लघुनियतकालिके : (लिटल् मॅगझीन्स). सामान्यपणे अनियमित प्रकाशित होणाऱ्या, नवनवीन वाङ्मयीन प्रेरणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, प्रयोगशील वाङ्मयाला उत्तेजन देणाऱ्या नैतिक सामाजिक सौंदर्यात्मक संकेतांना झुगारणारे वाङ्मय प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकवजा कालिकांना लघुनियतकालिके म्हणता येते. लिटल् थिएटर या संज्ञेतून लिटल् मॅगझीन्स या नावाचा जन्म झाला असावा. ही एक प्रकारची साहित्यिक चळवळच होय. लघुनियतकालिकांसाठी मराठीत अनियतकालिक, अनियमितक, लघुकालिक, छोटे नियतकालिक, लघुअनियतकालिक आणि हिंदीत लघुपत्रिका इ. पर्यायी शब्द रूढ आहेत.  

इंग्लंड-अमेरिकेत १८९० पासून ही चळवळ सुरू झाली. या लघुनियतकालिकांनी फ्रान्सचे प्रतीकवादी, इंग्लंड-अमेरिकेतील प्रतिमावादी आणि १९३०-४० दरम्यानच्या कालखंडातील डाव्या विचारसरणीच्या नियतकालिकांमधून संस्कृतीवर पडलेल्या राजकीय व सामाजिक घडामोडींच्या प्रभावाचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारे लेखक यांना प्रकाशात आणले. हॅरिएट मन्रोच्या मार्गदर्शनाखाली पोएट्री : अ मॅगझीन ऑफ व्हर्स, मार्गारेट अँडरसनचे खळबळजनक असे लिटल्‌ रिव्ह्यू, विसाव्या शतकातील इंग्रजी नियतकालिकांच्या गटातील एगोइस्ट, ब्‌लास्ट आणि युजेन जोलाचे ट्रॅन्झिशन इ. लघुनियतकालिके या चळवळीत आघाडीवर होती. अमेरिकन कवी व टीकाकार एझरा पाउंड याचा अमीट ठसा या चळवळीवर उमटला आहे. या चळवळीतील इतर साहित्यिकांमध्ये अमेरिकन कवी विल्यम कार्लोस विल्यम्स, ट्रान्सलॅन्टिक रिव्ह्यूचा संपादक फोर्ड मॅडोक्स (ह्यूफर) फोर्ड आणि गुस्ताव्ह काहन यांची गणना होते. अर्नेस्ट हेमिंग्वे, टी. एस्. एलियट आणि जेम्स जॉइस हे प्रख्यात लेखक लघुनियतकालिकांतूनच समोर आले.

लघुनियतकालिकांनी आधुनिक साहित्यामध्ये वरचेवर बिनीचे शिलेदार म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे. आर्थिक स्थैर्य आणि प्रस्थापित व्यावसायिक नियतकालिकांतील संपादकीय प्रतिबंध यांच्या अभावामुळे त्या त्या कालखंडातील प्रस्थापित लोकभिरूचीच्या मर्यादेपलीकडील वाटा त्यांनी साहसाने चोखाळल्या. नव्या वाङ्मयीन प्रवाहांची निर्मिती केली व पुढे दोन दशकांच्या कालखंडानंतर वाङ्मयीन संस्कृतीने त्या प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेतले. 

या यूरोपीय वाङ्मयीन चळवळीचा प्रभाव भारतीय साहित्यावर द्वितीय महायुद्धोत्तर कालखंडात दिसून येतो. परिणामतः अनेक भारतीय भाषांमध्ये अशा प्रकारची चळवळ सुरू झाली. अर्थात ही केवळ आयात केलेली चळवळ नव्हती. तिच्यामागे मूलतः त्या कालखंडातील साहित्यात असणाऱ्या पतनशील प्रवृत्तीच्या विरुद्ध केलेला देशी विद्रोहच होता.  

