लिथ्रेसी : (मेंदी वा मेंदिका कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] एका कुलाचे नाव. मेंदी, धायटी, चिनाई मेंदी, नाणा, बोंडारा, तामण, जलमुखी इ. परिचित वनस्पती याच कुलातील आहेत. या कुलाचा अंतर्भाव ⇨मिर्टेलीझ अथवा जंबुल गणात केलेला असून ए. बी. रेंडेल व जे. एन्. मित्र यांच्या सुधारित पद्धतीत थायमेलेसी, एलेग्नेसी, लिथ्रेसी, प्युनिकेसी, ऱ्हायझोफोरेसी, सोनेरॅशिएसी, काँब्रेटेसी, लेसिथिडेसी, मिर्टेसी, मेलॅस्टोमेसी, ऑनेग्रेसी, हॅलोरॅगेसी व हिप्पुरिडेसी ही तेरा कुले त्या गणात घातली आहेत. ए. एंग्लर यांच्या मूळच्या पद्धतीत मिर्टीफ्लोरी या बत्तिसाव्या श्रेणीतील बावीस कुलांपैकी लिथ्रेसी हे एक कुल आहे. जी. बेंथॅम आणि जे. डी. हूकर यांच्या पद्धतीत मिर्टेलीझ गणात फक्त सहा कुले असून लिथ्रेसी त्यांपैकी एक आहे. डाळिंब, कांदळी, कांकरा व सोनेरॅशिया (चिप्पी, तिवार यांची प्रजाती) यांचा अंतर्भाव पूर्वी लिथ्रेसी कुलात करीत परंतु हल्ली डाळिंब प्युनिकेसी (ग्रॅनेटेसी) कुलात, कांदळ व कांकरा ऱ्हायझोफोरेसी कुलात आणि सोनेरॅशियाद्वाबंगा [→ बांदोरहुल्ला] ही प्रजाती सोनेरॅशिएसी कुलात असे वर्गीकरण केलेले आढळते.

लिथेसी कुलात सु. २३ प्रजाती व ४५० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते २५ प्रजाती आणि ५५० जाती) असून त्या ⇨ औषधी, ⇨ क्षुपे (झुडपे) व वृक्ष आहेत. त्यांचा प्रसार मुख्यतः अमेरिकेतील उष्ण प्रदेशात आहे. आशियात व यूरोपात काही प्रजाती व समशीतोष्ण प्रदेशात आणखी काही प्रजाती आढळतात. त्यांची पाने बहुधा साधी, समोरासमोर, दोन किंवा अधिक, अनुपपर्ण (तळाशी उपांगे नसलेली) असतात. फुलोरे कुंठित परिमंजरी प्रकारचे [→ पुष्पबंध] असतात. क्वचित एकाकी फुले असतात ती द्विलिंगी, नियमित व परिकिंज (इतर पुष्पदलांची मंडले किंजदलाभोवती असणारी) असून संदले ४, ६ किंवा ८ एकत्र जुळून त्यांचा पेला बनतो. प्रदले (पाकळ्या) व संदले एकाआड एक, सुटी व संवर्तावर चिकटलेली असतात. केसरदले (पुं-केसर ) बहुधा संख्येने प्रदलांच्या दुप्पट, सुटी व दोन मंडलांत किंवा संख्येने अनेक असतात. किंजदले (स्त्री-केसर) २-६, जुळलेली असून किंजपुट पूर्ण ऊर्ध्वस्थ किंवा अर्धवट ऊर्ध्वस्थ व २-६ कप्प्यांचा असतो. बीजके (अविकसित बिया) अधोमुखी, बहुधा अनेक व अक्षलग्न(किंजपुटातील मध्यवर्ती दांड्यास चिकटलेली) असतात [→ फूल]. फळात (बोंडात) अनेक अपुष्क (दलिकाबाहेर अन्नांश नसलेल्या) बिया असतात. वनस्पतींच्या खोडात अंतःप्रकाष्ठी (जलवाहक भागात विखरून असणारे) ⇨ परिकाष्ठ (अन्नवाहक भाग) असते. या कुलातील काही वनस्पती शोभेकरिता (उदा., ⇨ बोंडारा, तामण, चिनाई मेंदी इ.), काही लाकडाकरीता (उदा., ⇨ नाणा) तर⇨ मेंदी व⇨जलमुखी औषधांकरिता प्रसिद्ध आहेत. मेंदीच्या फुलापासून हिना अत्तर मिळते. 

पहा : मिर्टेलीझ मिर्टेसी.

संदर्भ :  1. Mitra, J. N. An ntroduction to systematic Botany and Ecology, Calcutta,1964.

            2. Rendle, A. B. The classification of flowering plants, Vol.॥, Cambridge, 1963.

कुलकर्णी, उ. के.