लीपमान, गाब्रिएल : (१६ ऑगस्ट १८४५-१३ जुलै १९२१). फ्रेंच भौतिकीविज्ञ. रंगीत छायाचित्रणाची एक पद्धत शोधून कढल्याबद्दल त्यांना १९०८ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.

लीपमान यांचा जन्म लक्सेंबर्गमधील होलेरिच येथे झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील पॅरिसला स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण एकोल नॉर्मलमध्ये झाले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना शिक्षकाचे प्रमाणपत्र मिळाले नाही. १८७३ मध्ये जर्मनीतील विज्ञान शिक्षणाच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेल्या सरकारी वैज्ञानिक मंडळावर त्यांची नेमणूक झाली. त्यांनी व्हिल्हेल्म कूने व जी. आर्. किरखोफ यांच्याबरोबर हायडल्बर्ग येथे आणि हेर्मान हेल्महोल्ट्स यांच्या समवेत बर्लिन येथे काम केले. १८७८ मध्ये ते पॅरिस विद्यापीठाच्या विज्ञान शाखेत रुजू झाले. व १८८३ मध्ये गणितीय भौतिकीच्या प्राध्यापकपदावर  त्यांची नेमणूक झाली. तीन वर्षांनंतर ते प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक झाले व पुढे संशोधन प्रयोगशाळेचे  संचालक झाले. ही प्रयोगशाळा नंतर सॉर्बॉन विद्यापीठाकडे सुपूर्त करण्यात आली व मृत्यूपावेतो लीपमान यांनी तिच्या संचालकपदावर काम केले.

लीपमान यांनी भौतिकीच्या अनेक शाखांत (विशेषतः विद्युत्, उष्मागतिकी, प्रकाशकी व प्रकाशरसायनशास्त्र) मूलभूत महत्त्वाचे कार्य केले. १८७३ मध्ये त्यांनी त्यांच्या नावाने ओळखला जाणारा अतिशय अल्प (१/१००० व्होल्ट इतका) विद्युत् दाब मोजणारा केशवाहिनीयुक्त विद्युत् मापक विकसित केला. त्यांनी भौतिकीतील अनेक शाखांमध्ये वापरण्यासाठी विविध कल्पक प्रयुक्त्या तयार केल्या व प्रमाणभूत उपकरणांत सुधारणा केल्या. ज्योतिषशास्त्रात त्यांचा ⇨सीलस्टॅट या उपकरणाचा शोध महत्त्वाचा आहे. या उपकरणाच्या साहाय्याने पृथ्वीच्या गतीचे प्रतिपूरण (भरपाई) करून व परिणामी आकाश अचल ठेवून आकाशाची दुर्बिणीद्वारे दीर्घ उद्‍‌भासनाने छायाचित्रे घेता येतात. त्यांनी पृथ्वीच्या हालचालीचा प्रवेग सरळ मोजणाऱ्या नवीन भूकंपमापकाची योजना तयार केली होती. कालमापनातील व्यक्तिगत दोषांचा निरास करण्यासाठी त्यांनी छायाचित्रीय नोंदणीची पद्धत उपयोगात आणली. त्यांनी ⇨दाबविद्युत् परिणामासंबंधी ⇨प्येर क्यूरी यांच्या कार्याच्या अगोदर व रोघरहित (किंवा अतिसंवाहक) विद्युत् मंडलातील प्रवर्तनासंबंधी ⇨हाईके कामर्लिंग-ऑनेस यांच्या कार्याच्या पूर्वी प्रारंभिक महत्वाचे कार्य केले.

लीपमान यांचे सर्वांत महत्त्वाचे गणले जाणारे कार्य म्हणजे त्यांनी विकसित केलेली रंगांचे पुनरूत्पादन करणारी छायाचित्रणाची प्रक्रिया हे होय या प्रक्रियेचा सर्वसाधारण सिद्धांत त्यांनी १८८६ मध्ये विकसित केला होता पण ती प्रत्यक्षात आणण्यात बऱ्याच अडचणी होत्या. अनेक प्रयोगांनंतर त्यांनी ॲकॅडेमी  ऑफ सायन्सेसला ही प्रक्रिया १८९१ मध्ये कळविली. मात्र तेव्हा वापरलेल्या फिल्मच्या बदल्यात प्रकाश संवेदनक्षमतेमुळे त्यांनी सादर केलेली छायाचित्रे काहीशी सदोष होती. तथापि १८९३ मध्ये त्यांनी सादर केलेल्या, त्यांची प्रक्रिया वापरून ल्यूम्येअर बंधूंनी घेतलेल्या छायाचित्रांतील रंग नैसर्गिक रंगांशी साम्य असण्याच्या बाबतीत पुष्कळच परिपूर्ण होते. या प्रक्रियेचा संपूर्ण सिद्धांत त्यांनी १८९४ मध्ये प्रसिद्ध केला. या प्रक्रियेत त्यांनी रंजकद्रव्ये व रंगद्रव्ये यांच्याऐवजी त्या त्या तरंगलांबीचे नैसर्गिक रंग वापरले होते. याकरिता त्यांनी काचेवरील सापेक्षत: जाड असलेल्या समग्रवर्णी पायसाच्या, (वर्णपटातील सर्व रंगांना संवेदनशील असलेल्या रासायनिक द्रव्याच्या) मागे पाऱ्याचा परावर्तक थर दिला. हा थर प्रकाशकिरण पायसामधून उद्गमाकडे परावर्तित करीत असे व आपाती किरणांशी या परावर्तित किरणांचे व्यतिकरण [⟶ प्रकाशकी] होऊन अप्रगामी तरंगांद्वारे सुप्त प्रतिमा तयार होई. या प्रतिमेची खोली प्रत्येक किरणाच्या रंगानुसार बदलत असे. नंतर नेहमीच्या विकाशन  प्रक्रियेने या प्रतिमेचे पुनरुत्पादन केल्यावर तीत अर्ध्या तरंगलांबीच्या अंतराच्या फरकाने चांदीचे परावर्तक थर आढळत. ही प्रतिमा परावर्तित प्रकाशाने पाहिल्यास मूळ किरणशलाकेनुरूप रंग क्रमागत प्रतलांवरून होणाऱ्याच परावर्तनामुळे चांगला प्रबलित होऊन ती प्रतिमा उत्तम प्रकारे मूळ दृश्याप्रमाणे दिसत असे. रंगीत छायाचित्रणाची ही एकमेव सरळ पद्धत दीर्घ उद्भासन काळामुळे मंद व कंटाळवाणी होती आणि तीत मूळ प्रतिमेवरून तिच्या प्रतीही काढता येत नसत. यामुळे ही पद्धत लोकप्रिय होऊ शकली नाही परंतु रंगीत छायाचित्रणाच्या विकासातील ती एक महत्त्वाची पायरी होती.

 

लीपमान यांचे संशोधन कार्य मुख्यत्वे पॅरिस ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसशी त्यांनी केलेल्या पत्रव्यहाराच्या  स्वरूपात आहे. ते ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे १८८३ मध्ये सदस्य झाले व १९१२ मध्ये तिचे अध्यक्ष होते. ते ब्यूरो द लाँजिट्यूड्सच्या मंडळाचे सदस्य होते, तसेच लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य होते. एका शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून ते कॅनडाला गेले असता, परतीच्या सागरी प्रवासात जहाजावरच ते मृत्यू पावले.

भदे, व. ग.