लाव् ज : आचार्य ‘लाव् ज’(लाउत्स) या नावाचा पुरुष अस्तित्वात होता, की नाही याबाबत तज्ञ लोकांत अजून दुमत आहे. एका मतानुसार आचार्य ‘लाव् ज’ हा कन्फ्यूशस ( आचार्य खुंग ) ह्याच्या समकालीन होता व त्याची दुसरी नावे लाव् दान् आणि ली अर् अशी होती. दुसऱ्या मतानुसार हा पुरुष अस्तित्वातच नव्हता. ‘लाव्’ याचा अर्थ वृद्ध. दाव-द-जिंग (म. अर्थ, मार्गसूत्रे) या ग्रंथाचा कोणीतरी वृद्ध लेखक असला पाहिजे या समजुतीने आचार्य लाव् ज हे नाव शोधून काढलेले असावे, असे म्हणतात.
आचार्य लाव् ज याच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. तथापि स्स-मा च्यन याने लिहिलेल्या इतिहासग्रंथामध्ये आचार्य लाव् ज हा लो-यांग या राजधानीत राजाच्या दरबारी ग्रंथपाल होता आणि इ.स.पू.५१७ मध्ये त्याची आणि कन्फ्यूशस याची भेट झाली, असा उल्लेख आहे. जव् राजवटीचा ऱ्हास होत आहे, याची जाणीव झाल्यावर आचार्य लाव् ज याने लो-यांग सोडले व त्याच वेळी त्याने दाव-द-जिंग हे पुस्तक लिहिले, असे स्स-मा च्यन म्हणतो. त्यानंतर आचार्य लाव् ज कोठे गेला आणि त्याचा मृत्यु केंव्हा व कोठे झाला हे कोणालच माहीत नाही, असाही उल्लेख आहे. तथापि स्स-मा च्यन याच्या इतिहासग्रंथातील हा उल्लेखाचा भाग कोणीतरी नंतर घुसडलेला आहे, असे तज्ञांचे मत असल्यामुळे आचार्य लाव् ज याच्या अस्तित्वाचा खराखुरा पुरावा नाही, असे मानले पाहिजे.
दाव-द-जिंग या ग्रंथाचा लेखक एक नसून अनेक असावेत तो संकलित ग्रंथ आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
चीनच्या इतिहासात ज्या महत्त्वाच्या विचारधारा मानल्या जातात, त्यांपैकी ‘दाव’ (मार्ग) ही एक. ज्वांग-ज हा या विचारधारेचा दुसरा प्रवर्तक. इ. स.पू.च्या दुसऱ्या शतकानंतर या विचारधारेचा प्रभाव राजदरबारी कमीकमी होत गेला.तथापि अभिजात ग्रंथांच्या अभ्यासकांमध्ये आणि विशेषतः कवी, चित्रकार, तत्त्वज्ञ यांमध्ये तो कायम राहिला. गेल्या दोन हजार वर्षांत दाव-द-जिंग या ग्रंथावर अगणित टीकाग्रंथ लिहिले गेले आहेत आणि ते पुढेही लिहिले जातील, असा या ग्रंथाचा भौतिक आणि आध्यात्मिक प्रभाव आहे. दाव-द-जिंग हा ग्रंथ म्हणजे एक दीर्घ गूढगुंजनात्मक काव्य आहे. त्यात शाब्दिक लीला आढळून येते. उदा., ‘अकर्म केल्याने कर्म घडते’, ‘दावचा अर्थ विशद करणाऱ्याला दाव काय आहे, हे समजत नाही’, ‘धनुष्याची दोरी (युद्धासाठी) संपूर्ण ताणल्यावरच धनुष्याला हात लावायला नको होता, हे लक्षात येते’ इत्यादी.
दाव-द-जिंग या ग्रंथात विश्वाचे गूढ काय आहे, या प्रश्रावर सखोल आणि काव्यात्मक विचार असून चीनच्या वैज्ञानिक शास्त्रावर त्याचा मोठा प्रभाव पडला.
‘यीन्-यांग’ (स्त्री आणि पुरुषतत्त्वे), पंचमहाभूते व त्यांचे गती आणि ओघ या विषयांची या ग्रंथातील चर्चा आणि अत्याधुनिक भौतिक विज्ञानांतील सिद्धांत यात फार साम्य आढळून येते.
देशिंगकर, गि. द.