लानोज: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला व कोलंबिया देशांमधील विस्तृत सॅव्हाना गवताळ प्रदेश ‘लानोज’ या नावाने ओळखला जातो . याने सु . ५,७०,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापलेले असून उत्तर व पश्चिमेस अँन्डीज पर्वतरांगा, दक्षिणेस ग्वाव्ह् या रे नदी व  ॲमेझॉनचा जंगलप्रदेश, पूर्वेस गियाना उच्च प्रदेश व ओरिनोको नदीखोरे यांनी ही सीमित झाला आहे.  हा बहुतांश प्रदेश समुद्र सपाटीपासून सु. १८५ ते २१५ मी. उंचीचा आहे.   

‘लानो’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘मैदान’ अथवा ‘सपाट प्रदेश’ असा असून सुरुवातीला हा फक्त स्पॅनिश वसाहती असलेल्या दक्षिण अमेरिकेतील मैदानी प्रदेशापुरता वापरला जात असे  परंतु नंतरच्या काळात या प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पति-प्रकाराला हा शब्द वापरला जाऊ लागला. ‘लानोज’ हे लानोचे अनेकवचन असून लॅटिन अमेरिकेतील  (विशेषतः  दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग) गियाना पठारावरील असे वनस्पतिप्रकार असलेल्या मैदानांना एकत्रितपणे ‘लानोज’ ही संज्ञा वापरली जाते. अर्जेटिनातील अशा प्रकारच्या   मैदानांना ‘पँपास’ म्हणतात,  तर टेक्सस व न्यू मेक्सिकोमधील  (अ. सं. स.)  मैदाने ‘लानो एस्टाकॅडो’ नावाने ओळखली जातात.   

या प्रदेशाचे सरासरी तापमान २४° ते ३०° से.  असून या भागात उन्हाळ्यात, विशेषतः  एप्रिल व नोव्हेंबरमध्ये, पाऊस जास्त पडतो. मध्यवर्ती मैदानी प्रदेशाकडून उंच अँडी ज पर्वतरांगांकडे पावसाचे प्रमाण ११० सेंमी. ते ४५७ सेंमी. पर्यंत वाढत जाते. या काळात या प्रदेशात चांगल्या प्रतीचे गवत उगवते. त्यामुळे पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. डिसेंबर ते मार्च या कोरड्या ॠतूत उष्ण वाऱ्यांमुळे गवत वाळून हा प्रदेश रखरखीत बनतो व येथील प्राणी पाणस्थळी स्थलांतर करतात. उंच गवत,  विखुरलेले वृक्ष,  झुडुपे ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. झुडुपे प्रामुख्याने काटेरी असतात. नदीकाठ व उंच डोंगरप्रदेश वगळता येथे मोठे वृक्षप्रकार आढळत नाहीत. डोंगरप्रदेशात स्क्रब ओक व ड्‌वार्फ  पाम, गोरखचिंच इ.  वृक्ष तुरळक प्रमाणात दिसून येतात.   

गुरे पाळणे हा या भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून १५४८ मध्ये स्पॅनिशांनी या व्यवसायाची प्रथम सुरुवात केली.  त्याकाळी स्यूदाद व बोलीव्हार या प्रमुख केंद्रांतून मांस निर्यात होत असे. प्रदेशाच्या पूर्व आणि उत्तर भागांत महत्त्वाचे खनिज साठे असून व्हेनेझुएलातील एल्टीग्रे व बारिनास यांच्या परिसरातील तेल क्षेत्रांमुळे खनिज उत्पन्नात भर पडली आहे. या भागातील ‘लानेरो’(गोपालक) लोक अश्वारोहण कलेत निपुण समजले जातात. पूरनियंत्रण व जलसिंचन प्रकल्पांमुळे लानोजचा काही भाग शेतीयोग्य झाला आहे. व्हेनेझुएलाने या भागात थोड्याफार प्रमाणात वाहतूक व्यवस्था केल्या आहेत.  हा बहुतेक प्रदेश विरळ वस्तीचा आहे. [⟶ गवताळ प्रदेश].

 सावंत,  प्र. रा .  चौंडे,  मा.  ल.