लाळ रोग : महाराष्ट्रात हा पशुरोग ‘पायलाग’ आणि ‘खूरखूत’ या नावांनीही ओळखला जातो. व्हायरसामुळे होणारा हा रोग खुराला गेळे (भेग) असलेल्या गाईगुरे, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व डुकरे यांना होतो. तसेच तो हरिणे व तत्सम समखुरी (पायावरील खुरांची संख्या सम असलेले) वन्य प्राणी धरून एकूण ३२ समखुरी प्राण्यांमध्ये आढळून येतो. मनुष्याला हा रोग होऊ शकतो. गाईगुरे व डुकरे हे पशू तसेच लहान मुले जास्त रोगग्रहणशील आहेत. सुमारे दोन हजार वर्षांपासून लाळ रोगाचे अस्तित्व माहित आहे परंतु त्याचा अभ्यास मात्र सतराव्या व अठराव्या शतकांत झाला. जगातील बहुतेक देशांमध्ये हा अस्तित्वात होता.
आफ्रिका, आशिया, जपान, फिलिपीन्स, यूरोप येथे हा रोग पशुस्थानिक (रोगकारकाच्या अस्तित्वामुळे एखाद्या भागातील पशूंमध्ये वारंवार उद्भवणारा) स्वरूपात होतो. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे हा रोग अस्तित्वात नाही. अमेरिका व इंग्लंडमध्ये आयात केलेल्या जनावरांमार्फत व इतर काही मार्गांनी रोगसंसर्ग होऊन रोगाच्या साथी मधूनमधून येत असतात पण संसर्गित व रोगी जनावरे मारून टाकून या साथींचा बंदोबस्त करण्यात येतो. अमेरिकेमध्ये १९२९ सालानंतर रोगोद्भव झालेला नाही. त्या देशातील जनावरांमध्ये तीव्र स्वरूपाच्या साथीमध्ये मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असू शकते. लहान वयांच्या जनावरांमध्ये हे नेहमीच २०% असते. कळपामध्ये साथ उद्भवल्यास १००% जनावरांना लागण होते. यूरोपमध्ये १९५१-५२ मध्ये आलेल्या साथीमुळे (दूध व मांस यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे व जनावरांच्या व्यापारावरील निर्बंध आणि रोगप्रतिबंधक उपाय योजण्यासाठी आलेल्या खर्चामुळे) ४० कोटी डॉलरचे नुकसान झाले. अर्जेंटिनामध्ये या रोगामुळे दरसाल १५ कोटी डॉलरचे नुकसान होते.
भारतीय गाईगुरांमध्ये हा रोग सौम्य स्वरुपात होतो. मात्र भारतातील विदेशी व त्यांच्यापासून जन्मलेल्या संकरित गाईगुरांत रोगाचा जोर अधिक राहातो व मृत्यूचे प्रमाणही १० ते २०% असते. देशी गुरांत हे प्रमाण १ ते २ टक्केच आहे व दरसाल ६,००० च्या आसपास जनावरे या रोगाने मरण पावतात. असे असले, तरी या रोगामुळे दुग्धोत्पादन व मांसोत्पादन यांत होणारी घट, बैल शेतीच्या कामाला जुंपता न येण्यामुळे होणारे नुकसान, तसेच जनावरांचा व्यापार, प्रजननक्षमतेमधील न्यूनता यांमुळे प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांचे नुकसान होत असावे, असा अंदाज आहे.
