लॉरां, ऑग्यूस्त : (१४ नोव्हेंबर १८०७-२३ एप्रिल १८५३). फ्रेंच रसायनाशास्त्रज्ञ. यांनी कार्बनी संयुगांच्या संरचनेविषयीच्या ज्ञानात मोलाची भर घातली. यांचा जन्म ला फोली येथे व शिक्षण पॅरिसमधील खाणकाम शाळेत झाले. पॅरिसमध्ये झां द्युमा यांचे साहाय्यक होण्यापूर्वी काही काळ लॉरां यांनी खाण अभियंते म्हणून काम केले. १८३८ मध्ये ते बॉर्दो येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १८४६ मध्ये ते पॅरिसला परतले व १८४८ पासून तेथील टाकसालीत काम करु लागले.

लॉरां यांनी पुष्कळ महत्त्वाच्या कार्बनी संयुगांचा शोध लावला व शार्ल झेरार यांच्या मदतीने त्या संयुगांच्या वर्गीकरणाची शास्त्रीय पद्धत विकसित केली. १८३४ मध्ये द्युमा यांनी प्रतिष्ठापन सिद्धांताचे सुसूत्रीकरण केले होते. या सिद्धांतांप्रमाणे काही विशिष्ट पदार्थांतून हायड्रोजन प्रत्यक्षपणे काढला जाऊन त्याच्या जागी दुसरा पदार्थ घातला जातो. या सिद्धातांच्या आधारे लॉरां यांनी यन्स याकॉप बर्झीलियस यांचा विद्युत् रासायनिक सिद्धांत हाणून पाडला. त्या वेळी प्रचलित असलेल्या रसायनशास्त्रावरील लॉरां यांच्या प्रखर टीकेमुळे त्यांना विशेष पाठिंबा मिळाला नाही व म्हणावी अशी प्रसिद्धीस मिळाली नाही.

रसायनशास्त्राज्ञांनी अणूभार, रेणूभार व सममूल्यांक यांत अगदी स्पष्ट भेद केलाच पाहिजे, या विचाराचे लॉरां होते. हायड्रोजन, ऑक्सिजन व इतर द्रव्ये ही दोन अणूंची बनलेली असतात, असे लॉरां मानीत. त्यांनी अणूभार निश्चित करण्याच्या पद्धतीत सुधारणा केली व त्यामुळे ॲव्होगाड्रो गृहीतक स्वीकारण्यास मदत झाली.

Methode de chimie (१८५४) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर त्यांना मरणोत्तर मान मिळाला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले. 

जमदाडे, ज. वि.