लाहोर : पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. दिशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक तसेच देशांतर्गत व्यापाराचे सर्वांत मोठे केंद्र. लोकसंख्या २९,५२,६८९ (१९८१). अमृतसरपासून पश्चिमेस ५० किमी. वर रावी नदीतीराजवळ ते वसलेले आहे. रामायणातील श्रीरामपुत्र लव याने लवपुर-लोहावर (लाहोर) वसविले, अशी हिंदू दंतकथा आहे. काही तज्ञांच्या मते संस्कृत व्याकरणकार पाणिनी याचे जन्मस्थान असलेले शलातुर > लहाउर म्हणजेच लाहोर असावे. परंतु स्ट्रेबो अथवा प्लिनी यांच्या वृत्तांतांत लाहोरचा उल्लेख आढळत नाही. तज्ञांच्या मते इ. स. पहिल्या शतकापूर्वी लाहोरची स्थापना नसावी. इ. स. ६३० मध्ये येथे ब्राह्मण वसती होती, असा लाहोरचा पहिला उल्लेख चिनी प्रवासी ह्यूएनत्संग याच्या प्रवासवर्णनात आढळतो. दहाव्या शतकाच्या अखेरीस येथे शाही घराण्यातील जयपाल हा राजा राज्य करत होता. इ. स. १०३६ मध्ये गझनी घराण्याने हे ठाणे घेतले व ११०६ मध्ये आपल्या साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण बनविले. ११८६ मध्ये हे ठिकाण मुहम्मद घोरीने गेतले. कुत्बुद्दिन ऐबक १२०६ मध्ये लाहोरच्या गादीवर बसला. चौदाव्या शतकात मंगोलांच्या स्वाऱ्यांमुळे शहराचे बरेच नुकसान झाले. सोळाव्या शतकात शहराला चांगले दिवस आले. यावेळी मोगल साम्राज्याच्या राजधान्यापैकी ही एक राजधानी होती. औरंगजेबाच्या कारकीर्दीत लाहोरचे महत्त्व कमी झाले. रणजितसिंगाने १७६७ मध्ये लाहोर शीख साम्राज्याला जोडून ती आपली राजधानी बनविली. १८४९ मध्ये शहर ब्रिटीशांकडे गेले. १९४७ मध्ये पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर लाहोर पश्चिम पंजाब प्रांताची तर १९५५ ते १९७० या काळात पश्चिम पाकिस्तान प्रांताची व त्यानंतर त्याचे पंजाब प्रांत असे नाव होऊन ती त्याची राजधानी राहिली.
लोखंड, पोलाद, रबर, वस्त्रोद्योग, सोन्या-चांदीचे अलंकार, चलचित्रपट निर्मिती, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी, धातुकाम, विणकाम, रसायने, औषधनिर्मिती, विद्युत्सामग्री, कातडी वस्तू, कृषी अवजारे, शिवणयंत्रे, काचसामान, काड्याच्या पेट्या, शस्त्रक्रियाविषयक उपकरणनिर्मिती इ. अनेक उद्योगधंदे शहरात चालतात. हे एक प्रमुख लोहमार्गस्थानक असून मोठी लोहमार्ग कार्यशाळाही येथे आहे. येथील शालिमार बाग, अकबराने बांधलेला किल्ला आणि केलेली तटबंदी, जहांगीराची कबर, शाहजहानचा राजवाडा, औरंगजेबाने बांधलेली बादशाही मशीद, वझीरखानचा किल्ला व कबर इत्यादींमधून मोगल कलेचे सुंदर नमुने पहावयास मिळतात. शिखांची अनेक स्मारकेही येथे आहेत. तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस १८४९ मध्ये उभारलेली यूरोपीय बराकी तसेच मिआन मिर नावाची मोठी लष्करी कँटोनमेंट आहे. शहरात आधुनिक सुंदर इमारती, बागा, वस्तुसंग्रहालये, पंजाब विद्यापीठ (स्था. १८८२). अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र विद्यापीठ (स्था. १९६१) व एक आणवीय संशोधन संस्था आहे. सोन्या चांदीच्या जरीकामासाठी लाहोर प्रसिद्ध आहे. भारताशी याचे नाते अतूट आहे. अकबराच्या काश्मीर मोहिमांचा हा तळ होता. जहांगीराचे लग्न, मृत्यू, शाहजहानचा जन्म, लॉर्ड कॅनिंगने भरविलेला लाहोर दरबार (१८६०), भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाहोर कट, लाल लजपतराय यांचा मृत्यू, काँग्रेसचा पूर्ण स्वराज्याचा ठराव (१९२९) भगतसिंग, सुखदेव, राजगुरू इत्यादींची फाशी, जयप्रकाश नारायण यांची स्थानबद्धता (१९४२), गांधर्व महाविद्यालयाची स्थापना इ. घटना येथेच घडल्या. पंजाबी ढंगाचे गाणे लाहोरचेच. त्याने मराठी नाट्यसंगीत व भारतीय चित्रपटसंगीत यांवर मोठा प्रभाव पाडला आहे.