लष्करी संगीत : सैनिकी किंवा लढाऊ वातावरणाच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे संगीत. ध्वनींचा हलकल्लोळ किंवा कोलाहाल केल्याने रणधुमाळी व्यक्त होईलही, पण ते संगीत असणार नाही. लष्करी संगीतात स्वर हवेत, तसेच तालही हवेत. त्यात नव्या युगाला अनुसरून रागांचा विचारही अंतर्भूत होतो. त्यात ठरीव रचनात्मक आराखडा असूनही गायन वा वादन अशा आवाजात व्हावे लागेल, की त्यातून करुण, शोक, शृंगार हे रस दूर पळतील. मर्दानी गळा व लढाऊ वाद्ये हीच तेवढी नादानादांतून वीरता प्रकट करू शकतात.

‘ सं पं स ग प ’ अशा टप्प्यात वाजणारे शंखस्वर (ब्यूगल नोट्‌स) लष्करी संगीताला फार जवळचे असतात. त्यांच्या खालोखाल वक्रतेने व अनुक्रमाने येणाऱ्या सप्तस्वरांचा क्रम लागतो. कोमल स्वरांचा क्रम सर्वात शेवटचा लागतो. या आधारे रागांची निवड करावी लागते. त्यांत दुर्गा, शंकरा, हंसध्वनी यांसारखे राग प्रभावी ठरतात.

दादरा, त्रिताल, केरवा, खेमटा इ. सोप्या तालांतील रचना चढत्या श्रेणीने सैनिकी वातावरण निर्माण करू शकतात. लयीत विलंबितपेक्षा मध्य आणी मध्यपेक्षा द्रुत ही लय अधिक प्रभावी ठरते. एकल (सोलो) पेक्षा यमल (ड्युएट) आणि यमलपेक्षा बहुल (सांघिक) गायन-वादनाला लष्करी संगीतात महत्त्वाचे स्थान असते.

वाद्यांपैकी तुमुल आणि दूरगामी नाद करणारी सुरेल वाद्ये हमखास लढाऊ वातावरण निर्माण करतात. प्रशियाचे फ्रीड्रिख द ग्रेट (१७१२-८६) यांनी १७६३ मध्ये सैनिकी ⇨बँडची स्थापना केली आणि त्यात वाजवावयाची वाद्ये, त्यांची संख्या व इतर तपशीलही ठरवून दिला. ती चालतानाही वाजवता येतात. तबला-मृदंगापेक्षा, पणव-आनक (बेस व साइड ड्रम) अधिक प्रभावी ठरतात. उदा., ढोल, पडघम, नगारा, दुंदुभी इत्यादी. स्पष्ट ठेका, द्रुत स्वरावली, सांघिक बाज व सुलभता यांतून लष्करी संगीत आकाराला येते.

दात्ये, ह. वि.