लिनन :⇨ फ्लॅक्सच्या तंतूंपासून बनविण्यात येणारे कापड व धागा यांना लिनन म्हणतात. एकसारखा धागा, तलमपणा व घट्ट वीण ही या कापडाची वैशिष्ट्ये असून हे मुख्यत्वे कपडे, पडदे, चादरी, टॉवेल वगैरेंसाठी वापरतात.
कदाचित मानवाने वापरलेला फ्लॅक्स हा पहिला वनस्पतिज तंतू असावा. कारण सरोवराभोवती रहाणारे स्विस लोक सु. १० हजार वर्षांपूर्वी या तंतूंपासून दोर व मासेमारीची जाळी बनवीत तर याचे कापड सर्वप्रथम नवाश्मयुगात (इ.स.पू.सु. ८ हजार ते ३ हजार वर्षांच्या काळात) तयार करण्यात आले होते. ईजिप्तमधील ममींच्या भोवती लिननचे कापड गुंडाळलेले आढळले असून तेथील थडग्यांवर सूतकताई व विणकाम या क्रियांची सूचक चित्रे सापडली आहेत. तसेच नाईलच्या किनारी भागात उच्च दर्जाच्या फ्लॅक्सचे पीक सु. चार हजार वर्षांपूर्वी घेत असत. प्राचीन ग्रीक, हिब्रू व ईजिप्शियन धर्मगुरू पावित्र्य व शुद्धता यांचे प्रतीक म्हणून लिननचे कपडे वापरीत. ईजिप्तमधून ग्रीस व इटलीत फ्लॅक्सची निर्यात होत असे. ग्रीसमध्ये ते तेलासाठी आयात करण्यात येई. नंतर उत्तर इटलीत फ्लॅक्सचे पीक घेत आणि त्यापासून धागा, दोर व वाती तयार करीत. स्पेनमध्येही चांगल्या दर्जाचे फ्लॅक्सचे पीक घेण्यात येई. अशा तऱ्हेने मध्युगापर्यंत सर्व युरोपात तेल व तंतू यांकरिता फ्लॅक्सचे पीक घेण्यात येऊ लागले. प्रबोधन काळात इटलीचे लिनन कापड प्रसिद्ध होते. तथापि तंतूंपासून हे कापड बनविण्याच्या प्रक्रियांमध्ये शेकडो वर्षे फरक झाला नव्हता.
यूरोपात लिननचे आधुनिक युग इ. स. १६०० नंतर सुरू झाले आणि लवकरच हे कापड तयार करण्याचा गृहोद्योग विविध देशांत भरभराटीला आला. आधुनिक काळाच्या प्रारंभी हा उद्योग जर्मनी, बेल्जियम, उत्तर फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरर्लंड्स, उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड व इंग्लंडमधील काही भाग येथे पसरला होता. अठराव्या शतकाच्या शेवटी रिचर्ड आर्कराइट, जेम्स हार्ग्रीव्हझ आणि सॅम्युएल क्रॉम्पटन यांनी सूतकताई, माग व विणकाम यांविषयी महत्त्वाचे शोध लावले. या शोधांचा सूती कापड उद्योगाला अधिक लाभ होऊन त्याची भरभराट झाली व लिनन उद्योगाची पिछेहाट झाली. फ्रान्समध्ये लिनन उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करण्यात आले पण त्याचा उपयोग झाला नाही. तथापि इंग्लंडमधील जॉन केंड्रयू व टॉमस पीटरहाउस यांनी नवीन तत्त्वावर कार्य करणारे लिननच्या धाग्याची कताई करणारे यंत्र तयार केले आणि १७८७ साली त्याचे एकस्व (पेटंट) घेऊन पहिली लिनन सूत गिरणी उभारली. मात्र ही पद्धती प्रत्यक्ष वापरताना अनेक अडचणी आल्याने ती बरीच वर्षे वापरात आली नाही. १८१२ सालापासून विणकामासाठी यांत्रिक शक्तीचा वापर करण्यात येऊ लागला, तर १८२१ साली प्रथमच यंत्रमागावर लिननचे कापड विणण्यात येऊ लागले.
