लिअपोल्ड, दुसरा : (९ एप्रिल १८३५-१७ डिसेंबर १९०९). बेल्जियमचा राजा पहिला लिअपोल्डचा हा लिअपोल्डचा हा मूलगा. जन्मस्थान ब्रूसेल्स (बेल्जियम) येथे. वयाच्या एकविसाव्या वर्षी तो गादीवर बसला. तत्पूर्वी याचे बेल्जियम व जर्मनीमध्ये लष्करी शिक्षण झाले होते. भारत, चीन, ईजिप्त इ. देशात प्रवास करून त्याने राजकारणाची माहिती मिळविली. बेल्जियमचा औद्योगिक विकास आणि व्यापारविस्तार यांकडे त्याने विशेष लक्ष दिले व त्यासाठी बेल्जियमचे व्यापारी आरमार वाढविण्याचा प्रयत्न केला. अन्य यूरोपीय देशांप्रमाणे बेल्जिमनेही वसाहती स्थापाव्यात, असे त्याचे मत होते. त्या दृष्टीने त्याने आफ्रिका खंडाकडे विशेष लक्ष देऊन १८७६ साली ब्रूसेल्स येथे भूगोलतज्ञांची एक परिषद बोलावली. सुधारणा व व्यापार आणि उद्योगधंदे यांसाठी हा भूखंड कसा खुला करता येईल, याचा विचार या परिषदेत झाला आणि ही माहिती मिळविण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्थाही स्थापन केली. आफ्रीका खंडाचे अन्वेषण आणि तिच्या समित्या निरनिराळ्या देशांत स्थापन केल्या. त्याने या संस्थेचे आंतरराष्ट्रीय समन्वेषक सर हेन्री मॉर्टन स्टॅन्ली यांच्या मदतीने काँगोमधील नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळवली. या कामासाठी लिअपोल्डने सर्व पैसा खर्च केल्याने स्वाभाविकच काँगोवरील कार्यवाहीत त्याचे वर्चस्व राहिले. १८८४-८५ च्या बर्लिन परिषदेत आफ्रिकेच्या विकासासंबंधी पुष्कळ चर्चा होऊन काँगोचे राज्य स्थापन करण्याचे ठरले व त्यावर लिअपोल्डची राजा म्हणून निवड झाली. या काँगो फ्री स्टेटमध्ये निरनिराळे मक्ते देऊन व स्वतः व्यापार-उद्योग करून त्याने अमाप पैसा मिळविला पण आफ्रिकेतील याच्या भ्रष्ट व स्वार्थी कारभाराचा गवगवा झाल्याने, त्याला चौकशी समिती नेमावी लागली. त्या समितीने त्याच्या प्रशासनाची कडक शब्दांत निंदा केल्याने काँगोचा मुलूख त्याला बेल्जियम सरकारच्या स्वाधीन करावा लागला (१९०८).
युद्याचा धोका ओळखून लिअपोल्डने बेल्जियमचे लष्कर जय्यत ठेवले व देशाच्या पूर्व सीमेवर अनेक किल्ले बांधले. १८७०-७१ च्या फ्रँको-प्रशियन (जर्मन) युद्धात त्याने मोठ्या मुत्सद्देगिरीने बेल्जियमची तटस्थता राखली आणि अंतर्गत धार्मिक संघर्षात आपल्या देशाचे उत्तम नेतृत्व केले.
संदर्भ : Ketelbey, C. D. M. A History of Modern Times, Toronto, 1970.
ओक, द. ह.