लखनौ विद्यापीठ : उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. लखनौ येथे स्थापना (१९२१). विद्यापीठ-स्थापनेचे श्रेय महमुदाबाद येथील महमद अली महमद खान या राजास दिले जाते. उत्तर प्रदेशाचा लेफ्ट. गव्हर्नर हारकोर्ट बटलर याने ह्या स्थापना-प्रस्तावाला दुजोरा दिला. कलकत्ता विद्यापीठ आयोगाने लखनौ येथे एकात्म, अध्यापनात्मक व निवासी अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन करण्याची विधिमंडळात शिफारस केली. त्यासंबंधीचे विधेयकही ऑगस्ट १९२० मध्ये सादर करण्यात येऊन, ऑक्टोबरमध्ये त्यास मंजुरी देण्यात आली. जुलै १९२१ मध्ये विद्यापीठाचे अध्यापनकार्य सुरू झाले. पुढे उत्तर प्रदेश राज्य विद्यापीठ कायदा १९७४ याअन्वये विद्यापीठाच्या अधिनियमात काही सुधारणा करण्यात आल्या.
विद्यापीठाचे पदवीदान-सभागृह हा केंद्रबिंदू मानल्यास त्यापासून १६ किमी.पर्यंत विद्यापीठाचे क्षेत्र पसरले आहे. द किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय, द कॅनिंग महाविद्यालय व इझाबेला थॉबर्न महाविद्यालय ही विद्यापीठ-परिसराच्या केंद्रस्थानी आहेत. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी आहे. कला, वाणिज्य, विधी, शिक्षण, वद्यक, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रविद्या, शिल्पशास्त्र, आयुर्वेद ह्या विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. १६ जुलै ते ३० एप्रिल असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून ते तीन सत्रांत विभागलेले आहेत. विद्यापीठाच्या अखत्यारीत पाच घटक महाविद्यालये व २० संलग्न महाविद्यालये आहेत.
शारीरिक शिक्षण, मोफत औषधोपचार, फी माफी, साधारण व संशोधन शिष्यवृत्त्या, विद्यावेतने, रोजगार माहिती व मार्गदर्शक संचालनालय इ. सुविधा विद्यापीठात उपलब्ध असून अरबी, फ्रेंच, जर्मन, रशियन, संस्कृत, फार्सी, तिबेटी, चिनी, बंगाली, मराठी, तमिळ, पाली, उर्दू इ. भाषांचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम तसेच गुन्हेगारीशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, शारीरिक शिक्षण यांचा एक वर्षाचा तर आचार्य, शास्त्री यांचा दोन वर्षांचा संस्कृत भाषेतील अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एल्एल्.एम्. ह्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने सत्र परीक्षा पद्धती अंगीकारली असून शारीरिक शिक्षण सक्तीचे आहे.
विद्यापीठाच्या ‘टागोर ग्रंथालया’त सु. ४,४०,००० ग्रंथ व १,२०० वर नियतकालिके होती (१९८८). सूक्ष्मपत्रे आणि सूक्ष्मपट यांच्या सुविधा ग्रंथालयात उपलब्ध आहेत. यांशिवाय गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात पुस्तकांची स्वतंत्र देवघेव (४३,५५० ग्रंथ) केली जात असून त्याचा खर्च राज्यशासन करते. विद्यापीठाचे उत्पन्न सु. १५.४० कोटी रु. होते (१९८८). याच वर्षी विद्यापीठात सु. ४५,६०० विद्यार्थी व ७११ अध्यापक होते.
मिसार, म. व्यं.