ली, (मॉरिउस) सोफुस : (१७ डिसेंबर १८४२ – १८ फेब्रुवारी १८९९).नॉर्वेजियन गणितज्ञ. त्यांनी ⇒ गट सिद्धांत व ⇒ अवकल समीकरणे या गणिताच्या शाखांत विशेष महत्त्वाचे कार्य केले.
ली यांचा जन्म नॉर्वेतील नॉरफ्योर्डीड येथे झाला. त्यांचे शिक्षण क्रिस्तियाना (आता ऑस्लो) विद्यापीठात झाले (१८५९–६५). त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच निबंधामुळे त्यांना परदेशी अभ्यास करण्याकरिता शिष्यवृत्ती मिळाली. १८६९-७० मध्ये ते बर्लिनला गेले असता तेथे ⇒ फेलिक्स क्लाइन यांच्याशी त्यांची भेट झाली व त्यांच्या कल्पनांचा ली यांच्यावर पुष्कळच प्रभाव पडला. क्लाइन यांच्या समवेत नंतर त्यांचे कित्येक निबंध प्रसिद्ध झाले. १८७० मध्ये ते पॅरिसला गेले व तेथे त्यांनी स्पर्शक रूपांतरणाचा शोध लावला. या रूपांतरणांचा उपयोग करून स्पर्शक गोल हे छेदक रेषांशी संगत असतील अशी रेषा व गोल यांच्यातील एकास-एक संगती प्रस्थापित करता येते. १८७१ मध्ये क्रिस्तियाना विद्यापीठात साहाय्यक पाठ निर्देशक झाले. त्या वर्षी त्यांनी स्पर्शीय रूपांतरणांचा (एक गणितीय राशी दुसऱ्या रूपातील राशीत बदलण्याच्या प्रक्रियेचा) सिद्धांत मांडलेली संस्मरणिका डॉक्टरेट पदवीसाठी सादर केली. पदवी मिळाल्यावर १८७२ मध्ये त्यांची जादा प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. १८७३ साली त्यांनी संतत रूपांतरण गटांसंबंधीच्या संशोधनास प्रारंभ केला. त्यांनी आपल्या आंशिक अवकल समीकरणांवरील अभ्यासातून क्लाइन यांच्या सहयोगाने गणितीय सिद्धांताच्या वर्गीकरणात संतत गटांच्या संकल्पनेच्या असलेल्या मूलभूत महत्त्वाचा शोध लावला. नऊ वर्षे फ्रीड्रिख एंगेल यांच्याबरोबर सहकार्य करून ली यांनी रूपांतरण गटांविषयीचा Theorie der Transformations gruppen (३ खंड, १८८८–९३) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर स्पर्शक रूपातंरणांच्या भूमितिविषयीचा Geometric der Berihrungs transfromationen (१८८६) हा जी. शेफर्स यांच्या सहकार्याने लिहिलेला त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १८८६ साली लाइपसिक विद्यापीठात क्लाइन यांच्यानंतर गणिताच्या अध्यासनावर ली यांची नेमणूक झाली व तेथे एंगेल हे त्यांचे साहाय्यक होते. पुढे १८९८ मध्ये क्रिस्तियाना विद्यापीठात त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या खास पदावर ते रूजू झाले; पण तेव्हाच त्यांची प्रकृती ढासळलेली होती. वरील कार्याखेरीज त्यांनी अवकल भूमितीतही [→ भूमिति] महत्त्वाचे कार्य केले. अवकल समीकरणांवरील Differential gleichungen (१८९१, जी. शेफर्स यांच्यासमवेत) हा त्यांचा ग्रंथ प्रमाणभूत समजला जातो. त्यांचे सर्व कार्य एकत्रितपणे एंगेल आणि पी. हीगार्ड यांनी संपादित करून Gesammelte Abhandlungen (६ खंड, १९२२–३७) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. त्यांचे ग्रंथ व अनेक महत्त्वपूर्ण निबंध यांचा आधुनिक गणिताच्या प्रगतीवर (विशेषतः फ्रेंच गणितज्ञ एली कार्तान यांनी नंतर केलेल्या कार्याद्वारे) फार मोठा प्रभाव पडला. त्यांच्या गौरवार्थ विशेष प्रकारच्या संस्थितिक गटांना ‘ली गट’ असे नाव देण्यात आलेले आहे [→ गट सिद्धांत]. ते क्रिस्तियाना येथे मृत्यू पावले.
ओक, स. ज.