लॅटव्हियन साहित्य : लिखित लॅटव्हियन साहित्याचा आरंभ सोळाव्या शतकापासूनचा आहे आणि ख्रिस्ती धर्मसुधारणेच्या चळवळीतून ते मुख्यतः निर्माण झाले. तत्पूर्वीचे साहित्य मौखिक परंपरेने जपले गेले. लोकगीतांनी आणि लोककथांनी ते संपन्न आहे. रीगा येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ लॅटव्हियन फोकलोअर’ ह्या संस्थेने जमविलेल्या लोकगीतांची संख्या नऊ लाखांच्या आसपास आहे. तेराव्या शतकात लॅटव्हिया जर्मनांच्या सत्तेखाली आला. ह्या सत्तांतरापूर्वीचा व नंतरचा अलिखित इतिहास ह्या लोककथांतून आणि लोकगीतांतून प्रतिबिंबित झालेला आहे. जर्मनांच्या सत्तेमुळे ह्या लोकसाहित्यातून लिखित साहित्य स्वाभाविकपणे उत्क्रांत होण्याची प्रक्रिया थांबली. बहुतांश लॅटव्हियन साहित्यातून लोकसाहित्याशी तुटलेला त्याचा संपर्क पुन्हा जुळविण्याची धडपड दिसून येते.
सोळाव्या शतकापासून निर्माण झालेल्या लिखित साहित्यात जर्मन धर्मोपदेशकांची साहित्यनिर्मिती ठळकपणे लक्षात येते. Catechismus Catholicorum(१५८५) हे लॅटव्हियन भाषेतले पहिले ज्ञात पुस्तक होय. सतराव्या शतकातील उल्लेखनीय साहित्यिकांत जी. मॅन्सेलिउस आणि ई. ग्लुक ह्यांचा समावेश होतो. मॅन्सेलिउस हा श्रेष्ठ गद्यलेखक. ग्लुकने बायबलचा लॅटव्हियन भाषेत अनुवाद केला मॅन्सेलिउस आणि ग्लुक हे जर्मन होते, तर जे. रायटर्स हा लॅटव्हियन होता. रायटर्सने काही धर्मग्रंथ लॅटव्हियन भाषेत अनुवादिले.
लॅटव्हियन भाषेतील लौकिक साहित्य अठराव्या शतकापासूनचे आहे. जी. एफ्. स्टेंडर हा त्याचा प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाचा मध्य हा लॅटव्हियातील राष्ट्रीय जागृतीचा व आकांक्षांचा. एकोणिसाव्या शतकारंभी (१८१६-१९) रशियाच्या बाल्टिक प्रांतांमधून भूदासपद्धती नष्ट करण्यात आली होती व त्या शतकाच्या मध्यापर्यंत लॅटव्हियन लोक साक्षर झाले होते. Dziesminas ह्या जे. ॲल्यूनेन ह्याच्या काव्यसंग्रहाने आधुनिक लॅटव्हियन भावकवितेचा आरंभ होतो. लॅटव्हियन लोकगीते ही कवींना खूप स्फूर्तिदायी वाटत होती. ए.पंपूर्स ह्याने रचिलेल्या ‘बेअरस्लेअर’ (१८८८, इं.शी.) ह्या महाकाव्यातून त्याचा स्पष्टपणे प्रत्यय येतो. १८६० नंतरच्या काळात के. बॅरन्स ह्याने १८६० नंतरच्या दशकात लॅटव्हियन लोकगीते प्रसिद्ध केली. ‘द टाइम्स ऑफ द सर्व्हेअर्स’(१८७९, इं.शी.) ही आर्. काउडझाइट आणि एम्. काउडझाइट ह्या बधूंनी लिहिलेली कादंबरी अगदी आरंभीची लॅटव्हियन कादंबरी होय. लॅटव्हियन कृषकांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण ह्या कादंबरीत केलेले आहे. यान रॅइनिस (१८६५-१९२९-मूळ नाव यान प्लीएकशान्स) ह्याने राष्ट्रीय जागृतीचे कार्य आपल्या काव्यलेखनाने पुढे नेले. ‘जुनी गीते नव्या चाली ’ ही त्याची भूमिका होती. आधुनिक जीवनातील समस्यांवरील आपल्या कवितेतून त्याने लॅटव्हियन लोकगीतांमधली प्रतिमासृष्टी प्रभावीपणे वापरली. रॅइनिसने नाट्यलेखनही केले. त्याच्या नाटकांचे विषय आख्यायिकांतून किंवा लॅटव्हियन लोकगीतांतील ज्ञापकांतून घेतलेले आढळतात. सन्स ऑफ जेकब (१९१९, इं.भा. १९२४) ह्या त्याच्या नाट्यकृतीचा विषय बायबलमधून घेतलेला आहे. Gals un sakums (१९१३) हा त्याचा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. त्याची पत्नी अस्पाझिजा (एल्झा रोझेनबर्गा) हिच्या भावकवितांतून आणि नाटकांतून एका वादळी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय येतो.