लाळ रोग व्हायरसामुळे होतो हे फ्रिड्रिख लफ्लर व पॉल फ्रॉश यांनी १८९७ मध्ये दाखविले. आकारमानाने सर्वांत लहान असलेल्या पिकोर्ना व्हायरसांच्या गटातील ऱ्हायनोव्हायरसांच्या उपगटामध्ये लाळ रोगाच्या व्हायरसाचा अंतर्भाव आहे. याचा व्यास २२ मिलिमायक्रॉन (१ मिलिमायक्रॉन =१०-९मी.) आहे. व्हायरसाचे ए, ओ, सी, आफ्रिकेमध्ये अलीकडे आढळून आलेले सॅट-१, सॅट-२, व सॅट-३ व आशिया -१ असे मुख्य विभेद आहेत. प्रत्येक विभेदाचे अनेक (६०) उपविभेद आहेत व हे विभेद प्रतिरक्षाविज्ञानाच्या (रोगप्रतिकारक्षमतेच्या अभ्यासाच्या) दृष्टिकोनातून अलग अलग आहेत. असे आढळून आले आहे. मात्र विभेदांमध्ये व त्यांच्या उपविभेदांमध्ये काही प्रमाणात एकवाक्यता दिसून येते. पिर्ब्राईट (इंग्लंड) येथील प्रयोगशाळेमध्ये व्हायरसाचे १४० विभेद व उपविभेद शोधून काढण्यात आले आहेत व त्यांतील १२० हॅमस्टर या प्राण्याच्या यकृताच्या ऊतककोशिकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहातील पेशींमध्ये) ⇨ऊतकसंवर्धन तंत्र वापरून वाढविण्यात आले आहेत. जगातील बहुसंख्य साथी व्हायरसाच्या ओ विभेदामुळे आलेल्या आहेत, तर सी विभेदामुळे सर्वांत कमी साथी येतात. लाळ रोगाचा व्हायरस अतिशय चिवट आहे. सामान्य जंतुनाशकांनी तो सहसा मरत नाही, पण १००° से. तापमानात व १ ते २% सोडियम हायड्रॉक्साइड किंवा फॉर्मॅलिन यांनी काही मिनिटांत मरतो. रोगी जनावराच्या शरीरातील ऊतकामध्ये त्याची भरमसाठ वाढ होते. आणि जनावराच्या मलमूत्र, दूध, वीर्य आणि इतर उत्सर्गामधून (शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या निरुपयोगी किंवा घातक पदार्थांमधून) तो बाहेर टाकला जातो. उपकलेतील (शरीरातील त्वचेच्या अगदी वरच्या भागातील तसेच बहुतेक पोकळ्यांची अस्तर त्वचा ज्याची बनलेली आहे अशा ऊतकातील) कोशिकांमध्ये व्हायरसाचे गुणन होते, म्हणून रोगाची विकारस्थले (विकृतिस्थले) असे ऊतक असलेल्या भागांमध्ये दिसून येतात. गोठविलेल्या यकृत, मूत्रपिंड व वीर्य यांमध्ये (-७९° से.) तो एक महिना, तर रोगी जनावरांच्या गोठ्यामध्ये एक वर्षपर्यंत जिवंत राहू शकतो.
रोगप्रसार : रोग्याच्या स्त्रावातून व उत्सर्गामधून रोगकारक व्हायरस मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो व तो निरनिराळ्या मार्गांनी निरोगी जनावरांपर्यंत पोहोचून बहुधा पचनमार्गावाटे त्याचा शरीरात प्रवेश होऊन रोगप्रसार होतो. मलमूत्र, पाणी पिण्याचे हौद, रोगी जनावरांची देखभाल करणाऱ्यांचे कपडे, रोगी जनावरांचे केस, कातडी, हाडे, संसर्गित पशुखाद्य, इतकेच काय पण संसर्गित गोठ्याकडून आलेल्या मोटारीच्या टायरांवाटेही रोगप्रसार झाल्याचे आढळून आले आहे. हवेतून व्हायरसाचा प्रसार लांबवर होऊ शकतो. तसेच पक्षी, उंदीर, जाहक या प्राण्यांमार्फतही रोगप्रसार होतो. माणसाच्या देवी रोगावरील लस (ही लस वासरापासून तयार होत असे) माणसामध्ये रोगप्रसाराला कारणीभूत झाल्याची नोंद आहे. रोगलक्षणे दिसू लागून जनावर आजारी आहे हे कळण्यापूर्वीच त्याच्या स्त्राव-उत्सर्गामध्ये तसेच दूधामध्ये व्हायरस अस्तित्वात असतो. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना करण्यापूर्वीच काही प्रमाणात रोगप्रसार झालेला असतो.