अळशीच्या (फ्लॅक्सच्या) पिकाविषयीची माहिती ‘अळशी’ या नोंदीत तर या वनस्पतीपासून फ्लॅक्सचे तंतू मिळविण्याची माहीती ‘फ्लॅक्स’ या नोंदीत दिलेली आहे. या तंतूसाठी या पिकाची सर्वाधिक लागवड रशियात केली जाते. फ्लॅक्सचे तंतू व त्यापासून कापड बनविण्यासाठी विविध प्रक्रिया करतात. तंतूंची बळकटी, सौंदर्य व झळाळी टिकून राहण्यासाठी या प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक करतात.
तंतू, धागा व कापड यांचे गुणधर्म : हा एक सर्वाधिक बळकट नैसर्गिक तंतू असून याची लांबी १५ ते १०० सेंमी. असते. याचा रंग करडा तपकिरी ते सायरंगी असून विरंजनाने (रंग घालविण्याच्या क्रियेने) हा पांढरा शुभ्र होऊ शकतो. सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यास हा तंतू केसासारखा दंडगोलाकार दिसतो. याची टोके निमुळती होत गेलेली असून याचे तंतुखंड पेक्टिन या डिंकासारख्या चिकट पदार्थाने चिकटलेले असतात. लांब तंतुखंडाच्या मध्यभागी नाल वा वेज असते (म्हणजे तो काहीसा पोकळ असतो). तो सरळ, गुळगुळीत बांबूच्या काठीसारखा दिसतो. यातील सांध्यांमुळे याला निसर्गतःच अनियमितपणा आलेला असून तो टाळता येत नाही. यामुळे तो हाताला काहीसा चरबट लागतो पण वापराने तो अधिकाधिक मऊ (व कापड सुळसुरळीत) होत जातो. या तंतूत ७० टक्के सेल्युलोज, २५ टक्के पेक्टिन आणि ऊतक (पेशीसमूह) व राख ही असतात. या तंतूपासून बनविण्यात येणारा धागा सरळ, गुळगुळीत व चमकदार असतो. तंतूपासून धागा बनतो तेव्हा त्यात सु. ३२ तंतू असतात. धाग्याची लांबी सु. ६ ते ७ सेंमी. असते.
लिननचे कापड ताठ, बळकट, चांगले टिकाऊ व चमकदार असते. ते सुती कापडापेक्षा अधिक ओलावा शोषते. अधिक गरम पाण्यात धुता येते. याला लवकर सुरकुत्या पडतात व अधिक लवकर मळतेही. हे लवकर वाळते व याला जलद इस्त्रीही करता येते. सूती कापडापेक्षा लिननवर रसायनांचा अधिक परिणाम होतो आणि सुती कापडाएवढे ते सहज रंगविता येत नाही.
सूतकताई, विणकाम व अंतिम संस्करण : आखूड तंतू पिंजून त्याचे जाडेभरडे सूत काततात आणि त्यापासून कॅनव्हास, टॉवेल, सतरंज्या यांसारखी जाडीभरडी वस्त्रे विणतात. लांब तंतू हातांनी वा यंत्राने चादरीप्रमाणे पसरून त्यांपासून पेळू या वाती बनवितात. पेळूपासून कापसाप्रमाणे सूत (धागा) काततात. सूतकताईच्या दमट वा कोरडी अशा पद्धती असून दमट पद्धतीमध्ये पेळू प्रथम कोमट पाण्याच्या तबकातून नेला जातो. नंतर धाग्यापासून साध्या वा जकार्ड मागावर कापड विणतात. [→ कापड उद्योग विणकाम सूतकताई].
