लसाझ, आलँ-रने : (५ मे १६६८-१७ नोव्हेंबर १७४७). विख्यात फ्रेंच नाटककार आणि कादंबरीकार. फ्रान्समधील सार्झो येथे जन्मला. चौदा वर्षांचा असतानाच तो अनाथ झाला. तथापि ब्रिटनीमधील जेझुइटांच्या शाळेत त्याला चांगले शिक्षण मिळाले व पुढे पॅरिसमध्ये त्याने कायद्याचे अध्ययन केले. १६९४ मध्ये मारी एलिझाबेथ युयार ह्या स्त्रीशी त्याने विवाह केला आणि त्यानंतर कायद्याचे क्षेत्र सोडून देऊन त्याने स्वतःला पूर्णपणे साहित्यास वाहून घेतले. लियॉनच्या ॲबटकडून त्याला आर्थिक मदत झाली. त्याने ल साझला स्पॅनिश भाषा शिकवली व स्पॅनिश रंगभूमीचा परिचय करून दिला. ल साझची आरंभीची नाटके स्पॅनिश नाट्यकृतींची भाषांतरे आहेत. क्रिस्पँ, रिव्हाल द् साँ मॅत्र (१७०७, इं. भा. क्रिस्पँ, रायव्हल ऑफ हिज मास्टर, १९१५) ह्या नाटकाने त्याला विशेष ख्याती प्राप्त करून दिली. ‘तेयात्र फ्रांसॅ’ (इं. अर्थ-फ्रेंच थीएटर) ह्या नाट्यसंस्थेने १७०७ साली ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला. ल साझची उपजीविका लेखनावर अवलंबून असल्यामुळे त्याने विपुल पण घाईघाईने लेखन केले. ‘तेयात्र द् ला फ्वार’ ह्या नाट्यसंस्थेसाठी त्याने प्रहसनात्मक, हलक्याफुलक्या संगीताने नटलेली अशी ‘कोमेदी व्होदव्हील ’ह्या प्रकारची सु. १०० नाटके लिहिली.

स्पॅनिश साहित्यातून स्फूर्ती घेऊन ल साझने १७०७ सालीच ल दियाब्ल ब्यात (इं. भा. द डेव्हिल अपॉन टू स्टिक्स, १७०८) ही उपरोधप्रचुर कादंबरी लिहिली. ह्या कादंबरीसाठी त्याने स्पॅनिश साहित्यातून स्फूर्ती घेतलेली असली, तरी तिच्यातला प्रखर उपरोधाचा रोख पॅरिसमधील समाजजीवनावर आहे, हे लक्षात येते. तथापि कादंबरीकार म्हणून ल साझची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती इस्त्वार द् जिल ब्लास द् सांतियान (१७१५-३५ एकूण ४ खंड : पहिले दोन १७१५ मध्ये, तिसरा १७२४ साली आणि अखेरचा १७३५ मध्ये अशा क्रमाने प्रसिद्ध झाले. इं. भा. द अड्व्हेंचर्स ऑफ जिल ब्लास ऑफ सांतियान, १७८१) ह्या कादंबरीवर. पिकरेस्क पद्धतीची ही कादंबरी आहे. अशा प्रकारच्या कादंबऱ्यांत शठ किंवा धूर्त प्रवृत्तीच्या नायकांची (पिकारो) भ्रमंती आणि त्यांना येणारे अनुभव मांडलेले असतात. हे नायक वेगवेगळ्या मालकांच्या सेवेत राहतात आणि सतत आपले मालक बदलतात. ह्या नायकांच्या अनुभवांतून सामाजिक विसंगतींवर टीका केली जाते. ह्या कादंबरीचा नायक जिल ब्लास हासुद्धा आपले मालक सारखे बदलतो आणि प्रत्येक मालकाकडून काही ना काही शिकतो आपले अनुभवभांडार वाढवीत राहतो. आयुष्यातल्या अनुभवांतून तो व्यवहारचतुर वनतो. आयुष्य तसे वाईट नसते आपण ते जास्तीत जास्त समृद्ध केले पाहिजे, त्याच्यापासून अधिकात अधिक मिळवले पाहिजे अनुभवापासून शिकायला पाहिजे असे ह्या कादंबरीचे सार सांगता येईल. ह्या कादंबरीतून प्रत्ययास येणारा ल साझचा वास्तववादी दृष्टिकोण महत्त्वाचा आहे आणि असा दृष्टिकोण असलेल्या अगदी आरंभीच्या कादंबऱ्यांत ह्या कादंबरीची गणना होते.

ल साझच्या अन्य पिकरेस्क कादंबऱ्यांत इस्त्वार द् गुझमान दालफाराश (१७३२), एस्तेव्हानीय गाँझालॅस (१७३४) आणि ल वाशालिए द् सालामांक (१७३६) ह्या कादंबऱ्यांचा समावेश होतो.

उच्च नैतिक जाणिवेचा अभाव तसेच प्रेम, ममता ह्यांसारख्या उच्च भावनांबद्दल त्याच्या लेखनातून आढळणारी अनास्था ह्या बाबी टीकार्ह ठरलेल्या आहेत. तथापि मानवी स्वभावातील वैगुण्ये आणि विसंगती ह्यांवर त्याने उत्कृष्ट विनोदाच्या आधाराने प्रकाश टाकला. निवेदनातला जिवंतपणा आणि नाट्यात्मकता ह्यांमुळेही त्याचे लेखन परिणामकारक झाले आहे.

बुलॉञ-स्यूर-मॅर येथे तो निधन पावला.

सरदेसाय, मनोहरराय