लीबिक, युस्टुस फोन : (१२ मे १८०३-१८ एप्रिल १८७३). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी रसायनशास्त्राचे सुरुवातीचे वर्गीकरण, जीवविज्ञानात रसायनशास्त्राचा उपयोग, रसायनशास्त्रीय शिक्षण व कृषी रसायनशास्त्राची मूलभूत तत्त्वे इ. क्षेत्रांत त्यांनी मोलाची कामगिरी केली.
लीबिक यांचा जन्म डार्मस्टाट, हेस-डार्मस्टाट (जर्मनी) येथे झाला. अल्प काळ औषधनिर्माणशास्त्राचा अभ्यास केल्यावर त्यांनी कार्ल व्हिल्हेल्म गोटलोप कास्टनर यांच्याबरोबर रसायनशास्त्राचा अभ्यास केला व त्यांनी बर्लिन विद्यापीठात प्रवेश घेतला. लीबिक हे कास्टनर यांच्या बरोबर एर्लांगेन विद्यापीठात गेले. १८२२ मध्ये लीबिक यांनी त्या विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली. नंतर त्यांनी पॅरिस येथे गे-ल्युसॅक यांच्या प्रयोगशाळेत संशोधन केले.
इ. स. १८२४ मध्ये लीबिक गिसेन विद्यापीठात दाखल झाले व १८२६ मध्ये ते तेथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. तरुण रसायनशास्त्रज्ञांना रासायनिक संशोधनाच्या पद्धती पद्धतशीरपणे शिकविण्यासाठी त्यांनी गिसेन येथे स्थापलेली प्रयोगशाळा जगभर प्रसिद्ध होती. त्यामुळे यूरोपभरचे विद्यार्थी व पुढे प्रख्यात झालेले अनेक संशोधक त्यांच्याकडे शिक्षणासाठी येऊ लागले. या प्रयोगशाळेने घालून दिलेला अध्ययनाचा कित्ता पुढे जर्मनीत प्रचलित झाला तसेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीत झालेल्या रसायनशास्त्राच्या विकासास बहुतांशी तो कारणीभूत होता. १८४५ मध्ये त्यांना ‘बॅरन’ हा किताब देण्यात आला. १८५२ मध्ये ते म्यूनिक विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले व मृत्यूपावेतो ते तेथेच राहिले.
अकार्बनी व कार्बनी रसायनशास्त्राच्या विविध क्षेत्रांत लीबिक यांनी संशोधन केले यांपैकी काही संशोधन रसायनशास्त्राच्या पुढील विकासाच्या दृष्टीने बहुमोल ठरले. त्यांच्या प्रारंभीच्या सायनिक व फल्मिनिक अम्लांच्या समघटकतेवरील [⟶ समघटकता] अध्ययनाचा त्यांच्या समकालिनांवर जबरदस्त प्रभाव पडला. कार्बनी रसायनशास्त्रातील संशोधनातून त्यांचा फ्रिड्रीख व्हलर यांच्याशी परिचय झाला व दोघांनी अनेक संशोधन प्रकल्पांत एकमेकांस सहकार्य केले. यांपैकी कडू बदामाच्या तेलावरील (बेंझाल्डिहाइड) संशोधन सर्वांत महत्वाचे होय. या तेलातील एक रासायनिक गट त्यावर अनेकविध रासायनिक विक्रिया होऊनही न बदलता तसाच राहतो, असे त्यांना आढळले. अशा गटास मूलक म्हणतात मूलक सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. हा कार्बनी रसायनशास्त्रातील संशोधनात पद्धतशीरपणा आणण्याचा पहिला महत्वाचा प्रयत्न होय.
कार्बन व हायड्रोजन यांच्या निश्चितीकरणाकरिता विकसित केलेल्या लीबिक यांच्या विश्लेषणाच्या सोप्या पद्धतीचे कार्बनी रसायनशास्त्राच्या अध्ययनात खूप साहाय्य झाले. त्यांनी विश्लेषणाद्वारे हॅलोजनांच्या निश्चितीकरणाची पद्धतीही विकसित केली. ‘लीबिक संघनकाचा’ (वाफेचे द्रवात रूपांतर करणाऱ्या एका प्रकारच्या उपकरणाचा) शोध त्यांचा नसला, तरी तो त्यांनी लोकप्रिय केला. तो संघनक अद्यापही प्रयोगशाळांत वापरात आहे.
इ. स. १८३८ नंतर त्यांचे लक्ष वनस्पती व प्राण्यांच्या रसायनशास्त्राकडे वळले त्यांनी ऊतक (समान रचना व कार्य असलेले कोशिकांचे -पेशींचे-समूह) व देहद्रव (लसीकेसारखे शरीरातील स्त्राव) यांची असंख्य वेळा विश्लेषणे केली आणि प्राणिमात्रातील नायट्रोजनयुक्त द्रव्यांचा अभ्यास केला. नंतर त्यांनी आपले लक्ष कृषिविषयक समस्यांवर केंद्रित केले.१८४० मध्ये त्यांनी ‘कृषीमधील व शरीरक्रियाविज्ञानातील कार्बनी रसायनशास्त्राचा उपयोग’ या शीर्षकाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांवर याचा खूपच परिणाम झाला. ह्यूमसमधून वनस्पतींना अन्नपुरवठा होतो हा जुना सिद्धांत त्यांना मान्य नव्हता. वनस्पती हवा आणि जमीन यांमधून कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी व अमोनिया घेतात,असे त्यांनी दाखवून दिले. जमिनीतून कमी होणारी इतर मूलद्रव्य पिकांना देण्यासाठी खनिज जोरखतांचा उपयोग करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
इ. स. १८३२ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या Annalen der Pharmie नंतरचे Annalen der Chemie या नियतकालिकात त्यांचे बहुतेक सर्व लेखन प्रसिद्ध झाले. रसायनशास्त्राच्या प्रमुख नियतकालिकांपैकी हे एक होते. लीबिक म्यूनिक येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.