लक्षणे : १ ते २१ दिवसांच्या (बहुधा ३ ते ८) रोगपरिपाक कालानंतर (शरीरामध्ये रोगकारकाचा प्रवेश झाल्यानंतर रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतच्या कालानंतर) उच्च ताप (४०° ते ४१° से.) येऊन आजाराची सुरुवात होते. जनावर मलूल दिसते, खाणे बंद करते व त्याचे तोंड येते. तोंडातून फेसयुक्त चिकट लाळेची तार गळू लागते. वरचेवर ओठ एकदम मिटणे व जोराने उघडणे यामुळे मिटक्या मारल्याप्रमाणे विशिष्ट आवाज होतो. दात खाणे, जीभ वारंवार आत बाहेर काढणे ही प्राथमिक लक्षणे दिसतात. एक-दोन दिवसांत ताप कमी होऊ लागतो व तोंडातील श्लेष्मकलेवर (तोंडाच्या पोकळीच्या बुळबुळीत अस्तरत्वचेवर) १ ते २ सेंमी. व्यासाच्या द्रवयुक्त पुटिका (भाजल्यावर त्वचेवर येतात तसे फोड) दिसू लागतात. या पुटिका जीभ, गालाच्या आतील भाग, जाभाड, हिरड्या या भागांवर प्रथम येतात. याच सुमारास खुरांच्या बेचक्यात खूर व कातडे यांच्या संयोगाच्या ठिकाणीही दिसू लागतात. साधारणपणे २४ ते ३६ तासांमध्ये पुटिका फुटून त्या ठिकाणी लहान जखमा दिसू लागतात. तोंडातील लहान लहान जखमा एकत्रित होऊन मोठाले व्रण तयार होतात. खुराच्या बेचक्यातील जखमा मागील भागापर्यंत पसरतात व त्या दुखऱ्या असल्यामुळे जनावर लंगडत, पाय झटकत चालते. पायावरील जखमांमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या चिघळतात. त्यांत पू होतो व क्वचित त्याचे पर्यवसान खूर गळून पडण्यातही होऊ शकते. कासेवर व स्तनाग्रावर पुटीका येतात आणि त्या फुटून तिथेही जखमा होतात. स्तनाग्रावरील जखमांना जंतुसंसर्ग झाल्यास स्तनशोध (कासेला दाहयुक्त सूज येणे) होऊन कासेचे एक किंवा सर्व कप्पे निकामी होतात व त्यामुळे दुग्धोत्पादन कायमचे बंद होण्याची भीती असते. गाभण गाई गाभाडतात व क्वचित त्यांना कायमचे वंध्यत्व येते.
सर्वसाधारण लक्षणे वर वर्णन केल्याप्रमाणे असली, तरी काही तीव्र प्रकारच्या साथींमध्ये हृद्स्नायुशोथ (हृदयाच्या स्नायूंची दाहयुक्त सूज) होऊन जनावर दगावते. आतड्याच्या श्लेष्मकलेवर सूज येऊन आमांश (रक्तमिश्रित हगवण) हे लक्षण दिसते. तसेच अंतःस्त्रावी ग्रंथीमध्ये (ज्या ग्रंथीचा स्त्राव वाहिनीविना थेट रक्तात मिसळला जातो अशा ग्रंथीमध्ये) बिघाड झाल्यामुळे रक्तक्षय, कष्टश्वसन, अंगावर राठ केसांची वाढ होणे इ. विकृती आढळून येतात. शेळ्यांत व मेंढ्यांमध्ये रोग सौम्य स्वरुपात होतो व तोंडातील विकारस्थलापेक्षा खुराच्या बेचक्यात लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येतात. आईच्या अंगावर पिणाऱ्या डुकरांच्या पिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आढळते. कोकरांमध्ये जठरांत्रदाह (पोट व आतड्यामध्ये सूज येणे)होऊन कोकरे मृत्युमुखी पडतात.
निदान : तोंड व पाय यांवरील जखमा, एकाच वेळी कळपातील अनेक जनावरे आजारी होणे व वर वर्णिलेल्या लक्षणांवरून रोगनिदान करणे सोपे आहे. तथापि व्हेसिक्यूलर स्टोमॅटायटिस् (व्हायरसामुळे तोंड येऊन-ज्यात पुटिकाही दिसतात- असा मुख्यत्वे घोड्यांना होणारा पण गाईगुरे व डुकरे यांनाही होणारा संसर्गजन्य रोग) व व्हेसिक्यूलर एक्झँथीमा (लाळ रोगासारखी लक्षणे दिसणारा डुकरांना होणारा रोग) या रोगांपासून व्यवच्छेदक (अलगपणा सिद्ध करणारे) निदान करणे आवश्यक असते. असे निदान करण्यासाठी प्रतिजन-प्रतिपिंड यांच्या पूरक-बंधी परिक्षा [पूरक बंधन करणाऱ्या प्रतिपिंडांची विशिष्ट प्रतिजनाबरोबर होणारी प्रतिक्रिया तपासणे ⟶ प्रतिपिंड] व उदासिनीकरण परीक्षा (विशिष्ट प्रतिपिंडाने व्हायरसाची क्रियाशीलता अवरोधित करून करण्यात येणारी परीक्षा) करून रोगनिदान होते. तसेच गिनीपिगांना व पांढऱ्या उंदरांच्या पिलांना पुटिकांतील द्रव टोचून त्यांच्यामध्ये होणाऱ्या रोगाचा अभ्यास करून रोगनिदान होऊ शकते.
