ली हूंग-जांग : (१५ फेब्रुवारी  १८२३-७ नोव्हेंबर १९०१). चीनमधील एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध मुत्सद्दी व सेनानी. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात आन-ह्वै प्रांतातील ह-फै या गावी झाला. तो बीजिंग येथे नागरी सेवेत रूजू झाला होता (१८४४). त्याने कन्फ्यूशसप्रणीत शिक्षण पद्धतीनुसार पदवी धारण केली (१८४७). नंतर पूर्वायुष्यात वडील व प्रशासक त्सेंग ग्वो-फान यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

मांचू राजवटीविरूद्ध राष्ट्रीय आघाडीने उठाव केला (१८४८). हा उठाव èताइपिंग बंड (थायफींग) या नावाने प्रसिद्ध आहे. या काळात (१८४८-६५) त्याने शासनाच्या वतीने महत्त्वाची कामगिरी बजावली. सुरूवातीस त्याने स्थानिक पातळीवर फौज संघटित करून स्वग्रामापासून प्रतिकाराची मोहीम आखली. पुढे त्याला न्याय दंडाधिकारी नेमण्यात आले (१८५६). त्सेंग ग्वो-फान महाराज्यपाल झाल्यानंतर त्याने शाही सशस्त्र पथके संधटित केली (१८६०). ली त्यांत एका पथकाचा सेनापती म्हणून सामील झाला. त्याला जिआंगसू प्रांताचा हंगामी राज्यपाल नेमण्यात आले (१८६२). त्यामुळे त्याला लष्कराबरोबरच प्रशासकीय बाबींकडे लक्ष देणे भाग पडले. तो स्वतःच्या पलटणी घेऊन शांघायला गेला. इंग्रजांच्या मदतीने त्याने थायफींग बंडाचा बीमोड केला. यावेळी चार्ल्स गॉर्डन या इंग्रज सेनाधिकाऱ्याशी त्याची मैत्री जडली. त्यामुळे इंग्रजांची आधुनिक शस्त्रास्त्रे व डावपेच यांचे ज्ञान त्यास झाले. ली याला १८६५-७० दरम्यान मध्य उत्तर आणि पश्र्चिम चीनमध्ये अनेक उठावांना तोंड द्यावे लागले. युनान, सिक्यांग वगैरे प्रदेशांतील मुसलमानांची तीन बंडे (१८५६-७३) आणि त्याच काळातील न्यन या गुप्तसंघटनेच्या कारवाया यांना त्याने अथक परिश्रम घेऊन आळा घातला. परिणामतः त्याची त्सी स्यी या सम्राज्ञीने जृली (होपे) या प्रातांवर महाराज्यपालम्हणून नियुक्ती केली (१८६५-७०). याशिवाय त्याच्याकडे केंद्र शासनाचा महासचिव व उत्तर प्रांतातील व्यापारविषयक अधीक्षक ही पदे सुपूर्त करण्यात आली. पुढे कँटनचे हंगामी राज्यपालपदही काही वर्षे  त्याच्याकडे आले.

सुमारे पंचवीस वर्षांच्या काळात त्याने अनेक शासकीय उच्चपदे भूषविली. या काळात पाश्र्चात्यांच्या विस्तारवादी धोरणास-विशेषतः जपान व रशिया-त्याने पायबंद घातला आणि चीनने लष्करी सामर्थ वाढविण्यावर भर दिला. आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्याने विधायक प्रकल्प कार्यान्वित केले आणि तरूण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले. पाश्यात्त्य धर्तीवर युद्धनौका बनवून आरामारासाठी बंदरांचे आधुनिकीकरण केले आणि लष्करी शिक्षण संस्था सुरू केल्या. लष्कराच्या सुलभ हालचालींसाठी लोहमार्गांचा विस्तार आणि पोस्ट व तार खात्याची केंद्रे वाढविली. यांशिवाय अंतर्गत विकासासाठी कापडगिरण्या, टाकसाळ, लोखंडव कोळशाच्या खाणी यांच्या उद्योगांना उत्तेजन दिले. जपान, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांच्याशी वाटाघाटी करून त्यांची आक्रमणे थोपवून धरली. चीन-जपान युद्धात दारुण पराभव झाल्यानंतर त्याने नामुष्की पतकरून शिमनोसेकीचा तह केला (१८९६). झारच्या राज्याभिषेकास उपस्थित राहून तेथे त्याने गुप्तरीत्या रशियाशी तह केला. रशियाला मँचुरियात ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग बांधण्यास संमती देऊन त्याच्या आक्रमणास पायबंद घातला. कँटनला राज्यपाल असताना बॉक्सर बंडाच्या वेळी त्याने परकीयांच्या मागण्यांवर बंधने लादली (१९००) आणि त्यांच्याबरोबर समझोत्याचे तह केले. नंतर थोड्याच दिवसांत त्याचे बीजिंग येथे निधन झाले.

विद्यमान चीन आधुनिक जगाशी जुळवून घेण्यास असमर्थ आहे, याची त्याला पुर्ण जाण होती, म्हणूनच त्याने पाश्र्चात्त्य आधुनिक शस्त्रास्त्रे मिळविणे आणि लष्काराचे आधुनिकीकरण करणे, हे धोरण अंगीकारले आणि आरमार प्रबळ करण्याचा प्रयत्न केला तसेच थ्येन-जिन येथे शस्त्रास्त्रांचा कारखाना काढून संरक्षणाच्या दृष्टीने आपला प्रांत सुसज्ज केला परंतु चीनच्या इतर भागांतील लष्कर व आरमार संघटित करून सर्व देशाचे ऐक्य साधण्याचे कार्य त्याला करता आले नाही. चीनच्या पडत्या काळातील एक कार्यक्षम प्रशासक व मुत्सद्दी म्हणून त्यास चीनच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

सदर्भ : 1. Hummel A.W. Ed. Eminent Chinese of the Ching Period, (1644-1912). Vol. I, London, 1943.

           2. Rawlinson, John L.China’s Struggle for Naval Development, 1839-1895, Oxford, 1967.

           3. Spector, Stanley, Li Hung-Chang and the Huai Army, Washington, 1964.

           4. Wright, Mrs. Mary C. The Last Stand of Chinese Conservatism, Stanford, 1957. 

ओक, द. ह.