लढाऊ मासे : ॲनबँटिडी कुलातील बेटा प्रजातीच्या माशांना लढाऊ मासे म्हणतात. या प्रजातीत बारा जाती आहेत. बऱ्याच शास्त्रज्ञांच्या मते या स्वतंत्र जाती नसून यांपैकी बऱ्याच बेटा स्प्लेन्डेन्स या जातीच्या उपजाती आहेत. बे. स्प्लेन्डेन्स या जातीला समायी लढाऊ मासा असे म्हणतात. ही जाती जलजीवालयात पाळण्याच्या दृष्टीने लोकप्रिय ठरली आहे. या माशांचे रंग व आकार नेत्रदीपक आहेत. हे रंग त्यांचे अनेकवार प्रजनन करून संकराद्वारे त्यांच्यात आणण्यात आले आहेत.
लढाऊ मासे मूळचे अतिपूर्वेकडील मलाया व थायलंड या देशांतील होत. त्यांची लांबी सरासरी ६ सेंमी. असते. मादी नरापेक्षा थोडी लहान असते. जलजीवालयात ठेवण्याकरिता यांचा वापर हळूहळू सर्व जगभर होत आहे.
नराचे शरीर लांबट व बाजूने थोडे चपटे असते. त्याचा रंग व शरीरावरील रंगाचे पट्टे तो कोणत्या प्रदेशात राहतो यावर अवलंबून असतात. काही मासे सुंदर तांबड्या रंगाचे असून त्यावर निळसर- हिरवी चमक असते. खवले सुशोभित असतात व त्यांवर निळा, हिरवा किंवा तांबडा धातूसारखा चमकणारा ठिपका असतो. पृष्टपक्ष (पाठीवरील पर) मोठा असून पुष्कळ मागे असतो. त्याचा रंग तांबडा असतो व त्यावर हिरवे चमकदार पट्टे आणि काळे ठिपके असतात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) गोल असून त्याचा रंग पृष्ठपक्षाप्रमाणेच असतो व त्यावर हिरवे पट्टे असतात. काही वेळा यांच्या कडा नारिंगी रंगाच्या असतात. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) लांबट असून त्यावर नीळसर हिरव्या रंगाचे पट्टे असतात. या पट्ट्यांवर तपकिरी व तांबडे ठिपके असतात. अधर पक्ष (खालचा पर) लांब असून त्याचा रंग नारिंगी लाल असतो व टोके दुधी-पांढरी असतात. मादी नरापेक्षा थोडी लहान व पिवळट किरमिजी रंगाची असते. तिच्या अंगावरचे रंगीत पट्टे नराइतके स्पष्टपणे दिसत नाहीत.तिचे अधरपक्ष लहान असतात. ती नराइतकी देखणी नसते.
लढाऊ माशांना राहण्याकरिता मोठ्या आकाराची जलजीवालये लागतात. पाण्याचे तापमान २६° ते २८° से. असावे लागते. लहान जिवंत किडे किंवा वाळविलेले अन्नही यांना चालते.
लढाऊ माशांचे प्रजनन करणे सोपे आहे. यांचे घरटे बुडबुड्यांचे असते. बुडबुडे एकमेकांस लाळेने चिकटविलेले असतात. आणि ते पाण्याच्या पृष्ठभागावर पानांच्या आधाराने घातले जातात. मादीने अंडी घातल्यावर नर ती अंडी तोंडाने उचलून या बुडबुड्यांच्या घरट्यांत नेऊन ठेवतो व त्यांचे रक्षण करतो. अंडी घातल्यानंतर मादीस निराळे ठेवावे लागते, नाही तर ती स्वतःच अंडी खाऊन टाकते. दोन-तीन दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर येतात आणि सहाव्या दिवशी पोहू लागतात. पिले स्वतंत्रपणे पोहू लागली की, नरास टाक्यातून काढावे लागते. पिलांना जिवंत प्रोटोझोआ किंवा आर्टेमिया किंवा डॅफ्निया अन्न म्हणून देतात.
नराच्या पक्षांमुळे व रंगांमुळे पोहताना लढाऊ मासा फार आकर्षक दिसतो. समोर दुसरा नर दिसल्याबरोबर तो उत्तेजित होतो आणि स्वतःचे रंग बदलू लागतो. दुसऱ्या माशावर झडप घालून दोघांची लढाई सुरू होते. दोघांपैकी एकाने हार पत्करेपर्यंत ही लढाई थांबत नाही. या लढाईत दोन्ही मासे एकमेकांचे पक्ष फाडतात. एकमेकांस चावून जखमा करतात व एकमेकांचे खवले उचकटतात. मारामारीचा काळ १० मिनिटांपासून १ तासापर्यंत असू शकतो. या माशांची लढाई लावणे, ती बघणे व तीवर पैज लावणे हा स्थानिक लोकांचा एक छंद आहे.
इनामदार, ना. भा. जोशी, लीना
“