्यूक्लिइकअम्ले यांच्यासारख्या उच्च रेणूभारांच्या संयुगाच्या विशिष्ट भागाशी कमी रेणुभाराचे असे एक (वा अनेक) संयुग बद्ध होते. त्यांच्यातील हे बंध अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व विवेचक (निवडक स्वरूपाचे) म्हणजे चपखलपणे बसणारे असतात.
पेडरसेन यांनी क्राउन ईथरे अथवा सायक्लिक पॉलिईथरे या संयुगांचा अभ्यास केला. या संयुगांत निरनिराळ्या आकारमानांची छिद्रे असून त्यांमध्ये निरनिराळ्या धातूंचे गोलसर विद्युत् भारित अणू वा रेणू चपखलपणे बसतात, असेही त्यांना आढळले.या शोधावरून लेअन यांनी १९६९ साली या ईथरांसारखी द्विवलयी संयुगे तयार केली व त्यांना ‘क्रिप्टांडे’हे नाव दिले. ‘क्रिप्टांडे’ क्राउन ईथरांपेक्षा अधिक विवेचक असल्याचे आढळले. त्यांमध्ये सुधारणा करून लेअन यांनी एंझाइमसदृश द्रव्य बनविली. या संयुगातील भेगांत किंवा पोकळ्यांत कमी रेणूभाराची संयुगे बद्ध होऊन जटिल संयुगे बनतात. धन विद्युत् भारित कार्बन अणुयुक्त संयुगांना ‘कार्बनियम’ म्हणतात. कार्बनी विक्रियांमध्ये ही अतिशय विक्रियाशील संयुगे अल्प काळच टिकतात. लेअन व क्रॅम यांनी या संयुगांची निर्मिती. संरचना, भौतिकीय, गुणधर्म व रासायनिक विक्रिया यांचा सखोल अभ्यास केला. यामुळे विक्रियेमधील त्यांची विवेचकता (निवडक्षमता) अधिक चांगली कळून आली. विषबाधेवरचा उतारा, पर्यावरण संरक्षण वगैरेंसाठी या संयुगांचा उपयोग करण्यात येत असून यांच्यामुळे समस्थानिक (तोच अनुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) वेगळे करतात. वैश्लेषिक रसानशास्त्र आणि ऊर्जेसाठी हायड्रोजननिर्मिती यांमध्येही त्यांचा उपयोग होऊ शकेल.
लेअन व क्रॅम यांनी प्रोटिएज, एटीपीएज व ट्रान्ससायक्लेज या एंझाइमांची काही प्रमाणात नक्कल करणारे यजमान रेणू तयार केले असून ते वैद्यक, जीवरसायनशास्त्र व औद्योगिक प्रक्रिया यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील.
लेअन यांनी कार्बनी आधारद्रव्य व धातूंचे आयन यांची जटिल संयुगे बनविली आहेत. त्यामुळे महारेणू (वा विशेष रेणू) बनविता येईल. आधारद्रव्याची संरचना व विक्रियेचा प्रकार यांद्वारे पडणाऱ्या मर्यादा महारेणूवर पडत नाहीत. त्यामुळे रसायने (संयुगे) अधिक काटेकोरपणे वेगळी करता येऊ शकतील. उदा., मृदेतील संदूषित द्रव्ये व पाण्यातील विषारी द्रव्ये काढून टाकणे शक्य होईल. लेअन यांच्या संशोधनामुळे आयनोफोर या संयुगांची क्रिया कशी होते, ते अधिक स्पष्ट झाले.
लेअन यांना अनेक संस्था-संघटनांच्या सदस्यत्वाचा सन्मान लाभला असून त्यांनी २५० हून अधिक संशोधनपर लेख विविध नियतकालिकांतून लिहिले आहेत.
ठाकूर, अ. ना.