लॅशली, कार्ल स्पेन्सर : (७ जून १८९०-७ ऑगस्ट १९५८). अमेरिकन मज्जा मनोविज्ञानतज्ञ (न्यूरोसायकॉलॉजिस्ट). जन्म वेस्ट व्हर्जिनियातील डेव्हिस येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात. वर्तनवादाचा संस्थापक जे. बी. वॉटसन (१८७८-१९५८) तसेच एच्. एस्. जेनिंग्झ यांच्या मार्गदर्शनाखाली जॉन्स हॉपकिंझ विद्यापीठात उच्च शिक्षण. १९१४ साली प्राणिविज्ञानात त्याने पीएच्. डी. पदवी मिळविली. प्रथम मिनेसोटा विद्यापीठात (१९१७-२६), नंतर शिकागो विद्यापीठात (१९२९-३५) आणि त्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठात (१९३५-५५) त्याने अध्यापन केले. १९४२ पासून येल विद्यापीठाने त्याची फ्लॉरिडा येथील नरवानर गण (प्रायमेट्स) प्राणिविज्ञान प्रयोगशाळेचा संचालक म्हणूनही नियुक्ती केली. मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये लॅशलीचे कार्य विशेषतः त्याचे शिक्षण व त्याच्याशी निगडित स्मृतिकार्यात-मेंदूच्या कार्यभागावरील मज्जा-मानसशास्त्रीय संशोधनासाठी-विशेष प्रसिद्ध आहे. फ्रान्समध्ये प्वात्ये येथे तो निधन पावला.
वर्तनवादी विचारसरणीने प्रेरित होऊन लॅशलीने फ्रँझ (१८७४-१९३३) याच्या सहकार्याने मेंदूवरील संशोधन आरंभिले. अमुक कार्याची अमुक स्थाने अशी जर मेंदूतलात स्थान-निश्चिती असेल, तर तेथील नसावेगांचे मार्ग निश्चितपणे ठरविता आले पाहिजेत. तसेच मूळ जन्मजात प्रतिक्षिप्त क्रियांचे मार्ग आणि अनुकूलनाने (शिक्षणप्रक्रियेने) रचलेले नवे मार्ग हेदेखील दाखविता आले पाहिजेत, अशी लॅशलीची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्ष संशोधनाने ती फोल ठरली. उलट त्याला असे आढळून आले, की मेंदूतलातली विवक्षित केंद्रे नष्ट केली, की प्राण्याच्या विवक्षित क्रिया काही काळ बंद पडतात पण आश्चर्य असे की कालंतराने त्याच लुप्त झालेल्या क्रिया तो क्षत-मेंदू प्राणी पूर्ववत करू लागतो. म्हणजेच, मेंदूच्या नष्ट झालेल्या भागाचे कार्य कालांतराने शाबूत राहिलेल्या इतर भागांकडून होऊ लागते.
यावरून लॅशलीने पुढील निष्कर्ष काढले : कोणतेही कार्य करण्याची पात्रता मेंदूच्या एका भागात जितकी असते, तितकीच ती त्याच्या दुसऱ्या भागातही असते म्हणजे मेंदूच्या सर्व भागांत सारखीच सुप्तशक्ती असते. प्रत्यक्ष कार्य करतेवेळी मेंदूचा विवक्षित भागच काम करत असला, तरी काही कारणाने तो भाग नष्ट झाल्यास मेंदूचे अन्य भाग ते काम करू शकतात. दुसरे असे, की मेंदूचा अधिकाधिक भाग कापून टाकला, की प्राण्याची कार्यक्षमता, अध्ययनक्षमता कमी कमी होत जाते. मेंदूचा कोणता भाग दुखावला आहे हे महत्त्वाचे नसून, किती भाग दुखावला आहे हे महत्त्वाचे असते. प्रत्येक क्रियेत, विशेषतः अध्ययनप्रक्रियेत सगळाच्या सगळा मेंदू कार्यान्वित झालेला असतो. या संशोधनावर आधारित अनेक लेख त्याने मानसशास्त्रावरील विविध नियतकालिकांमध्ये लिहिले.
फ्लूरँस (१७९४-१८६७) या थोर संशोधकाने शंभर एक वर्षांपूर्वी प्राण्यांच्या मज्जा संस्थेविषयी जे निष्कर्ष काढले, तसलेच निष्कर्ष लॅशलीला मेंदूच्या कार्याविषयी काढावे लागले. या निष्कर्षांनी त्याचे त्यासच आश्चर्य वाटले आणि वॉटसनकडून घेतलेली त्याची अणुवादी विचारसरणी धुळीस मिळाली. मेंदूचे कार्य खंडशः प्रतिक्षिप्त क्रियांच्या तत्त्वानुसार होत नसते, तर ते संकलित रीत्या, सर्व भाग अन्योन्याश्रयी असल्यागत होत असते, असे दिसून आले. वर्तनवादी प्रेरणेतून सुरू झालेले संशोधन अखेरीस समष्टिवादी निष्कर्षात परिणत झाले. वर्तनवाद आणि समष्टिवाद यांमधला विरोध या संशोधनामुळे बोथट झाला. थोर व उत्कृष्ट अध्यापक म्हणूनही लॅशलीची ख्याती होती. लॅशलीचा ‘ जंपिंग स्टॅंड ’ हे अजूनही मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे उपकरण आहे. लॅशलीचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ ब्रेन मेकॅनिझम अँड इंटेलिजन्स (१९२९) हा असून त्याने मानसशास्त्र, तंत्रिकाविज्ञान आणि वर्तनाचे जीवविज्ञान ह्या विषयांवर शेकडो व्याप्तिलेख व शोधनिबंध लिहिले.
संदर्भ : Beach, F. A. Hebb. D. O. Morgan, C. T. Nisben, H. W. Ed. The Neuropsychology of Lashley : Selected papers, New York, 1960.
केळशीकर, शं. हि.
“