लेअर्ड, सर ऑस्टेन हेन्री : (५ मार्च १८१७-५ जुलै १८९४). ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबात पॅरिस येथे झाला. त्याचे वडील सिलोन (श्रीलंका) येथे नागरी सेवेत होते. त्यांच्या बदल्यांमुळे त्याचे औपचारिक शिक्षण फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आदी देशांत यथातथाच झाले. सोळाव्या वर्षी तो कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडन येथे गेला (१८३३). तेथील वकिलाकडे काही दिवस उमेदवारी करून स्वतंत्र व्यवसायासाठी बाहेर पडला आणि इराण-इराकमध्ये आला. पुढे तुर्कस्तानातील ब्रिटिश राजदूत सर स्ट्रॅफर्ड कॅनिंग यांच्याकडे त्याने काम पतकरले आणि उर्वरित वेळ तो इराकमधील मोसूल परिसरात संशोधनात व्यतीत करू लागला. ब्रिटिश वकिलातीच्या मदतीने त्याने बायबलमध्ये उल्लेखिलेल्या प्राचीन स्थळी उत्खननास प्रारंभ केला (१८४५). निनेव्ह, निमरूद, बॅबिलन आणि अन्य स्थळी इ. स. १८४५ ते १८५१ दरम्यान स्वखर्चाने उत्खनन केले. त्यात त्याला इ. स. पू. ९ ते ७ शतकांतील बहुविध प्रकारचे अवशेष उपलब्ध झाले. त्यांपैकी ॲसिरियन राजा दुसरा आशुर-नाझिर-पाल, तिसरा शॅल्मानीझर व एसार-हॅडन तसेच सेनॅकरिब व असुरबनिपाल या राजांचे राजप्रासाद महत्त्वाचे असून त्यांतून पंखधारी बैलांचे दगडी भव्य पुतळे, सिंहमुखी स्फिंक्सचे पुतळे, हस्तिदंती प्रतिमा, ब्राँझ व मातीची पात्रे तसेच फर्निचर, भित्तिशिल्पे, अपोत्थित शिल्पे आणि क्यूनिफॉर्म अक्षरवटिकेतील मृण्मुद्रा हे अवशेष विशेष उल्लेखनीय आहेत. या राजांच्या ग्रंथालयातील लेखांवरून ॲसिरियन व बॅबिलोनियन संस्कृतींच्या इतिहासावर प्रकाश पडला. तद्वतच पुढे त्यामुळे सुमेरियन व अकेडियन भाषांचा शोध लागला आणि अनेक तत्कालीन गोष्टी ज्ञात झाल्या. यांतील लिखित मृण्मृद्रांसह त्याने अनेक अवशेष ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात आणून ठेवले. इंग्लंडमध्ये परतल्यानंतर त्याने आपल्या संशोधनासंबंधी माहिती देणारा डिस्कव्हरीज इन द रूडन्स ऑफ निनेव्ह अँड बॅबिलन (१८५३) हा ग्रंथ प्रसिद्ध केला.
पुढे लेअर्डचे परराष्ट्रखात्यात उपसचिवाची नोकरी धरली (१८५१). तो सक्रिय राजकारणात पडला आणि लिबरल पक्षातर्फे संसदेवर निवडून आला. राजकारणात त्याने सतरा वर्षे काम केले (१८५१-६९). त्यानंतर त्याची माद्रिद-इस्तबूल आदी ठिकाणी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याला १८७८ मध्ये उमराव करण्यात आले आणि सर हा किताब मिळाला. त्यानंतर तो सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन व्हेनिस येथे स्थायिक झाला. तिथे त्याने व्हेनिशियन चित्रशैलीचा अभ्यास करून काही कलाकृती मिळविल्या आणि तत्संबंधी लेखन करण्याचे ठरविले. कामानिमित्त तो लंडनला आला असता तेथेच मरण पावला.
लेअर्ड हा केवळ कर्मधर्मसंयोगाने पुरातत्त्ववेत्ता बनला. त्यामुळे त्याला शास्त्रशु़द्ध उत्खननाचे तंत्र ज्ञात नव्हते. शिवाय आधुनिक परिणामांचा विचार करता त्याची सामग्री अगदीच जुजबी होती. परिणामत: त्याच्याकडून ऐतिहासिक पुराव्याची हेळसांड झाली आणि काही महत्त्वाचे अवशेष नष्ट झाले, अशी त्याच्यावर टीका होते. त्याचा उद्देश इंग्लंडला जास्तीतजास्त प्राचीन वस्तू कशा नेता येतील, त्या गोळा करणे हा होता. तरीसुद्धा त्याने उजेडात आणलेल्या अवशेषांमुळे ॲसिरियाच्या प्राचीन इतिहासाचे धागे उलगडले, ही गोष्ट वादातीत आहे.
पहा : निनेव्ह, निमरूद.
संदर्भ : 1. Ceram, C. W. Gods, Graves and Scholars, London, 1952.
2. Kubie, N. B. Road to Nineveh : The Adventures and Excavations of Sir Austen Henry Layard, Toronto, 1964.
3. Waterfield, Gordon, Sir A. H. Layard of Nineveh, Toronto, 1963.
4. Wilkins, Frances, Six Great Archaeologists, London, 1961.
देशपांडे, सु. र.
“