हिंदीमध्ये लघुनियतकालिकांची संख्या प्रचंड आहे. त्यांपैकी आवेश, अकथ, लहर, कल्पना, आरंभ, ह्स्ताक्षर, आकंठ  त्रिज्या, कथाभारती, वातायन, गल्पभारती, बिंदू, नीरा, आमुख, मूल्यांकन, रुपाम्बरा, एकांत, सचेतना, कहानी, रंग, अनाम, क्षेत्रज्ञ, परिदृश्य, सनीचर, शताब्दी, युयुत्सू, अनास्था, अकविता इ. अनियतकालिके महत्त्वाची आहेत.  

मराठीत लघुनियतकालिकांना १९५५ साली सुरूवात झाली. रमेश समर्थ यांनी संपादिलेले शब्द हे मराठीतील पहिले लघुनियतकालिक समजले जाते. १९६० ते १९७५ हा लघुनियतकालिकांच्या समृद्धीचा कालखंड समजला जातो. त्यांची काटेकोर संख्या उपलब्ध होणे कठीण असले, तरी ती ७५ ते १०० च्या आसपास असावी शब्द, अथर्व, अबकडई,  आंत्रा, फक्त, तापसी, येरु, श्रीशब्द, टिंब, हेमा, असो, भारु, वाचा,  ऋचा, कावळा, पॅन्थर, कविता इ. नियतकालिकांनी या चळवळीत महत्त्वाची कामगिरी केली आहे. राजा ढाले व सतीश काळसेकर यांनी लघुनियतकालिकांच्या स्वरूपाचे चक्रवर्ती हे दैनिकही चालविले होते.


‘टिंब’ या लघुनियतकालिकाचे मुखपृष्ठ, मुंबई, एप्रिल १९६८.

या नियतकालिकाचे आकार विविध आहेत. काही पोस्टकार्डावर आणि काही अंतर्देशीय पत्रांवर छापली आहेत. काही चक्रमुद्रित आहेत. मुद्राक्षरकलेतील अक्षरसौंदर्याचे विविध नमुने त्यांत आहेत. विविध प्रकारची चित्रे आणि रेखाटने त्यांचे पृथगात्म वैशिष्ट्य मानावे लागेल. प्रस्थापितांविरुद्धच्या वाङ्मयीन बंडखोरीतून या कालिकांचा जन्म झाला. प्रस्थापितांच्या संपादकीय अधिकारांमुळे नवोदित लेखकांना येणारा दुय्यम दर्जा टाळावा, त्यांचे वाङ्मयीन शोषण थांबावे, व्यक्तिस्वातंत्र्यावरची बंधने दूर व्हावीत, प्रयोगशीलतेला मुक्त वाव मिळावा आणि कलाव्यापार गतिमान व्हावा इ. उद्देश या नियतकालिकांच्या निर्मितीमागे होते.

या कालिकांतून लघुकथा, कादंबऱ्याची तुरळक प्रकरणे, आत्मचरित्रात्मक टिपणे, रोजनिशी, विविध वाङ्मयीन निवेदने, विडंबने, वाङ्मयीन परीक्षणे, एकांकिका असा विविध प्रकारचा मजकूर प्रकाशित झालेला असला, तरी वैपुल्याने काव्यच प्रकाशित झाले. विविध भाषांतील साहित्यकृतींचे-विशेषतः कवितांचे-अनुवाद हेही या लघुनियतकालिकांचे लक्षणीय कार्य मानावे लागते.