उपचार : रोगावर निश्चित औषधी उपाययोजना उपलब्ध नाही. तोंडातील जखमा सौम्य जंतुनाशकांनी साफ करणे व जनावरास हिरवा चारा व मऊ खाद्य देणे व तोंडातील जखमा बऱ्या करण्याकरिता औषधी उपाययोजना करणे हेच उपचार आहेत. पायातील जखमांवर डांबर व मोरचूद यांचे ५ : १ या प्रमाणात केलेले मिश्रण जंतुनाशकाने जखमा साफ करून लावतात. जिभेवरील जखमांना ग्लिसरीन व बोरॅक्स यांचे मिश्रण लावतात.
प्रतिबंध व निर्मूलन : ज्या देशामध्ये रोग पशुस्थानिक स्वरूपात असतो तेथे रोगनिर्मूलन व्यावहारीक दृष्ट्या सहसा शक्य होत नाही. जेथे रोगाच्या साथी मधूनमधून येतात तेथेच हे शक्य होते. इंग्लंड-अमेरिकेसारख्या काही देशांत रोगाची साथ आल्यास निर्मूलनाचे उपाय योजतात. रोगी जनावरे मारुन टाकून आजूबाजूच्या २०-२५ किमी. परिसरातील जनावरांना लस टोचतात. कायद्याने तो भाग दूषित म्हणून घोषित करतात व जनावरांची ये-जा, प्रदर्शने बाजार इत्यादींना प्रतिबंध करतात. मारलेल्या जनावरांच्या मालकाला कायद्यानुसार भरपाई देतात. मारून टाकलेल्या जनावरांचे मांस खाण्यासाठी उपयोगात आणीत नाहीत, ती खोलवर पुरतात. त्यांचे गोठे, भांडी-कुंडी, अवजारे जंतुनाशकाचा वापर करून तसेच खाद्य व देखभाल करणाऱ्यांचे कपडे जाळून टाकून परिसरातील व्हायरसाचा नाश करतात. दूषित कुरणातील व्हायरसाचा नाश करणे कठीण असते तथापि अशी कुरणे काही दिवस रिकामी ठेवल्यास हे साध्य होते, असा अर्जेंटिनातील अनुभव आहे.
भारतामध्ये प्रतिवर्षी ए, ओ, सी व आशिया-१ व त्यांच्या उपविभेदांमुळे रोगाच्या ३,५०० च्यावर साथी येतात आणि सु. २० लाख जनावरांना रोगाची लागण होते. त्यामुळे येथे फक्त प्रतिबंधात्मक उपायांचाच विचार करणे भाग पडते. रोगी जनावरांना वेगळे काढून त्यांची शुश्रूषा केली जाते आणि कळपातील व परिसरातील जनावरांना लस टोचतात. पूर्वी ॲप्थायझेशन म्हणून आणखी एक उपाय योजीत. रोगी जनावरांच्या दुषित लाळेने भिजवलेल्या कापसाचा बोळा निरोगी जनावरांच्या जाभाड, हिरड्या यांवर घासून त्यांच्यामध्ये रोगाची लागण करावयाची व अशा रीतीने रोगाची साथ सबंध कळपात फैलावू देऊन अन्यथा रेंगाळणारी साथ लवकर संपुष्टात आणावयाची याला ॲप्थायझेशन म्हणतात.