लॅटव्हियन साहित्यात १८९० नंतर विविध प्रकारचे प्रवाह आढळतात. सामाजिक समस्यांची वास्तववादी पद्धतीने हाताळणी व्हावी, असा आग्रह धरणारी एक चळवळ होती (इंग्रजी नामार्थ-न्यू मूव्हमेंट). ह्या चळवळीस विरोध करणारा जे. पोरूक्स (१८७१-१९११) हा नव-स्वच्छंदतावादाचा प्रतिनिधी. आर्. ब्लाउमॅनीस (१८६३-१९०८) ह्याने वास्तववादी नाटके व कृषक जीवनावरील कथा लिहिल्या. ‘कलेकरितां कला’ ह्या तत्त्वाचा पुरस्कार करणारे काही कवी होते. कार्लिस स्काल्बे (१८७९-१९४५) ह्या थोर कवीच्या कवितेचे लॅटव्हियन लोकगीतांशी जवळचे नाते आहे.
लॅटव्हिया १९१८ साली स्वतंत्र झाल्यानंतर जे लेखक उदयाला आले, त्यांच्या पाठीशी ह्या विविध वाङ्मयीन प्रवाहांची पार्श्वभूमी होती.
ई. व्हिर्झा (१८८३-१९४०) हा एक उल्लेखनीय साहित्यिक. व्हिर्झावर फ्रेंच कवितेचा प्रभाव होता. अभिजाततावादी काव्यलेखनाच्या तंत्राची शिस्त काटेकोरपणे सांभाळून त्याने आपल्या कविता लिहिल्या.Straumeni(१९३३) हे त्याचे गद्यकाव्य अनेक भाषांत अनुवादिले गेले आहे. पहिल्या महायुद्धाच्या अनुभवांवर विविध साहित्यिकांनी लेखन केले. त्यांत के. स्ट्राल, ॲना ब्रिगादेर, ए. ग्राइन्स ह्यांचा समावेश होतो. जे. व्हेसेलिसने (१८९६-१९६२) लॅटव्हियन लोकगीतांचे जग आणि समकालीन वातावरण ह्यांचा सुसंवाद त्याच्या आधुनिक आख्यायिका लिहिताना साधला. अलेक्सांडर कॅक्स (१९०२-५०) ह्याच्या कवितेवर थोर रशियन कवी माय्कोव्हस्की ह्याचा प्रभाव जाणवतो. जे. मेडेनिस (१९०३-६१) ह्या कवीने लॅटव्हियन लोकगीतांच्या आधारे काही नवे छंद विकसित करण्याचा प्रयत्न केला.
