लॅन्सडाउन : उत्तर प्रदेश राज्याच्या गढवाल जिल्ह्यांतील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण, एक कँटोनमेंट व प्रसिद्ध गिरीस्थान. लोकसंख्या ८,०९८ (१९८१). हे हरद्वारच्या आग्नेयीस सु. ५१ किमी. कोटद्वार या लोहमार्ग स्थानकाच्या ईशान्येस रस्त्याने ३० किमी.वर असून सस.पासून सु. १,५३२ मी. उंचीवर वसलेले आहे. इ.स. १८८७ मध्ये या कँटोनमेंटची स्थापना झाली व तत्कालीन व्हाइसरॉय लॅन्सडाउन याच्या नावावरून कँटोनमेंटला हे नाव देण्यात आले. आल्हाददायक हवामान, ओक, पाइन वृक्षांचे दाट जंगल व हिंस्त्र श्वापदे, बर्फाच्छादित शिखरांचे येथून दिसणारे मनोहारी दृश्य यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध असून येथे पर्यटकांसाठी मासेमारीच्या सुविधाही उपलब्ध आहेत. याच्या परिसरात प्रामुख्याने बार्ली, गहू व भात ही पिके घेतली जातात. येथे गढवाल विद्यापीठाशी संलग्न असलेले एक शासकीय महाविद्यालय व कँटोनमेंट बोर्ड आहे.

चौंडे, मा. ल.