लिंक्स : हा प्राणी मांजराच्या प्रजातीतील असून बिबळ्यापेक्षा लहान आणि रानमांजरापेक्षा मोठा असतो. अमेरिका आणि यूरोपच्या उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आणि आशियाच्या उत्तर व मध्य भागांत हे प्राणी आढळतात. भारतात गंगा-सिंधू नदीच्या खोऱ्याचा वरचा भाग, गिलगिट आणि लडाख या भागांत ते राहतात. हे तिबेटमध्येही आढळतात. भारतात आढळणारा लिंक्स उत्तर यूरोप आणि आशियात आढळणाऱ्या लिंक्सची एक उपजाती आहे. त्याचे शास्त्रीय नाव फेलिस लिंक्स इसाबेलिना असे आहे.
लिंक्स जंगलात राहतात पण वाळुंजाच्या दाट झुडुपात, वेताच्या दाट जाळ्यात किंवा उंच गवतात ते नेहमी दडलेले असतात. डोंगराळ आणि खडकाळ भागांतही ते जातात. उन्हाळ्यात २,७४५ ते ३,३५५ मी . उंचीवरच्या प्रदेशातही ते आढळले आहेत.
लिंक्सच्या शरीराची लांबी सरासरी ९० सेमी. असते शेपटी सु. १८-२३ सेंमी. लांब असून तिचे टोक काळे असते. पाय लांब, जाड आणि मजबूत असतात. गालांवर लांब, लोंबत्या केसांचे कल्ले असतात कानांच्या टोकांवर लांब, सरळ केसांचे झुपके असतात अंगावरचे केस लांब आणि मऊ असतात रंग फिकट तपकिरी किंवा करडा असून सामान्यतः त्याच्यावर गर्द तपकिरी ठिपके बहुधा हिवाळ्यात नाहीसे होतात. यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते दगडी भिंतीमधून यांना पलीकडचे दिसते असा पूर्वी यूरोपात समज होता.
पकडून ठार करता येतील असे सगळे सस्तन प्राणी व पक्षी यांचे भक्ष्य असून ससे, मार्मोट, कृकण पक्षी,तितर इ. प्राण्यांची हे शिकार करतात इतकेच नव्हे तर संधी बकऱ्या व मेंढ्यांच्या कळपावर ते हल्ले करतात.
भारतीय लिंक्सच्या प्रजोत्पादनाच्या काळाविषयी किंवा वर्तना विषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. मादीला दर खेपेला २-३ पिल्ले होतात व ती त्यांना एखाद्या गुहेत लपवून ठेवते असे म्हणतात. पिल्ले जन्मतः आंधळी असून दहा दिवसांनंतर त्यांचे डोळे उघडतात.
कॅनडियन लिंक्स (फे. कॅनडेन्सिस), लाल लिंक्स आणि स्पॅनिश (फे. पार्डिना) लिंक्स हे लिंक्सचे मुख्य प्रकार आहेत. कॅनडियन लिंक्सची लांबी सु. ९२ सेंमी. असून त्याला लांब मिशा असतात. पावले रुंद असल्यामुळे त्याला बर्फाळ प्रदेशात सहज चालता येते. लाल लिंक्स कॅनडियन लिंक्स एवढाच असतो रंग तपकिरी लाल असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके व रेषा असतात. हा निशाचर आहे. स्पॅनिश लिंक्सचे पाय थोडे लांब व कान टोकदार असतात. वेळोवेळी शिकार केल्यामुळे यांची संख्या बरीच कमी झाली आहे.
डाहाके, ज्ञा. ल.
“