लखिमपूर : (१) उत्तर प्रदेश राज्याच्या खेरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व व्यापारी शहर. लोकसंख्या ६०,११० (१९८१). हे लखनौच्या उत्तरेस १२० किमी.वर शारदा नदीच्या एका उपनदीवर वसलेले असून ईशान्य लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक व अन्नधान्याची व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.

हे १८५९ मध्ये जिल्ह्याचे मुख्यालय होईपर्यंत याला फारसे महत्त्व नव्हते, परंतु त्यानंतर मात्र याची झपाट्याने वाढ होत गेली. जिल्ह्यातील भात, गहू, हरभरा, मका, सातू, तेलबिया, ऊस इ. शेतमालाची ही मोठी बाजारपेठ बनली. १८६८ मध्ये शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. साखर उत्पादन व विविध प्रकारचे हस्तव्यवसाय यांसाठी हे शहर प्रसिद्ध असून रस्ते व लोहमार्गाने ते अन्य मोठ्या शहरांशी जोडण्यात आले आहे. शहरात कानपूर विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन महाविद्यालये आहेत. १९८१ पासून जिल्ह्याचे मुख्यालय खेरी येथे हलविण्यात आले आहे.

(२) उत्तर लखिमपूर : आसाम राज्यातील लखिमपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २०,०९४ (१९७१). हे दिब्रुगडच्या (जिल्ह्याचे १९७३ पूर्वीचे मुख्यालय) नैर्ऋत्येस सु. ८० किमी.वर ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेले असून ऐतिहासिक व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

इ.स. तेराव्या शतकात या भागातील बारा भूयन घराण्यातील राज्यकर्त्याने आपल्या ‘लक्ष्मी’ नावाच्या आजीच्या स्मरणार्थ राजधानीला ‘लखिमपूर’ नाव दिले. अशी कथा सांगितली जाते. शहराच्या नावावरूनच जिल्ह्याला ‘लखिमपूर’ हे नाव मिळाले. १८४२ मध्ये ब्रिटिशांनी येथील आहोम राजा पुरंदरसिंग याचे राज्य खालसा केले व पुढे जिल्ह्याचे मुख्यालय लखिमपूरहून दिब्रुगडला हलविण्यात आले. त्यामुळे लखिमपूर शहराचा दर्जा कमी होऊन ते उत्तर लखिमपूर विभागाचे मुख्यालय करण्यात आले व तेव्हापासून शहरही उत्तर लखिमपूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १ एप्रिल १९६३ रोजी येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. १९७३ मध्ये दिब्रुगड व लखिमपूर हे स्वतंत्र जिल्हे होऊन लखिमपूरचे मुख्यालय म्हणून ‘उत्तर लखिमपूर’ जाहीर करण्यात आले.

लखिमपूर जिल्हा चहाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून उत्तर लखिमपूर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून विख्यात आहे. रस्त्यांनी व लोहमार्गांनी हे देशातील इतर शहरांशी जोडलेले असून शहरात भात सडणे, चहावर प्रक्रिया करणे इ. उद्योग चालतात. याच्या परिसरात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून ऊस, मोहरी, ताग, भात इ. पिकेही घेतली जातात.

चौंडें, मा. ल.