लिंकन–१ : पूर्व-मध्य इंग्‍लंडमधील लिंकन परगण्यातील एक महत्त्वाचे व इंग्‍लंडमधील अतिप्राचीन शहरांपैकी एक शहर. लोकसंख्या ७६,६०० (१९८२). हे १९७४ पर्यंत लिंकन परगण्याचे मुख्य ठिकाण व लिंडसे विभागाचे प्रशासकीय केंद्र होते. लंडनच्या उत्तरेस २०९ किमी., तर मँचेस्टरच्या आग्‍नेयीस ११० किमी. विथॅम नदीकाठी हे वसलेले आहे. या नदीने लिंकन कटकाच्या चुनखडीयुक्त भृगुप्रदेशात एक खोल विवर तयार केलेले असून त्याच्या टोकाशी, सस.पासून सु.६० मी. उंचीवर हे शहर मनोवेधक ठिकाणी वसले आहे. लिंडम (सांप्रतचे लिंकन) हे रोमनकालीन ब्रिटनमधील उल्लेखनीय शहरांपैकी एक होते. इ. स. ७१ च्या सुमारास येथे सेवानिवृत्त लष्करी सैनिकांची वसाहत होती. याच काळात शहराच्या संरक्षक भिंती उभारण्यात आल्या. त्यावेळीची न्यूपोर्ट कमान व त्यानंतर मध्ययुगीन काळात बांधलेल्या एक्सचेकर, पॉटर व स्टोनबो या प्रवेशद्वारांचे अवशेष अजूनही पहावयास मिळतात. 

डॅनिश राजवटीत पूर्व इंग्‍लंडमधील पाच बरोंपैकी लिंकन हा एक बरो होता. दुसरा हेन्‍री याने ११५४ मध्ये शहराला पहिल्यांदा सनद प्राप्त करून दिली. त्यामुळे लिंकनच्या नागरिकांना जवळजवळ लंडनच्या नागरिकांइतके विशेषाधिकार व स्वातंत्र्य मिळाले. तेराव्या शतकाच्या अखेरीस लोकर, कातडी व चामडी उत्पादन तसेच व्यापार यांमुळे शहराची भरभराट झाली. रस्ते व लोहमार्गाचे केंद्र असलेले लिंकन आसमंतातील कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेचे, शेतमालावर प्रक्रिया करण्याचे तसेच अवजड यंत्रसामग्री, विद्युत् अभियांत्रिकी, वाहनांचे सुटे भाग, अन्नोत्पादने व रेडिओ-निर्मितिउद्योगाचे केंद्र आहे. मध्ययुगीन काळात सुरूवातीला हे लोकरीच्या व्यापाराचे व त्यानंतर कापड व्यापाराचे महत्त्वाचे बंदर होते. आज मात्र याचा बंदर म्हणून वापर करण्यात येत नाही.

शहरात रोमनकालीन तसेच मध्ययुगीन अनेक उल्लेखनीय वास्तू किंवा अवशेष पहावयास मिळतात. सार्वजनिक कारंजे, स्‍नानगृहे, दफनभूमी, भट्ट्या हे रोमनकालीन अवशेष होत. येथील वस्तुसंग्रहालयात रोमन पुरावशेषांचा फार मोठा संग्रह आहे. येथील कॅथीड्रल म्हणजे इंग्‍लंडमधील अत्यंत सुंदर व प्रसिद्ध अशा गॉथिक चर्चपैकी एक आहे. ११ व्या शतकाच्या उत्तरार्धात या कॅथीड्रलच्या बांधकामास सुरूवात झाली असली, तरी बरेचसे बांधकाम १२ व्या व १३ व्या शतकांत झालेले आहे. शहर दिसू शकेल अशा उंच भागी हे कॅथीड्रल आहे. स्थानिक चुनखडकात बांधलेले हे कॅथीड्रल बाहेरून बरेच विदारित झालेले आहे. पण आतून गॉथिक वास्तुशिल्पाच्या सुंदर रचना पहावयास मिळतात. कॅथीड्रलभोवती असलेली बहुकोनाकृती ‘चॅप्टर हाउस’ (इ.स.१२२५) ही आद्य इंग्‍लिश कलाकृती आहे. कॅथीड्रलच्या उत्तरेस विल्यम द काँकरर याने बांधलेल्या लिंकन किल्ल्याचे अवशेष आढळतात. किल्ल्यावर १०६८ साल दर्शविलेले आहे. किल्लात नॉर्मन अवशेषही आढळतात. १०७५ ते १५०१ या काळात बांधलेल्या द ग्रेट कॅथीड्रलच्या मध्यभागी ८३ मी. उंचीचा मनोरा असून त्यातील ‘ग्रेट टॉम ऑफ लिंकन’ ही घंटा प्रसिद्ध आहे. अनेक शतके येथील घोड्यांच्या शर्यती व यात्रा प्रसिद्ध होत्या. शहरात शिक्षक-प्रशिक्षण, धर्मशास्त्रविषयक तसेच कला व तंत्र महाविद्यालये आहेत.

सावंत, प्र. रा. चौधरी, वसंत