अलीकडे लाळ रोगाच्या प्रतिबंधासाठी-विशेषतः ज्या देशांत हा रोग पशुस्थानिक स्वरूपात आहे त्या देशांमध्ये- रोगप्रतिबंधक लशींचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेमधील बोट्स्वाना देशामध्ये वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांमध्ये रोगसंसर्ग होऊ नये यासाठी कालाहारी गेम्सबॉक राष्ट्रीय उद्यानाला ८२४ किमी. लांबीचे कुंपण घालण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये १९६७ साली ओ-१ या उपविभेदामुळे आलेल्या साथीने अपरिमित नुकसान झाले. श्रॉपशरमधील ऑझ्वस्ट्री येथे ऑक्टोबरमध्ये सुरू झालेली साथ मध्य व उत्तर इंग्लंडमध्ये व वेल्समध्ये वणव्याप्रमाणे पसरली. ४,३२,००० जनावरे (२,११,००० गाईगुरे, १,१३,००० डुकरे व १,०८,००० मेंढ्या) मारून टाकल्यावरच ती आटोक्यात आली व त्यासाठी २ कोटी ७० लक्ष पौंड भरपाई देण्यात आली. रोगाची पहिली साथ अमेरिकेमध्ये १८७० मध्ये इंग्लंडमधून कॅनडामार्गे आयात केलेल्या जनावरांमार्फत आली. त्यानंतर १९०२, १९१४ व १९२४ मध्ये अशाच साथी आल्या होत्या. एकदा तर आयात केलेल्या माणसांच्या देवीच्या लशीमुळे साथ आली होती. १९२९ मध्ये आलेली साथ केवळ आयातीसंबंधीच्या कायद्यांचा भंग केल्यामुळे आली.
मेक्सिकोमध्ये १९४६ मध्ये आलेल्या या रोगाच्या साथीमुळे अमेरिकेतील गुरे पाळणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि या साथीच्या बंदोबस्तासाठी मेक्सिको व अमेरिका यांचा संयुक्त आयोग नेमण्यात आला. आयोगाने आखलेल्या रोगनिर्मूलनाच्या कार्यक्रमामध्ये ८,२०० कर्मचारी काम करीत होते व त्यांचा रोजचा खर्च १० लाख डॉलर होता.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांखेरीज ग्रीनलंड, आइसलँड, नॉर्वे आयर्लंड, वेस्ट इंडीज व कॅरिबियन बेटे या देशांमधून १९६० च्या आसपास रोगाचे निर्मूलन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
याच वर्षी आशिया-१ या व्हायरसाच्या विभेदांमुळे झस्राएल, लेबानन व सिरीया या देशांमध्ये रोगाची भयंकर साथ आली होती व ती यूरोपमध्ये पसरते की काय अशी भीती उत्पन्न झाली होती. १९६२ साली सॅट-१ या व्हायरसाच्या विभेदामुळे इस्राएल, सिरिया, जॉर्डन व तुर्कस्तान या देशांमध्ये काही साथी उद्भवल्या होत्या, तर ए-२२ या विभेदामुळे तुर्कस्तान व इराकमध्ये रोग उद्भवला होता.
लसनिर्मिती : लाळ रोग प्रतिबंधक लस जगामध्ये अनेक ठिकाणी बनविण्यात येत असली, तरी उपलब्ध असलेल्या लशींची परिणामकारिता संपूर्णपणे विश्वासार्ह नाही. याचे मुख्य कारण रोगकारक व्हायरसाचे अस्तित्वात असलेले विभेद व उपविभेद हे आहे. रोगकारक व्हायरसाच्या पृष्ठभागावरील प्रथिन-प्रतिजन उपलब्ध होण्यासाठी व्हायरसाचे गुणक करणेही तितकेसे सहजसाध्य नव्हते. सुरुवातीला बनविलेल्या एकशक्तिक (रोगकारकाच्या एका विभेदापासून बनविलेल्या) लशींचा बऱ्याच वेळा उपयोग झाला नाही. टोचलेल्या जनावरांमध्ये व्हायरसाच्या दुसऱ्या विभेदामुळे रोगाची साथ येत असे. याकरिता अलिकडे त्या त्या देशात साथीस कारणीभूत असलेल्या विभेदांचा समावेश करून तयार केलेल्या बहुशक्तिक (एकाहून अधिक रोगकारकांचा वापर करुन तयार केलेल्या) निष्क्रियित मृत व्हायरस (मारलेल्या व्हायरसापासून बनविलेल्या) लशी जगामध्ये सर्वत्र वापरण्यात