लकाँत दलील, शार्ल-मारी-रने : (२२ ऑक्टोबर १८१८-१७ जुलै १८९४). ‘ल पार्नास’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फ्रेंच काव्यसंप्रदायातील प्रमुख कवी. त्याचा जन्म फ्रेंच वसाहातीतील रेयून्यों ह्या बेटावर झाला. रेन येथे काही काळ कायद्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने स्वतःला साहित्यास वाहून घेतले. १८३७ नंतर त्याचे वास्तव्य प्रामुख्याने फ्रान्समध्येच होते. राजकीय क्षेत्रातही त्याला काही काळ स्वारस्थ होते. शार्ल फूर्ये ह्या फ्रेंच विचारवंताच्या सामजिक सिद्धांताचा प्रभाव त्याच्यावर होता. तथापि राजकीय क्षेत्रात वैफल्य आल्यावर त्याने केवळ काव्यलेखनात स्वतःस गुंतवून घेतले.

त्याचा पहिला काव्यसंग्रह पोॲम आंतीक हा १८५२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर पोॲम ए पोएझी (१८५५), पोॲम बार्बार (१८६२), पोॲम बाझिक (१८८४) आणि देर्निए पोॲम (१८९५) हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

लकाँत द लीलच्या पोॲम आंतीकमधील बहुतेक कवितांत त्याने ग्रीक कला, ग्रीक विचार व ग्रीक संस्कृतीतील स्थित्यंतर ह्यांचे दर्शन घडविले आहे. ‘भागवत, ला व्हीझीआँ द् ब्रह्मा’ सारख्या त्याच्या कवितांची प्रेरणा त्याला भारतीय संस्कृतीपासून मिळालेली आहे. पोॲम बार्बा मधील कवितांवर ईजिप्शिअन व नॉर्डिक मिथ्यकथांचा प्रभाव दिसून येतो. निसर्ग, वनजीवन हेही त्याच्या काही कवितांचे विषय आहेत.

‘ल पार्नास’ हा काव्यसंप्रदाय म्यूसे आणि इतर स्वच्छंदतावादी फ्रेंच कवींच्या अतिरेकी भावविवशतेविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून अस्तित्वात आला. ह्या पार्‌नॅसिअन संप्रदायाची वैशिष्ट्ये लकाँत द लील ह्यांच्या कवितेत ठळकपणे प्रत्ययास येतात. अफाट आणि निर्घृण विश्वाच्या अशाश्वतपणाची तीव्र जाणीव लकाँत द लीलच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. विविध संस्कृतीचा ऱ्हास त्याने आपल्या कवितेतून चित्रित केला आहे.

त्याने काही ग्रीक-लॅटिन साहित्यकृतींचे अनुवादही केले. १८८६ साली त्याला फ्रेंच अकादमीचे सदस्यत्व मिळाले. पॅरिसजवळील लुव्हेसियॅन्न येथे तो निधन पावला.

टोणगावकर, विजया