लॅटव्हिया सोव्हिएट रशियाला जोडला गेल्यानंतर (१९४०) तेथील समाजवादी वास्तववादाचे वाङ्मयीन तत्त्वज्ञान लॅटव्हियन साहित्यावरही लादले गेले आणि त्याचा परिणाम लॅटव्हियन साहित्यावर अपरिहार्यपणे झालेला आहे. लॅटव्हियाबाहेर परागंदा जीवन जगून साहित्यनिर्मिती करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांत व्हेरोनिका स्ट्रीलर्ट (१९१२- ), व्हेल्टा स्निकर, गुनार्स सॅलिन्स (१९२४- ) ह्यांचा अंतर्भाव होतो. व्हेरोनिका स्ट्रीलर्टचे पाच काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. साध्या शब्दांतून थेट आवाहन करण्याचे सामर्थ्य तिच्या कवितेत आहे. व्हेल्टा स्निकरच्या कवितेतील जग अत्यंत खाजगी असे आहे. अनेकार्थसूचक अशी तिची कविता आहे. लिनार्ड टॉन्स (१९२२-६३) ह्याच्या कवितेतून एक प्रकारच्या कालातीततेचा प्रत्यय येतो. गुनार्स सॅलिन्स हा अनुभवात खोल शिरून आपल्या कवितेला एक व्यापक परिमाण देतो. १८५६ ते १९५६ ह्या शतकातील ७१ लॅटव्हियन कवींच्या इंग्रजीत अनुवादिलेल्या वेचक कवितांचा संग्रह ए सेंच्युरी ऑफ लॅटव्हिगन पोएट्री (१९५७) ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
परागंदा साहित्यिकांपैकी काही कादंबरीकारांचाही उल्लेख आवश्यक आहे. नूट्स लेसिन्सच्या (१९०९- ) तीन कांदबऱ्या आणि पाच कथासंग्रह प्रसिद्ध झालेले ओत. द वाइन ऑफ इटर्निटी ह्या नावाने त्याचे काही वेचक कथात्मक साहित्य अनुवादून संगृहीत झालेले आहे (१९५७). मानवी जीवनातील विविध प्रसंगांचे संवेदनशील आकलन, सहृदय विनोद ही त्याच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये . आनस्लाव्हज एग्लाय्टिस (१९०६ – ) ह्याच्या कादंबऱ्यांतील विषयांचा आवाका बराच मोठा आहे. मानवी जीवनासंबंधीचे त्याचे जिवंत कुतूहल त्याच्या कादंबऱ्यांतून जाणवते. बुद्धिनिष्ठ, तल्लख विनोदही त्याच्या कादंबऱ्यांत आहे. त्याने कथा, कविता आणि नाटकेही लिहिली आहेत. त्याने लिहिलेल्या तेरा कादंबऱ्यांत Hemo Novus ही पिकरेस्क पद्धतीने लिहिलेली कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. व्हाल्डिमार्स कार्क्लिन्स (१९०६-६४) ह्याने दहा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तथापि त्याच्या सामर्थ्याचा विशेष प्रत्यय येतो. तो Pie laika upes (१९५१) ह्या त्याच्या कथासंग्रहात. मानवी वर्तनाच्या विविध आविष्कारांकडे पाहण्याची त्याची एक वेगळी अंतर्दृष्टी त्यातील कथांतून प्रत्ययात येते. जीवनाच्या अंधःकारमय बाजूची जाणीव गुंटिस झारिन्सच्या (१९२०-६५) कथा-कादंबऱ्यांतून दिसते. आंद्रेइस इर्ब (१९२४ – ) ह्याची लेखनशैली वरवर साधी वाटली, तरी तिच्यातील अनेक सूक्ष्म सौदर्यस्थळे जाणवतात. त्याच्या कथाही त्रुटित भासल्या, तरी त्यांना त्यांचा असा एक परिपूर्ण घाट असतो. इर्ब हा मानवी जीवनाकडे वैश्विक दृष्टिकोनातून पाहणारा एक प्रगल्भ साहित्यिक आहे.
ह्या परागंदा साहित्यिकांच्या साहित्याचे वळण १९६० नंतरच्या काही लॅटव्हियन साहित्यिकांनी गिरवून समाजवादी वास्तववादाच्या एकारलेल्या दृष्टीला विरोध दर्शविला आहे.
संदर्भ : 1. Andrups, J. Kalve, V. Latvian Literature, 1954.
2. Matthews, W. K. The Tricolour Sun, 1936.
कुलकर्णी, अ. र.