लिननचे कापड शोभिवंत करण्यासाठी त्यावर अंतिम संस्करण करतात. यासाठी कापडाचे ४ ते १६ थर एकावर एक ठेवून त्यांवर ओलसर रूळाने दाब देतात अथवा पोलादी वा लाकडी हातोड्यांनी ते ठोकतात. यामुळे कापड सपाट होऊन ताण्याबाण्यातील फटी भरून येतात. परिणामी कापडाला चांगली चमक येते. चुण्या पडू नयेत म्हणून कापडाला रेझिनाचे संस्करण करतात. याकरिता प्रथम कापडावरची धूळ व तेलकटपणा काढतात. नंतर ते दाहक कुंडातून नेतात. त्यामुळे कापड आकसून तंतू उघडे होऊन त्यात रेझीन शोषले जाऊ शकते. मग कापड रेझिनाच्या विद्रावातून नेल्यावर तंतूंमध्ये रेझीन घुसते. नंतर कापड चौकटीवर ताणले गेल्यावर मुरविण्याच्या कोठीतून जाते. यामुळे रेझीन पक्के होऊन मग कापडाला सहजासहजी चुण्या पडत नाहीत. [→ कापडावरील अंतिम संस्करण].
जागतिक उत्पादन : रशिया, बेल्जियम, पोलंड, रूमानिया, चेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स, हंगेरी, जपान व नेदर्लंड्स हे लिननचा धागा व कापड बनविणारे प्रमुख देश आहेत. बेल्जियम व आयर्लंड येथील कापड सर्वाधिक तलम असून त्याची तेथून निर्यातही होते. आयर्लंडमध्ये धागा बेल्जियममधून आणतात. यांशिवाय चीन, ईजिप्त, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केन्या, युगांडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा येथेही तंतूसाठी अळशीचे पीक घेण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. भारतातही १९५० च्या सुमारास असे प्रयत्न झाले. मात्र भारतात उत्तम प्रतीचे तंतू मिळविता येणे शक्य नसल्याचे आढळले असून मध्यम प्रतीचे तंतू आयात करण्यापेक्षा येथे पीक घेऊन निर्माण करणे फायद्याचे ठरेल, असाही अंदाज होता. मात्र यात विशेष प्रगती झालेली नाही.
उपयोग : कॅनव्हास, गालिचाच्या तळाचे अस्तर यांसारख्या अगदी जाड्याभरड्या प्रकारांपासून ते अगदी तलम अशा दमस्क लिननपर्यंतच्या वस्त्रप्रावरणांसाठी लिनन कापड वापरतात. बर्ड आय, बुचर, केंब्रिक, हका बॅक, दमस्क इ. लिननचे प्रकार असून त्यांचा पुढील वस्त्रप्रावरणांसाठी उपयोग करतात: हातरुमाल, टॉवेल, नॅपकिन, टेबलक्लॉथ, चादरी, पलंगपोस, अभ्रे, पडदे, सुशोभनाचे व छत्रीचे कापड, चटया, धर्मगुरूंची व वेदीवर घालावयाची वस्त्रे, पिशव्या, टोप्या, गळपट्टे, कपडे, अंतर्वस्त्रे व वस्त्रे (पोलकी, कोट, मुलांचे कपडे, सदरे, स्कर्ट, विजार, जाकिट, टाय वगैरे), नवार, लेस इत्यादी. लिननचा धागा दोर, दोरा (कातडी वस्तू शिवण्याचा), मासेमारीची जाळी, यंत्रांचे पट्टे, आग विझविण्यासाठी वापरण्यात येणारे नळ, कशिदाकाम, पुस्तकबांधणी वगैरेंसाठी वापरतात. लिननचे आखूड तंतू गाद्यागिरद्या भरण्यासाठी व उत्तम प्रतीचा कागद बनविण्यासाठी (उदा., सिगारेटचा, नोटेचा) वापरतात.
फ्लॅक्स अर्थाच्या लॅटिन शब्दावरून लिनन हे नाव आलेले आहे.
पहा : अळशी तंतु, नैसर्गिक फ्लॅक्स.
संदर्भ : 1. Editors of American Fabrics Magazine, Encyclopedia of Textiles, Englewood Cliffs, N. J., 1960.
2. Kirby, R. H.Vegetable Fibres, Botany, Cultivation and Utilization, London, 1963.
3. Warden, A. J. The Linen Trade, Ancient and Modern, New York, 1968.
लोखंडे, हि. तु. ठाकूर, अ. ना.