लॉपिश, फॅर्नांउ : (सु.१३८०-सु.१४६०). पोर्तुगीज इतिहासकार. त्याचा जन्म आणि मृत्यू कोठे झाला, ह्याबद्दलची निश्चित माहिती मिळत नाही. तथापि दुआर्ती (कार. १४३३-३८) ह्याचा तो सचिव होता, तसेच पोर्तुगालच्या राजअभिलेखागाराचा (रॉयल अर्‍काइव्ह्‍ज) प्रमुख म्हणून त्याची नेमणुक झाली होती. पोर्तुगीज राजांनी इतिवृत्ते अगदी सुरूवातीपासून राजा पहिला झ्युआंउ ह्याच्या कारकीर्दीत त्याने लिहिली, हे लेखन १४३४ ते १४५० ह्या कालखंडात झाल्याचे दिसते. तथापि त्याच्या इतिवृत्तांपैकी काहीच आज उपलब्ध आहेत : ‘क्रॉनिकल ऑफ दाँ पेद्रू’, ‘क्रॉनिकल ऑफ दाँ फेर्दिनांट’, आणि ‘क्रॉनिकल ऑफ दाँ झ्युआंउ पहिला’ ह्या इतिवृत्ताचे पहिले दोन भाग (सर्व इं. शी.)

पोर्तुगालचा पहिला थोर इतिहासकार म्हणून लॉपिश ओळखला जातो. सत्याचे व निःपक्षपातीपणाचे भान त्याने आपल्या इतिहास लेखनात ठेवले. उपलब्ध कागदपत्रे तो अत्यंत पद्धतीशीरपणे उपयोगात आणीत असे. त्याने लिहिलेला इतिहास हा केवळ व्यक्ती आणि घटना ह्यांचे वर्णन, अशा स्वरूपाचा नव्हता. त्याची शैली काहीशी आर्ष असली, तरी वेधक आणि चित्रमय आहे. 

रॉड्रिग्‍ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)