लमनॉसॉव्ह, म्यिखईल : ( १९ नोव्हेंबर १७११-१५एप्रिल १७६५). रशियन कवी, वैज्ञानिक, व्याकरणकार, रशियात खोल्मोगोरी येथे एका कोळ्याच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. तथापि शिक्षणाच्या ओढीने आपले गाव सोडून तो पायी मॉस्को शहरी आला (१७३०). तेथे स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी लपवून त्याने तेथील स्लाव्होनिक-ग्रीक-लॅटिन अकादमीत प्रवेश मिळविला कसून अध्ययन केले. परिणामतः १७३६ मध्ये त्याला सेंट पीटर्झबर्ग येथील विज्ञान अकादमीत प्रवेश देण्यात आला. तेथे काही महिने राहिल्यानंतर तो जर्मनीतील मारबर्ग विद्यापीठात शिकू लागला. भौतिकी आणि रसायनशास्त्र ह्यांचा अभ्यास त्याने तेथे केला. १७४१ मध्ये तो सेंट पीटर्झबर्ग येथे परत आला. तेथे आपल्याला अन्यायाने वागविले जात आहे असा अनुभव आल्यामुळे त्याचा आक्रमक, वादळी स्वभाव उसळून आला आणि औचित्यभंगाच्या आरोपावरून त्याला तुरुंगवासही घडला. तथापि १७४५ मध्ये सेंट पीटर्झबर्ग अकादमीत त्याची रसायनशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १७४१ ते १७५० ह्या काळात त्याने भौतिकीच्या क्षेत्रात स्वतःच्या काही उपपत्ती मांडल्या. विख्यात जर्मन कवी गटे ह्यालाही वैज्ञानिक संशोधनाबद्दल उक्तट आस्था होती म्हणून लमनॉसॉव्हला ‘रशियन गटे’ असेही संबोधण्यात येते. रंगीत काचांचा एक कारखानाही त्याने काढला होता तथापि ह्या उद्योगात त्याला आर्थिक फटका बसला.

लमनॉसॉव्हने केलेल्या काव्यरचनेत त्याच्या उद्देशिका लक्षणीय आहेत. आपल्या देशाच्या भावना आणि आकांक्षा त्यांतून त्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. रशियन साम्राज्य, रशियन लष्कर ह्यांचाही त्याने गौरव केला. रशियन भाषेचे व्याकरण त्याने लिहिले आणि छंदःशास्त्रात नवी दृष्टी आणली. वाङ्‌मयीन रशियन भाषेचे निकष त्याने निश्चित केले. त्याला आधुनिक रशियन साहित्याचा संस्थापक मानले जाते.

सेंट पीटर्झबर्ग येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.