येतात. सर्वसाधारणपणे ए, ओ व सी या व्हायरसाच्या विभेदांपासून या बनविण्यात येतात. व्हायरसाचे गुणक करण्यासाठी ऊतकसंवर्धन तंत्र वापरून त्याची वाढ करण्यात येते. गाईगुरांच्या जिभेच्या उपकलेतील कोशिका, कोंबड्यांच्या अंड्यांमधील भ्रूणाच्या ऊतककोशिका, वासराच्या किंवा हॅमस्टर या प्रयोगशाळेतील प्राण्याच्या मूत्रपिंडाच्या ऊतककोशिका, पांढऱ्या उंदराच्या किंवा सशाच्या पिल्लांच्या ऊतककोशिका असा विविध ऊतकांच्या कोशिकांवर व्हायरसाची वाढ करण्यात येते. अशा रीतीने व्हायरसाची इष्टतम वाढ झाल्यावर क्रिस्टल व्हॉयलेट, सॅपोनीन किंवा फॉर्मॅलीन ही रसायने व्हायरस मारण्यासाठी वा निष्क्रिय करण्यासाठी वापरण्यात येतात. अशा निष्क्रियित मृत व्हायरस लशींनी टोचलेली जनावरे ६ ते ८ महिने रोगप्रतिकारक्षम राहातात. टोचल्यानंतर ७ ते २० दिवसांमध्ये रोगप्रतिकारक्षमता उत्पन्न होते. चार महिन्यांच्या अंतराने दोनदा लस टोचल्यास उत्पन्न होणारी रोगप्रतिकारक्षमता एक वर्ष टिकते. निष्क्रियित मृत व्हायरस लशीखेरीज सजीव पण हतप्रभ केलेल्या (रोगउत्पन्न करण्याची क्षमता क्षीण केलेल्या) व्हायरसाच्या विभेदापासून केलेल्या लशींचा वापर काही देशांमध्ये करतात. विशेषतः उंदराच्या ऊतककोशिकांवर वाढविलेल्या व्हायरसापासून केलेल्या अशा लशींचा उपयोग दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर करून (अशा पण बहुशक्तिक लशींच्या ५० कोटी मात्रा वापरण्यात येतात) रोगनिर्मूलन करण्यात आले आहे. या प्रकारच्या लशींमुळे प्राप्त होणारी रोगप्रतिकारक्षमता अधिक काळ टिकते.
भारतामधील देशी जनावरांमध्ये रोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे लाळ रोगावरील लस निर्मितीला अग्रहक्क देण्यात आला नव्हता परंतु अलीकडे दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी विदेशी व संकरित गाईच्या पैदाशीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्यामुळे या जनावरांच्या संख्येत वाढ झाली. ही जनावरे अधिक रोगग्रहणशील असल्यामुळे लाळ रोगावरील प्रतिबंधक लशीची जरूरी वाटू लागली. भारतामध्ये होणाऱ्या साथी ए, ओ, सी आणि आशिया-१ या रोगकारक व्हायरसाच्या विभेदांमुळे येत असल्यामुळे या विभेदांचा वापर करून ऊतकसंवर्धन तंत्र अवलंबून केंद्र शासनाच्या इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बंगलोर येथील प्रयोगशाळेमध्ये लाळ रोगावरील लस तयार करण्यात येत आहे. खासगी क्षेत्रामध्ये भारतीय कृषि उद्योग प्रतिष्ठानाच्या वाघोली (जि. पुणे) येथील रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ॲनिमल हेल्थ या संस्थेमध्ये तसेच मुंबई येथील हेक्स्ट कंपनीच्या प्रयोगशाळेमध्ये ही लस तयार करण्यात येते. वाघोली येथील संस्थेमध्ये ए, ओ, सी या विभेदांचा समावेश करून केलेल्या बहुशक्तीक लशीखेरीज ए-२२ या स्थानिक विभेदापासून आणखी एक लस बनविण्यात येते. या लशी ॲल्युमिनीयमाच्या हायड्रॉक्साइडाच्या जेलवरील पृष्ठभागावर अधिशोषित केल्यामुळे (पृष्ठभागावर धरुन ठेवल्यामुळे) संहत (जास्त प्रमाण असलेल्या) स्वरूपात तयार होतात. यामुळे कमी मात्रेमध्ये पुरेसे प्रतिजन (जे शरीरामध्ये टोचल्यास प्रतिपिंडाच्या स्वरूपात रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते ते) उपलब्ध होते.
