लब्‍लां, नीकॉला : (६ डिसेंबर १७४२-१६ जानेवारी १८०६). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. मिठापासून धुण्याचा सोडा तयार करण्याच्या ‘लब्‍लांप्रक्रिये’ बद्दल प्रसिद्ध. या प्रक्रियेच्या शोधामुळे साबण, काच, कागद, पोर्सलीन व ज्यांच्या उत्पादनात हा सोडा लागतो त्या सर्व उद्योगांचे उत्पादन वाढले आणि एकोणिसाव्या शतकात हीच प्रक्रिया जगभर वापरात होती. [⟶ सोडा ॲश ].

लब्‍लां यांचा जन्म इव्हाय-ल-प्रे (फ्रान्स) येथे व वैद्यकीय शिक्षण पॅरिस येथील एकोल द काड्रर्जी या संस्थेत झाले. १७८० मध्ये त्यांची ऑर्लेआंचे ड्यूक ल्वी फीलीप झोझेफ ( पुढे फीलीप-एगालीते) यांचे शास्त्रवैद्य म्हणून नेमणूक झाली. १७८६ मध्ये फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेसने कमी प्रमाणात उत्पादन होणाऱ्या धुण्याच्या सोड्याच्या उत्पादन-वाढीसाठी बक्षिस ठेवले होते. ड्यूक यांच्या अर्थ साह्याने १७९० मध्ये लब्‍लां यांनी मिठापासून सोडा तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेमध्ये समुद्रातील लवणावर (मिठावर) सल्फ्यूरिक अम्‍लाची विक्रिया करून सोडियम सल्फेट तयार करण्यात आले आणि नंतर त्याचे चुनखडी व लोणारी कोळसा यांच्या साह्याने भस्मीकरण करून सोड्यात ( सोडियम कार्बोनेटात ) रूपांतर करण्यात आले. या प्रक्रियेचे एकस्व(पेटंट) लब्‍लां यांना सप्टेंबर १७९१ मध्ये मिळाले. त्या वेळी फ्रेंच राज्यक्रांती झाल्यामुळे त्यांना फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेसचे बक्षिस मिळू शकले नाही.

ड्यूक यांनी दिलेल्या भांडवलावर लब्‍लां यांनी सेंट डेनिस येथे कारखाना काढला परंतु १७७३ मध्ये क्रांतिकारकांनी ड्यूक यांचा शिरच्छेद केल्यावर १७९४ मध्ये सरकारने तो करखाना राष्ट्राच्या मालकीचा ठरवून ताब्यात घेतला. काही महिन्यानंतरच सार्वजनिक सुरक्षितता समितीने लब्‍लां प्रक्रिया सविस्तर प्रसिद्ध केली. १८०० मध्ये पहिले नेपोलियन यांनी त्यांना करखाना परत केला परंतु तो चालविण्याला लब्‍लां यांच्याजवळ भांडवल नव्हते. त्यांनी Cristallotechnieहा ग्रंथ लिहिला ( १८०२). शेवटी अतिशय गरिबी आल्याने कंटाळून त्यांनी सेंट डेनिस येथे आत्महत्या केली.

कानिटकर, बा. मो.