या कालिकांतील दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, चंद्रकांत खोत, सतीश काळसेकर, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, वसंत गुर्जर, मनोहर ओक, तुलसी परब, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ, विजय कारेकर, अनंत अमदाबादकर इ. कवींची कविता लक्षणीय आहे. कालांतराने यांतील काही कवींची कविता औरंगाबाद येथील वाचा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. लघुनियतकालिकांतील बंडखोर कवींची कविता आज प्रस्थापित कविता म्हणून मान्यता पावू लागली आहे. इतर गद्यप्रकारात चंद्रकात खोत, रघू दंडवते, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, राजा ढाले, श्याम मनोहर, अरुण खोपकर, जयंत पाटणकर इत्यादींची साहित्यनिर्मिती लक्षणीय आहे. चंद्रकात खोतांच्या कडईचा लघुनियतकालिकसूची विशेषांक व या चळवळीतील लोकांच्या मुलाखतींचा विशेषांक ही चळवळ समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

लघुनियतकालिकांतील कवितेत क्षणवाद, अर्थशून्यतेची जाणीव, मृत्यूची ओढ, आत्यंतिक वैफल्य, लैंगिक संवेदनांचा निर्भीड उच्चार, विश्वाला दिलेला सर्वस्पर्शी नकार इ. वैशिष्ट्यांचा आढळ होतो. ही कविता बरीचशी गद्यप्राय असून तिची रचनापद्धती विस्कळीत आहे. कार्यकारणभावाच्या दृष्टीने विसंगत वाटणारे शब्द किंवा शब्दपंक्ती यांची वैशिष्ट्यूर्ण मांडणी हे कवी करतात. मनावर असणारी तार्किक विचारसरणी आणि पारंपरिक सौंदर्यकल्पना यांची बंधने नाहीशी करून अबोध मनातून स्फुरणाऱ्या कल्पनाप्रतिमांना आकारबद्ध करण्याचे काम या कवींनी केले. काहींनी बोलभाषेतील अर्थसधन शब्द वापरून ग्रांथिक भाषा आणि बोलभाषा यांच्यातील अंतर कमी केले काव्यापेक्षाही गद्यप्रकारात हे त्यांचे वैशिष्ट्य टळकपणे नजरेस भरते.


ही चळवळ एक साहित्यिक टूम नव्हती, तर तिने समाज व संस्कृती यांच्या संदर्भात साहित्याचा विचार जागरूकपणे केला. प्रस्थापित सौंदर्यकल्पनांना भाषेच्या विवक्षित उपयोगाला त्यांनी बेलगामपणे झुगारले. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे मर्ढेकरोत्तर साहित्यामध्ये नव्याने निर्माण झालेली स्थितीशीलता नाहीशी झाली. तथापि काही अपप्रवृत्तींची जोपासनाही झाली. दुर्बोधतेच्या व अश्लीलतेच्या आवर्तात काही कवी घोटाळत राहिले. वैफल्य आणि तृच्छतावादी वृत्तीमुळे संस्कृती आणि मानवी मूल्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन निराशावादी बनला.

या चळवळीला १९७५ नंतर ओहटी लागली. याचे कारण ही चळवळ एखाद्या उद्रेकासारखी होती. अल्पकालीन वाव मिळाल्यावर आणि पूर्वीचे बंडखोर प्रस्थापित होऊ लागल्यावर ती चळवळ हळूहळू शांत झाली. पुरेशा अर्थसाहाय्याअभावी प्रकाशनातील अनियमितता वाढत गेली. साहित्य संस्कृती मंडळांसारख्या शासकीय संस्थांनी नवलेखकांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देणे सुरू केल्याबरोबर आपले वाङ्मय रसिकांपर्यंत संक्रमित करण्याच्या नवोदितांच्या ओढीला सहजसुलभ मार्ग मिळाला. परिणामी बंडखोरी व प्रखरता संपली. ही चळवळ कुठल्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाची वाङ्मयीन बाजू नसल्यामुळे  कालौघात तिला ओहटी लागून आज ती नामशेष होऊ पाहत आहे.

संदर्भ : पवार गो. मा. हातकणंगलेकर, म. द. मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप (१९५०-१९७५), पुणे, १९८६.

  काळे, अक्षयकुमार