लातूर शहर : मराठवाड्यातील सुप्रसिद्ध व्यापारी पेठ व त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय, लोकसंख्या १,१२,००० (१९८१). ते मांजरा आणि तावरजा नद्यांच्या खोऱ्यात उस्मानाबाद व
सोलापूर यांच्या ईशान्येस अनुक्रमे ६२ किमी. व १२९ किमी. सोलापूर – नांदेड महामार्गावर वसले आहे.
मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शीकडून येणाऱ्या अरुंदमापी लोहमार्गाचे ते अंतिम स्थानकही आहे. लातूर शहराला प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे परंतु तत्संबंधी फारसे पुरावे उपलब्ध नाहीत. ह्या प्रदेशावर बादामीच्या चालुक्यांचे काही काळ आधिपत्य होते. चालुक्यांचे मांडलिक राष्ट्रकूट यांचा पहिला ज्ञात राजा दंतिदुर्ग ह्याचे मूलस्थान लातूर असल्याचे उल्लेख कोरीव लेखांतून मिळतात. त्यांत लातूरचा उल्लेख लट्टलूर असा केला आहे. पुढे राष्ट्रकूटांचा राजा पहिला अमोघवर्ष (सु. ८०८ -८८०) याच्या आधिपत्याखाली ते काही वर्षे होते. त्यानंतर हे नगर उत्तर चालुक्यकालीन पहिला सोमेश्वर, सहावा विक्रमादित्य व तिसरा सोमेश्वर यांच्या आधिपत्याखाली होते. या काळातील तिसऱ्या सोमेश्वराच्या इ. स. ११२८ च्या कोरीव लेखात लातूरचा लट्टलूर असाच उल्लेख आढळतो. त्यानंतर हा प्रदेश देवगिरीच्या यादवांनी घेतला. यादवांच्या पतनानंतर तो मुसलमानांच्या ताब्यात गेला. यावर पुढे इ.स. पंधरा ते सतराव्या शतकांत अनुक्रमे आदिलशाह, मोगल व निजामशाह यांचे वर्चस्व होते. पुढे १७२४ मध्ये निजाम उल्-मुल्क याने मोगल सेनापती मुबारीझ खान याचा पराभव करून स्वतंत्र ⇨ हैदराबाद संस्थान स्थापले. संस्थान विलीन होईपर्यंत लातूर शहर हैदराबादच्या अंमलाखाली होते. पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुंबई राज्यात आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले.
हे मराठवाड्यातील एक औद्योगिक शहर असून येथे अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. विविध शेतमालाची घाऊक बाजारपेठ येथे असून कापूस, उडीद, ज्वारी, भुईमूग, हरभरा यांचा व्यापार चालतो. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची वसाहत येथे असून तीत तेलाचे बरेच कारखाने आहेत. यांशिवाय भुईमुगाच्या तेलापासून वनस्पती तूप तयार करण्याचा एक मोठा कारखाना आहे. सुती व लोकरी कापड विणण्याचा आणि कातडी कमावण्याचा तसेच पादत्राणे बनविण्याचा एक कारखाना आहे. यांशिवाय येथे एक कागद तयार करण्याचा कारखाना असून पोलादी व पितळी भांडे बनविण्याचे छोटे उद्योग चालतात. कापूस पिंजण्याचा व दाबणीचा मोठा कारखाना येथे आहे. कापसापासून सूत तयार करण्याचे उद्योगही येथे चालतात. सहकारी तत्त्वावर चालणारा येथे एक साखर कारखाना असून शहरातील औद्योगिक कार्यक्षेत्रात रंग, खिळे, बादल्या, साबण तसेच घायपातापासून दोरखंड आणि औषधे बनविण्याचे छोटे उद्योग आहेत.
गंजगोलाई ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असून तिचे बांधकाम दुमजली व वर्तुळाकार आहे. चाकाच्या आऱ्याप्रमाणे अकरा रस्त्यांनी शहराच्या इतर भागांशी ती जोडलेली आहेत. गंजगोलाई बाजारपेठेत मालाच्या प्रकारानुसार दुकानांचे स्वतंत्र गाळे असून काही भागांना वस्तूंच्या नावावरून विशिष्ट नावे प्राप्त झालेली आहे.
लातूरची नगरपरिषद अवर्गीय असून तिची १९३५ मध्ये स्थापना झाली. लातूर नगराची रचना सुबद्ध आणि रेखीव असून शहरातून दगडांची बंदिस्त पक्की गटारे आहेत व घाण काढण्यासाठी जागोजागी मलवापीची योजना केली आहे. लातूरपासून सु.१० किमी. अंतरावर मांजरा नदीवर साई गावात पिण्याच्या पाण्याची विहीर असून तेथून शहराला नळावाटे पाणी पुरविले जाते. शहरात चार शासकीय रुग्णालये, आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि नगरपरिषदेचा दवाखाना व तीन प्रसूतिगृहे असून यांतून ४८ डॉक्टर व ११७ परिचारिका काम करीत होत्या (१९८८). यांशिवाय एक मोठा जनावरांचा दवाखाना व एक क्षय आरोग्यभवन आहे. शिवाय अनेक खासगी दवाखाने व रुग्णालये असून कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेली दोन शासकीय केंद्रे आहेत (१९८९).
“