ऊतकसंवर्धन तंत्र वापरुन लशी तयार करताना रोगकारक व्हायरसाचे गुणन-पर्यायाने व्हायरसामधील प्रतिजनाचे उत्पादन इष्ट मर्यादेपर्यंत पुष्कळदा होत नाही. तसेच लशींमधील व्हायरस पूर्णपणे निष्क्रिय न केले गेल्यामुळे लस टोचलेल्या जनावरात रोगाची साथ उद्भवल्याची उदाहरणे घडलेली आहेत. जननिक अभियांत्रिकीतील अलिकडील प्रगतीमुळे लाळ रोगावर मोठ्या प्रमाणावर व सुरक्षित अशी लस तयार करता यावी असे संशोधन चालू आहे. हे तंत्र म्हणजे लाळ रोगाच्या व्हायरसामधील जीनच्या (आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेणाऱ्या घटकाच्या) माहितीवरून असे दिसते की, त्यातील आरएनएवरील [रिबोन्यूक्लिइक अम्लावरील ⟶ न्यूक्लिइक अम्ले] व्हीपी -१ (VP-1) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथिन घटकामुळे जनावरांच्या शरीरात व्हायरसाचे उदासिनीकरण करणारे प्रतिपिंड तयार होतात व त्यांना रोगप्रतिकारक्षमता मिळते. प. जर्मनीमधील हायड्लबर्ग विद्यापीठामध्ये केलेल्या एका प्रयोगामध्ये वर उल्लेखिलेला व्हायरसाच्या जीनमधील व्हीपी-१ हा घटक काढून घेऊन तो एश्चेरिकिया कोलाय या सूक्ष्मजंतूंच्या जीनमध्ये यशस्वीपणे जोडून दिला गेला. अशा जोडणीमुळे ए. कोलाय या सूक्ष्मजंतूच्या नवीन तयार झालेल्या विभेदाचे गुणन करून व्हीपी-१ हा व्यायरसामधील प्रतिजन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे शक्य आहे. ए. कोलाय या सूक्ष्मजंतूंची वाढ करणे सहज शक्य होते, तशी व्हायरसाची वाढ करणे सोपे नाही. तसेच व्हायरसाचे गुणन करून तयार केलेल्या लशीमध्ये व्हायरसाचे रोगकारक घटक येण्याची शक्यता या पद्धतीने पूर्णपणे टाळली गेली आहे.
जेनेनटेक या अमेरिकन कंपनीने अमेरिकेच्या कृषी विभागाच्या प्लम आइलंड लॅबोरेटरीशी करार करून व्हीपी-१ अधिक शुद्ध प्रमाणात मिळविण्यासाठी निराळे तंत्र वापरात आणले आहे. इंग्लंडमधील ॲनिमल व्हायरस रिसर्च इन्स्टिट्यूट, वेलकम फाउंडेशन लिमिटेड इ. संस्थांमध्येही याच दिशेने संशोधन कार्य चालू आहे.
कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स क्लिनिकच्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रोगकारक व्हायरसाचा उपयोग न करता विशिष्ट रसायन वापरून रासायनिक प्रक्रियेने व्हायरसाच्या पृष्टभागावर असणाऱ्या प्रथिनांपैकी काही महत्त्वाची प्रथिने (प्रतिजन) तयार करण्यात यश मिळविण्यात आले आहे. हल्ली वापरात असलेल्या निष्क्रियित मृत व्हायरस लशीपेक्षा ही संश्लेषित लस अधिक गुणकारी असल्याचे गिनीपिग या प्राण्यावर केलेल्या प्रयोगामध्ये निदर्शनास आले आहे. शिवाय ती पूर्णपणे सुरक्षितही आहे. असाच प्रयत्न म्यूनिक येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री या संस्थेतील संशोधकांनीही केला आहे.
2. C.S. I. R. The Wealth of India Raw Materials Vol VI, Supplement Livestock (including Poultry), New Delhi 1970.
3. I.C.A R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.
4. Miller, C. M. West, G. P., Ed., Black’s Veterinary Dictionary, London, 1962.
“