लळिताम्बिका अंतर्जनम् : (३० मार्च १९०९-). आधुनिक मलयाळम् कवयित्री, कथाकार, कादंबरीकर्त्री व सामाजिक कार्यकर्त्या. कोट्टवट्टम् (जि. क्विलॉन, केरळ) येथे एका साहित्यिक कुटुंबात जन्म. त्यांचे वडील पी.के.दामोदरन्पोट्टी आणि आई आर्या अंतर्जनम् हे दोघेही मलयाळम् कवी होते. लळिताम्बिकांचे शिक्षण घरीच झाले. त्यांचा विवाह अमरंकर इल्लंत्तू नारायणन् नंपू तिरी यांच्याशी झाला.

लळिताम्बिकांच्या साहित्यनिर्मितीस कवितालेखनाने आरंभ झाला. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. तथापि विचारांच्या संपूर्ण अभिव्यक्तीसाठी कविता हे माध्यम अपुरे वाटल्याने त्या कथालेखनाकडे वळल्या. त्यावेळी नंपूतिरी जातीत- विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत-अनेक जाचक रूढी प्रचलित होत्या. सुदैवाने अशा रूढींचा जाच त्यांना स्वतःस मात्र सोसावा लागला नाही. जातीत बालविवाह सर्रास होत होते, तसेच बहुपतिपत्नीत्वाची (पॉलीगॅमी) चालही सर्रास प्रचलित होती. केवळ पाच वर्षांच्या बालिकेचा विवाह पासष्ठ वर्षाच्या जरठ वृद्धाशी लावला जाई. स्त्रीच्या चारित्र्याबाबत जराही संशय आला, तरी धर्मशास्त्राचा चांगला अभ्यास असलेल्या वयोवृद्ध नंपूतिरींकडून त्या स्त्रीचा न्यायनिवाडा केला जाई. परिणामी ही स्त्री तिच्या कुटुंबियांकडून अव्हेरली जात असे. तत्कालीन समाजातील स्त्रियांची ही दयनीय अवस्था पाहून लळिताम्बिकांचे दृदय हेलावून निघाले आणि त्यांनी ह्या प्रथेविरुद्ध निकराने यशस्वी लढा दिला. त्यांनी त्यांच्या प्रतिकारदेवता ह्या कथेत नंपूतिरींच्या न्यायनिवड्याला बळी पडलेल्या अशाच एका दुर्देवी स्त्रीची सत्यकथा मोठ्या ताकदीने चित्रित  केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षि या उच्च कलात्मक मूल्ये असलेल्या व अत्यंत गाजलेल्या कादंबरीतही त्यांनी एका बंडखोर वृत्तीच्या, पण कर्मठ सनातनी नंपूतिरी कुटुंबात जन्मलेल्या स्त्रीची कहाणी वर्णिली आहे. रूढीची जाचक बंधने तोडण्यासाठी ती सर्वस्वाचा त्याग करते जगापासून संपूर्णपणे अलिप्त, विरक्त होते. तथापि तरीही तिला मन:शांती लाभत नाही. कादंबरीच्या अंतिम विश्लेषणातून असे निष्पन्न होते, की मानवी आत्म्याचा चिरंतन शोध मुक्तीच्या दिशेनेच चालू असतो. तेव्हा मानवी आत्म्याची तीव्र प्रखर वेदना चित्रित करणे हेच कलावंताचे खरे जीवितकार्य होय, असेही या संदर्भात म्हणता येईल.

लळिताम्बिकांच्या विशेष उल्लेखनीय साहित्यकृती अशा- काव्य : लळितांजलि (१९३७), वंचिराजेश्वरी (१९३८), भावदीप्ति (१९४४), ओरू पोट्टिच्चिरि (१९५८), निःशब्दसंगीतम् (१९५९), तेनतुळ्ळिकळ् (बालगीते-१९६८), आयिरत्तिरि (१९६९) इत्यादी. कादंबरी : ग्रामबालिका (१९५१), अग्निसाक्षि (१९७६) इत्यादी. कथासंग्रह : अंबिकांजलि (१९३७), आद्यत्ते कथकळ् (१९३७ दु.आ.१९५४), अग्निपुप्पंगळ (१९६०), गोसावि परंज कथा (बालकथा -१९६४) इत्यादी.

लळिताम्बिका यांचा संपर्क अखिल भारतीय महिला परिषदेशी तसेच ‘योगक्षेम सभा’ ह्या संस्थेशी आला. त्या केरळमधील ‘साहित्य प्रवर्तक’ या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य तसेच साहित्य अकादेमीच्याही सदस्य होत्या. त्यांच्या साहित्यास ‘कल्याणी कृष्ण मेनन’ पारितोषिक (१९७३), अग्निसाक्षि ह्या कादंबरीस केरळ साहित्य अकादेमीचा पुरस्कार (१९७६), ‘वयलार रामवर्मा’ पुरस्कार, ‘गुरूवायुर अप्पन् ट्रस्ट’ पुरस्कार (१९७६), तसेच केंद्रीय साहित्य अकादेमी पुरस्कारही प्राप्त झाले (१९७७). सध्या त्यांचे वास्तव्य केरळमधील कोट्टयम् जिल्ह्यातील रामपुरम् येथे आहे. त्यांचा एक मुलगा एन्. मोहनन् हाही नावाजलेला मलयाळम् कथाकार आहे.

भास्करन् टी. (इं.) सुर्वे, भा.ग.(म.)